Sunday, 23 January 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कालच्या तुलनेत आज कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाली,  गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ३३ हजार ५३३ नवीन रुग्ण आढळले तर ५२५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर १७ पूर्णांक ७८ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या देशात २१ लाख ८७ हजार २०५ सक्रिय रुग्ण आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधान ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून बाल पुरस्कार २०२२च्या विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे देतील. या पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतात राहणाऱ्या, ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. प्रत्येक विजेत्याला एक पदक, १ लाख रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र दिलं जातं.

****

औरंगाबाद जिल्हा सहकारी दुध संघाच्या सात संचालक पदाच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांना २७४, गोकुळसिंग राजपुत २६९, संदिप बोरसे ३३०, डि.के.पाटील २८७, शिला कोळगे २७३, अलका डोणगांवकर २७३, तर पुंडलीक काजे यांना २५६ मतं मिळाली. या निवडणुकीतील सात संचालकांची या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे.

****

 

राज्य शासनानं ऑनलाईन पिकपेरा नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सरकारनं २०२१-२२ हंगामापासून ऑनलाईन ॲपवर पिक पेरा नोंदणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना पिक पेऱ्याची ऑनलाईन नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे पिक पेरा नोंदणीस राज्य शासनानं मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या शासकीय खरेदी केंद्राच्या ठिकाणी तुरीच्या विक्रीसाठीची नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकारी जी. के. शेवाळे यांनी केलं आहे. शासकीय हमीभाव योजनेतर्गंत ही खरेदी केली जाणार आहे.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त देश त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोस यांना आदरांजली अर्पण केली आहे. बोस यांचे आदर्श आणि त्याग देशाला कायम प्रेरित करतील असं कोविंद यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. बोस यांची जयंती देशभर पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं नावरण करण्यात येणार आहे.

****

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जयंती निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. जनसामान्याच्या पाठीशी उभे राहणारे अतुलनीय नेतृत्वासाठी बाळासाहेब सदैव स्मरणात राहतील. असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केलं.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर चेतन गावंडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केला.

नागपूर इथंही महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिनव पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून शहरातल्या गांधीसागर लावासमोर नागपूर शहरातल्या ७५ चित्रकार, ७५ मीटरच्या कॅनव्हॉसवर भारतीय स्वातंत्र्यपूर्व आंदोलन आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सेनेची देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या कार्यावर चित्र रेखाटत आहे.

****

येत्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर करा वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होईल. आज ट्विटसंदेशाद्वारे पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली. दरम्यान, मन की बात चा हा ८५ वा भाग असेल.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवशीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज केपटाऊनमध्ये न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता हा सामना सुरु होईल. यजमान दक्षिण आफ्रिका संघानं या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. 

****

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या युट्युब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...