Tuesday, 1 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करणार

·      चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त

·      भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा राष्ट्रपतींचा अभिभाषणात दावा

·      राज्यातील कोविड निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता, सर्व पर्यटनस्थळं सुरू होणार. लग्नसमारंभासाठी आता २०० लोकांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठीची र्यादा हटवली

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ९१ नवे रुग्ण, औरंगाबादमधील ११ रुग्णांचा समावेश

·      कोविड संसर्गाचे ३५ हजार ४५३ नवे रुग्ण, मराठवाड्यात १३ जणांचा मृत्यू तर एक हजार ४६८ बाधित

·      दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्याच्या काही भागात विद्यार्थ्यांचं आंदोलन

आणि

·      औरंगाबाद जिल्ह्यात शिवराई फाट्याजवळ आयशर ट्रकच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

****

२०२२-२३ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या या सादरीकरणाचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन होणार आहे. सकाळी दहा वाजून वीस मिनिटांपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तसंच दुपारी तीन वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीतून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. युनीयन बजेट या  अॅपवरही हा अर्थसंकल्प पाहता येणार आहे.

****

देशाच्या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प नक्कीच 'बूस्टर डोस' ठरेल, असा विश्वास, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला एका ट्विट संदेशात डॉ कराड यांनी, आगामी वर्ष हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

****

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, लोकसभा तसंच राज्यसभेसमोर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

यंदा कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के राहणं अपेक्षित असून, खरीप हंगामात विक्रमी १५० दशलक्ष टनांहून अधिक धान्याचं उत्पादन होईल, असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. औद्योगिक क्षेत्रात ११ पूर्णांक आठ दशांश टक्के, सेवा क्षेत्रात आठ पूर्णांक दोन, निर्यातीत १६ पूर्णांक पाच, तर आयातीमध्ये, २९ पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ होणं अपेक्षित आहे.

****

दरम्यान, काल सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं. कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाने साथ रोगाविरुद्धच्या लढ्यात भारताची क्षमता सिद्ध केल्याचं सांगत, संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात, भारतीय लस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, राष्ट्रपती म्हणाले. या लढ्यात आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं.

****

गेली दोन वर्ष आरोग्य क्षेत्राची स्थिती पाहता, या अर्थसंकल्पातून आरोग्य विभागाला झुकतं माप मिळावं, आणि राज्य सरकारांना अधिक निधी मिळावा, अशी अपेक्षा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले....

 ‘‘केंद्रीय बजेटच्या माध्यमातून मला अस वाटतं की, आरोग्य विभागाला अधिक जास्त झुकतं माप केंद्रसरकारनं सुद्धा दिलं पाहिजे. साहजिक आहे की, त्याच्यासाठी राज्यांना अधिक जास्तीचा निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे. केंद्रपूरस्कृत मेडिकल कॉलेजेस वाढावेत. यंत्र सामुग्री असेल, बांधकाम असतील त्याला मोठ्या पद्धतीनं निधी उपलब्ध झाली पाहिजे. आणि ओवरऑल नॅशनल हेल्थ मिशन मध्ये आपल्याला अधिक जास्त तरतूद जर झाली तर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टीकोनातून आणि आरोग्य सेवा चांगली मिळण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.’’

दरम्यान, अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी, 'हर घर है डोनर', मोहीम उपयुक्त ठरेल, असं आरोग्य मंत्री टोपे यांनी म्हटलं आहे. काल, मल्टी ऑर्गन आणि कॅडेव्हर दान जनजागृती मोहिमेचा, दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि प्रकल्प मुंबई स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं ही मोहिम राबवण्यात येत आहे. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय घेण्यासाठी जागरुकता निर्माण होणं गरजेचं असून, यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता टोपे यांनी व्यक्त केली.

****

कोविडची विशेषत: ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आले आहेत. यासंदर्भातला आदेश काल सरकारनं जारी केला. त्यानुसार आजपासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्याने, सफारी पार्क सुरू होणार आहेत. करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेनं, उपहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणानं निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आह़े. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटवण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ९१ रुग्ण आढळले. यापैकी नागपूर इथं १८, औरंगाबाद, नवी मुंबई तसंच रायगड इथं प्रत्येकी ११, पुणे नऊ, मुंबई तसंच ठाण्यात आठ, सिंधुदूर्ग तसंच सातारा पाच, अमरावती चार, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता तीन हजार २२१ एवढी झाली असून, यापैकी एक हजार ६८२ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३५ हजार ४५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७ लाख २१ हजार १०९ झाली आहे. काल ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ६११ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८ शतांश टक्के झाला आहे. काल १५ हजार १४० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७ लाख ६७ हजार २५९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख हजार ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ४६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, नांदेड चार, तर लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल २९० रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात २४०, नांदेड २१५, जालना २१३, लातूर १९९, उस्मानाबाद १४०, बीड १०६, तर परभणी जिल्ह्यात ६५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्याच्या काही भागात काल विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलेलं नाही, त्यामुळे दहावी तसंच बारावीच्या परीक्षा यंदा रद्द कराव्या, पुढच्या वर्षी ऑफलाईन शाळा सुरू केल्यानंतरच परीक्षा घ्यावात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला इथं, एकाचवेळी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन हे योग्य नसल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री योग्य मार्ग काढतील, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल कराड इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर कोविडचा आढावा आणि कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पहिली पासूनच्या सर्व शाळा आजपासून सुरू होत आहेत.

****

पंतप्रधान आवास योजनेत शासकीय पैशांचा गैरवापर तसंच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा केल्याचा आरोप,औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मार्च २०२२ ला मुदत संपत असलेल्या या योजनेसाठी, औरंगाबाद शहरातल्या ८० हजार ५१८ गोरगरीब नागरिकांनी, २०१६ मध्ये प्रस्ताव सादर केले होते, गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त ३५५ लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला, ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असल्याचं, खासदार जलील म्हणाले. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून, प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा होत आहे. याचा लोकसभेत थेट पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

रम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात एकाही किराणा दुकानात, सुपर शॉपी किंवा मॉल्समध्ये वाईनची विक्री करु देणार नसल्याचा इशारा, खासदार जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेत असल्याचा राज्य सरकारचा दावा असेल, तर सरकारने गांजाच्या शेतीलाही परवानगी द्यावी, अशी उपहासात्मक मागणी त्यांनी यावेळी केली.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं काल ३७५ फुटी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. आमदार नारायण कुचे, राजेंद्र कळकटे, विद्यार्थी परिषदेच्या अंकिता पवार, नाना गोडबोले यांच्यासह तरुणांनी पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या शिवराई फाट्याजवळ आयशर ट्रकचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. लग्न समारंभ आटोपून नाशिक कडे जाणार्या वर्हाडाच्या आयशर ट्रकची आणि दुसर्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मृत सर्वजण नाशिक जिल्ह्यातल्या अंबड औद्योगिक वसाहत परिसरातले आहेत.

****

लातूर शहरात प्रत्येक नागरिकाला अद्ययावत आरोग्य सोयीसुविधा पुरवण्यासाठी महत्वांकाक्षी योजना राबवणार असल्याचं, पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. शहराच्या विकासासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेच्या वतीनं मोहल्ला क्लिनिक उभारण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा काढण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तीन आणि चार फेब्रुवारीला राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. वातावरणातल्या या बदलामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

****

No comments: