Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२३ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या
सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड
प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन
साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ
ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
जीएसटी संकलनातून राज्यांना मार्च २०२६ पर्यंत भरपाई मिळणार
असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट
·
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या बालकांसाठी असलेल्या
पीएम केयर्स योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
·
राज्य सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्याचा
नियोजित संप मागे घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
·
राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८० रुग्ण; मराठवाड्यात
दोघांचा मृत्यू तर नव्या ४७ रुग्णांची नोंद
·
राज्यातल्या रिक्षा सौर ऊर्जेवर चालवण्याची पर्यावरण मंत्री
आदित्य ठाकरे यांची सूचना
आणि
·
‘विज्ञान सर्वत्र पूज्यते', या उपक्रमाअंतर्गत औरंगाबादसह
देशभरात ७५ ठिकाणी विज्ञान महोत्सवाला प्रारंभ
****
वस्तू
आणि सेवा कर - जीएसटी संकलनातून राज्यांना देण्यात येणारी भरपाई मार्च २०२६ पर्यंत
दिली जाणार असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
जीएसटी परिषदेच्या ४५ व्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं, त्या काल मुंबईत
वार्ताहरांशी बोलत होत्या. ही भरपाई देताना काही राज्यांना प्राधान्य दिलं जातं असल्याच्या
आरोपांचं त्यांनी खंडन केलं.
दरम्यान,
केंद्रीय तपास यंत्रणांवर केंद्र सरकारचा कुठलाही दबाव नसल्याचा निर्वाळाही निर्मला
सीतारामन यांनी दिला आहे. आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ठोस पुरावे असल्याशिवाय ईडी अर्थात
सक्तवसुली संचलनालय कुठलीही कारवाई करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
केंद्रीय
महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं बालकांसाठी असलेल्या पीएम केयर्स योजनेला, २८ फेब्रुवारीपर्यंत
मुदतवाढ दिली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ ला संपली होती. ११ मार्च २०२० पासून
२८ फेब्रुवारीपर्यंत ज्या बालकांनी कोविड-19 मुळे त्यांचे दोन्ही पालक अथवा हयात असलेला
पालक गमावला असेल, अशा सर्व बालकांना या योजनेतून मदत करण्यात येते. पालकाच्या मृत्यूदिनी
ज्या बालकांचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं, अशी बालकं या योजनेचा लाभ घेण्यास पात्र
आहेत.
****
एसटी
संपामुळे महामंडळाचं झालेलं नुकसान कामगारांकडून वसूल केलं जाणार नाही, असा खुलासा
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला आहे. महामंडळानं
असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नसल्याचं, चन्ने यांनी
स्पष्ट केलं. कामगारांनी कर्तव्यावर रुजू होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान,
एसटी विलिनीकरणासंबंधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन त्रिसदस्यीय समितीचा
अहवाल काल मुंबई उच्च न्यायालयात सादर झाला. पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
****
राज्य
सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या पुकारलेला संप मागे घेण्याचं आवाहन,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यासंदर्भात काल कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित
संप मागे घेण्याची तयारी कर्मचारी नेत्यांनी दर्शवली असून, आज कर्मचारी संघटनेतल्या
सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कर्मचारी
नेत्यांनी या बैठकीनंतर दिली. राजपत्रित अधिकारी
महासंघानेही उपमुख्यमंत्री पवार यांच्या मताशी सहमती दर्शवत, राज्य शासनाला संपूर्ण
सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
नवीन
पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, किमान निवृत्ती वेतनामध्ये केंद्रासमान
वाढ करावी, सर्वांना समान वेतन देऊन कंत्राटी आणि योजना कामगार यांच्या सेवा नियमित
कराव्या, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न सोडवणं, निवृत्तीचे वय
६० वर्षे करणं, आदी प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. औरंगाबाद इथल्या
शासकीय परिचारिका संघटनाही या संपात सहभागी होत आहेत.
दरम्यान,
या संपात सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा ईशारा सामान्य प्रशासन विभागानं दिला
आहे. या बाबतचा आदेश काल निर्गमित करण्यात आला.
****
आज
ऑनलाईन पद्धतीने नियोजित असलेली इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलत ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा
निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य कला संचालनालयानं ही परीक्षा आज, ऑनलाइन पद्धतीने
आज घेण्याचं जाहीर केलं होतं. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या निर्णयाचं स्वागत
केलं आहे.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६० हजार ३१७ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार
६३३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ४८८ रुग्ण बरे
झाले, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ९९ हजार ६२३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
१३ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवा रुग्ण
आढळला नाही.
****
मराठवाड्यात
काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल १९ नवे रुग्ण आढळले. लातूर नऊ, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी
सहा, परभणी तीन, तर जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. हिंगोली
जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्गमित केलेले आदेश सध्या लागू राहणार असल्याचं, आपत्ती
व्यवस्थापन विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना उपनगरी रेल्वे
प्रवासासहित इतर निर्बंध कायम राहणार आहेत. दरम्यान, लस न घेतलेल्या नागरिकांना उपनगरी
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासाला मुभा देण्या संदर्भात, येत्या २५ तारखेला निर्णय घेतला
जाईल, अशी माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली.
****
प्रदुषणमुक्त
शहर मोहिम राबवण्यासाठी राज्यातल्या रिक्षा सौर ऊर्जेवर चालवण्याची सूचना पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे तसंच औरंगाबाद शहरात पथदर्शी
प्रकल्प राबवला जाणार आहे. पुणे शहरात १३ हजार तर तर औरंगाबाद शहरात सहा हजार रिक्षा
सौर ऊर्जेवर चालवल्या जाणार आहेत. या ऑटोरिक्षांच्या किंमतीवर सरकारकडून अनुदान दिलं
जाणार आहे. औरंगाबाद शहरात लवकरच हा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे
प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.
****
‘विज्ञान सर्वत्र पूज्यते', या उपक्रमाअंतर्गत कालपासून देशभरात
७५ ठिकाणी विज्ञान महोत्सवाला प्रारंभ झाला. औरंगाबाद शहरात विवेकानंद महाविद्यालयात
विज्ञान भारती संस्थेचे संघटन प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते, विज्ञान महोत्सवाचं
उद्घाटन झालं. स्वातंत्र्य आंदोलनाचा विज्ञानाशी संबंध काय होता, या गोष्टीकडे अधिक
विचारपूर्वक पाहिलं, तर जगाला ज्ञान देणारा देश अशी भारताची प्रतिमा होती, ती पुन्हा
निर्माण करावयाची असल्याचं, सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केलं. या महोत्सवात विज्ञान आणि
तंत्रज्ञानाचा इतिहास, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातले प्रमुख टप्पे, स्वदेशी पारंपारिक
शोध आणि नवोन्मेष, तसंच परिवर्तनशील भारत, या चार मुख्य विषयांवर, पूर्ण आठवडाभर अनेक
स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनी, २८ फेब्रुवारीला या सप्ताहाचा समारोप
होणार आहे.
****
आकांक्षित
जिल्ह्यांच्या निर्देशांकानुसार महिला आणि मुली मधील रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्याचे
निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं राबवलेल्या
उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
Byte…
उस्मानाबाद जिल्ह्यातील
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र - उपकेंद्र स्तरावर गावागावात किशोरवयीन मुली, महिला,
स्तनदा माता आणि गर्भवतींची हिमोग्लोबिन तपासणी तसंच लोहयुक्त गोळ्यांचं वाटप आणि मार्गदर्शन
शिबीरं भरवली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात
४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि २११ उपकेंद्र स्तरावर गावा - गावात विशेष आरोग्य टेस्टींग,
ट्रीट ॲण्ड टेलिंग - T3 शिबीरं घेण्यात आली. यामध्ये २३ हजार ५०९ महिला आणि किशोरवयीन
मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६४३ महिला आणि मुलीमध्ये सामान्य
तर ११ जणीमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून जिल्ह्यातील रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्यात मदत
होत आहे.
-- देविदास पाठक
आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
बीड
जिल्ह्यात परळी इथल्या पंचायत समितीमध्ये कृषी विभागाचे विस्तार अधिकारी संजय पालेकर
याला चार हजार रूपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. शासकीय योजनेतल्या विहिरीचं देयक
काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या देवकुरुळी इथल्या श्री साईबाबा कृषी सेवा केंद्रातून खताची जादा दराने विक्री होत असल्याचं निदर्शनास
आल्यानं, परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या खत विक्री केंद्राचा
परवाना निलंबित केला आहे. या खत विक्रेत्याने आयपीएल या खत उत्पादकाचे म्युरेट ऑफ पोटॅश
या खताची जादा दरानं विक्री केल्याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे प्राप्त झाली होती.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेतला वरिष्ठ लिपिक सोहेल पठाण फेज अहेमद पठाण याला दहा हजार रुपयांची लाच
घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात अटक केली आहे. घराचा कर कमी करण्यासाठी
पठाण यानं ही लाच घेतली होती.
****
No comments:
Post a Comment