Saturday, 25 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशाने सत्तेवर आलं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सुशासन दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते. सुशासन म्हणजे सर्वांसाठी, प्रत्येक क्षेत्रासाठी सर्वसमावेशक विकासाची दृष्टी असलेलं पारदर्शक सरकार असल्याचं शहा म्हणाले. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जिंतेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना, सरकारची ८० टक्क्यांहून अधिक कामं आता ऑनलाईन झाली असल्याचं सांगितलं. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा करण्यात येतो.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मंत्र्यांनी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतल्या सदैव अटल स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. आनंद आणि उत्सवाचं हे पर्व साजरं करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचं भान राखावं असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

****

शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच राज्यांमध्ये एक लाख सात हजार घरं बांधायला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीची ५७वी बैठक नवी दिल्लीत झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी जमीनी निश्चिती करून, घरांचं १०० टक्के बांधकाम करण्यावर लक्ष्य केंद्रीत करायचे निर्देशही यावेळी देण्यात आले. या नव्या मान्यतेमुळे आता या अभियानाअंतर्गत मंजूर घरांची एकूण संख्या १ कोटी १४ लाख झाली आहे. याकरता एकूण ७ लाख ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६६ लाख नऊ हजार ११३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४१ कोटी एक लाख २६ हजार ४०४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या सात हजार १८९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल सात हजार २८६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख २३ हजार २६३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७७ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या नगरसोल रेल्वे स्थानकावरून काल ४०० वी किसान रेल्वे पश्चिम बंगाल मधल्या चितूरकडे रवाना करण्यात आली. रेल्वेनं शेती माल वाहतूक दरात ५० टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा शेतकरी आणि शेतीमाल व्यापारी यांना संधीचा लाभ घेण्याचं आवाहन, विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंघ यांनी केलं आहे. नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी पाच जानेवारी पासून किसान रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. ४०० किसान रेल्वेद्वारे नांदेड विभागातून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे, टमाटे आणि टरबूज आदी माल पोहोचवण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या आसेगाव इथला ग्रामसेवक सुभाष लव्हाळे याला एक लाख रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. बिअर दुकानाचं ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडीअंती ती एक लाख रुपये ठरली. ही रक्कम स्वीकारताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून लव्हाळे याला अटक केली.

****

हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील खेळाडू शाम कुरडे आणि अजय कदम यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण पदक, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे. शाम कुरुडे या विद्यार्थ्याने गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात दोन सुवर्ण पदकं, तर अजय कदम या खेळाडूने दहा हजार आणि पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं. 

****

औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण विभागानं काल शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातली अतिक्रमणं हटवली. बाजारपेठेमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारी ३० अतिक्रमणं काढण्यात आली.

****

No comments: