Sunday, 3 April 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      'मुंबई मेट्रो आणि मेट्रो २ अ' मार्गांचं लोकापर्ण, मुंबईची सुरक्षितता आणि विकासासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·      कार्यालयीन कामकाजासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      देशात धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल- खासदार शरद पवार

·      शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीचा विचार करण्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं आवाहन

·      राज्यात कोविड संसर्गाचे १० तर मराठवाड्यात सात नवे रुग्ण

·      कोरोना विषाणू संसर्गाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळं राज्यात गुढीपाडवा, उत्साहात साजरा, पवित्र रमजान महिन्याचा आज पहिला रोजा

आणि

·      औरंगाबाद - मनमाड मार्गावर दौलताबादजवळ मालगाडीचे आठ डबे घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळित

****

मुंबईची सुरक्षितता आणि विकासासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'मुंबई मेट्रो आणि मेट्रो २ अ' या मार्गाचं लोकापर्ण केल्यानंतर काल ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालक मंत्री अस्लम शेख, आदी यावेळी उपस्थित होते. मुंबईबद्दलचं प्रेम हे आपल्या कामातून दिसलं पाहिजे असं सांगत त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखून विकास केला जात असल्याचं सांगितलं. २ अ मेट्रो मार्ग दहिसर ते डहाणूकरवाडी असा असून त्यात सात स्थानकं आहेत. मेट्रो ७ हा मार्ग दहिसर पूर्व ते आरे मिल्क कॉलनी असून त्यात १० स्थानकं आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत या मेट्रोगाड्या धावणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण बराच कमी होईल. मेट्रोचं तिकीट १० ते ५० रूपये आहे. दिवसातून या मार्गावर दीडशे फेऱ्या होणार आहेत.

 

मुंबईत वडाळा इथं नियोजित वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलतांना ठाकरे यांनी, वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारं महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचं सांगितलं. कर संकलनात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे, असंही ठाकरे म्हणाले.

मुंबईतल्या मराठी भाषा भवनाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांनी काल केलं. मराठी भाषेत खूप ताकद आहे आणि कार्यालयीन कामकाजासाठी या प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अत्याचाराचा मुकाबला करणारी ही मराठी भाषा आहे. आणि ती मराठी त्या तेजानेच छत्रपतींच्या तलवारीसारखी ती मराठी भाषा तळपली पाहिजे. आणि ते तेज कायम ठेवण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं  पाऊल आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र राज्याच्या छत्रपतींच्या मातृभाषेचं हे मंदीर आहे. इकडे काहीही उणीव राहता कामा नये. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून इतर भाषिक येवून त्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की, अरे भाषेचं मंदीर कसं बांधावं, तर या मंदीरासारखं बांधावं एव्हढं अप्रतिम हे मंदीर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं बांधलं जाईल.

 

 

****

 

मराठी भाषेत अवघड शब्दांचा वापर टाळल्यास ती सामान्य माणसांना समजेल, असंही ते म्हणाले.

पोलीस खात्याच्या ११२ प्रकल्प तसंच महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्हे सायबर गुन्हे प्रतिबंधक प्रकल्पाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी काल केलं.

****

देशात धर्माच्या नावानं माणसा-माणसात अंतर निर्माण केलं जात आहे. अशा धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली जिल्ह्यात शिराळा इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिलं, त्यांच्यावरच टीका करणारे नेतृत्व देशात आहे, अशी टीका त्यांनी केली. शेजारच्या राज्यात अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा चुकीचा निर्णय घेतला आहे. हा धोकादायक प्रकार आहे, असंही पवार यांनी सांगितलं. पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऊसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उपपदार्थ करावे लागतील, असा सल्ला त्यांनी या मेळाव्यात दिला. ऊस शेतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अतिरिक्त ऊसाच गाळप कसं करायचं असा प्रश्न निर्माण होत आहे, ही स्थिती चिंताजनक असून ऊसशेतीबाबत विचार करणं गरजेच आहे, अस ते म्हणाले.

****

अजूनही अनेक निष्ठावंत शिवसैनिकांची भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची इच्छा आहे, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीचा विचार करावा असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. परभणी इथं वार्ताहरांशी काल ते बोलत होते. शिवसेना महायुतीत आली तर, अडीच वर्षांचा मुख्यमंत्री या सूत्राची अंमलबजावणी होऊ शकते, असंही ते यावेळी म्हणाले. सध्या काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट समसमान निधी वाटपावरुन नाराज आहे, महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही असं आठवले म्हणाले. राज्यात भाजप लवकरच परत सत्ता स्थापन करेल असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

****

अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या बॅकअप टू ब्रिलियन्स  धोरणामुळे अल्पसंख्याक समाजातले तरुण मोठ्या प्रमाणावर नागरी सेवांमध्ये निवडले जात आहेत असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. पनवेल इथं काल अंजुमन-ए-इस्लामच्या केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन  नक्वी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये २०१४ पूर्वी अल्पसंख्याक समुदायाचं ५ टक्क्यांहून कमी असलेलं प्रमाण आता १० टक्क्यांहून अधिक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

कोविड महामारीमुळे राज्यात लागू असलेले निर्बंध कालपासून हटवले आहेत. त्याबरोबरच आपत्कालिन व्यवस्थापन कायदाही मागं घेतला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक प्रवासाची ठिकाणं,  रेस्टोरंट्स या ठिकाणी उपस्थितांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही. रेल्वे प्रवासासाठी दुहेरी लसीकरणाची सक्ती यापुढे असणार नाही. मास्क सक्ती नसली तरीही लोकांनी सुरक्षिततेसाठी मास्क वापरावेत, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

****

आमदारांना फुकट घरं देण्याऐवजी पोलिसांना घर दिली पाहिजेत, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. नसेच्या काल मुंबईत गुढी पाडव्या निमित्तानं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार, खासदारांना सरकारनं निवृत्तीवेतन देण्याची गरज नसून ती बंद केली पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीवाद वाढल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७४ हजार झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २५ हजार ५५३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी ३ तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर, नांदेड, परभणी, जालना  तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

कोरोना विषाणू संसर्गाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळं काल राज्यभर गुढीपाडवा, मराठी नव वर्ष स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदात मिरवणुका काढून झालं. मुंबई, पुण्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. पुण्यात काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातली पहिली पर्यायी इंधन परिषद झाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन झालं. कोरोना विषाणू संसर्गामुळं दोन वर्षे बंद असलेलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन कालपासून सुरू करण्यात आलं आहे. काल दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं मंदिरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. तर पदस्पर्श दर्शन मिळाल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क परिधान करावा, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.

****

गुढीपाडव्या निमित्त काल औरंगाबाद शहरात शिवसेनेच्या वतीनं गुलमंडीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुका काढण्यात आल्या. हिंदू शक काल गणना सुरु करणारे सम्राट शालिवाहन राजाच्या प्रतिमेची पैठण इथं मिरवणूक काढण्यात आली. तसंच सातवाहन कालीन तीर्थस्तंभावर गुढी उभारण्यात आली. शालीवाहन राजवटीचे अभ्यासक बाळासाहेब पाटील यांच्या वस्तू संग्रहालयाची इमारत उभारण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

****

दरम्यान, गुढीपाडवा आणि रमजान च्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद सह मराठवाड्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये काल उत्साह दिसून आला. नागरिकांनी पाडव्याच्या निमित्तानं काल घर, सोनं , वाहनं तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी केली. कालच्या एका दिवसात बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला. औरंगाबाद शहरात लेझीम, ढोलपथक तसंच भजनी मंडळांनी मिरवणुका काढून नवीन मराठी वर्षाचं स्वागत केलं

****

काल संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानं रमजान महिन्याचा आज पहिला रोजा राहणार आहे. कोरोना विषयक सगळे निर्बंध शिथील असल्यानं आता मशिदींमध्ये एकत्रित तरावीह ची नमाज अदा करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानचा हा महिना लोकांना गरीबांची सेवा करण्यास प्रेरित करेल तसंत हा महिना आपल्या समाजात शांती, सद्भाव आणि करुणेची भावना वृद्धींगत करेल असं ही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ही रमजान च्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

औरंगाबाद - मनमाड रेल्वे मार्गावर दौलताबादजवळ काल सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डबे घसरल्यानं या मार्गावरची  वाहतूक विस्कळित झाली होती. चार तासांच्या प्रयत्नांनंतर अपघात निवारण यंत्रणेच्या मदतीनं वाहतूक पुर्ववत करण्यात आली. पुर्णा आणि मनमाडहून यासाठी यंत्रणा मागवण्यात आली होती.  या दुर्घटनेमुळं रद्द करण्यात आलेल्या जालना - मुंबई जनशताब्दी तसंच निझामाबाद - पुणे या सकाळच्या गाड्या दुपारी विशेष गाड्या म्हणून सोडण्यात आल्या. अन्य काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला तर काही गाड्या अशंत: रद्द कराव्या लागल्या. नरसापूर जलद रेल्वेनं आलेल्या प्रवाशांना शिर्डीला जाण्यासाठी बसनं सोडण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या येलकी इथल्या सशस्त्र सीमा दलाच्या तळावर काल पहिला दीक्षांत समारंभ झाला. सशस्त्र सीमा दलाचे उपमहानिरीक्षक सेरिंग दोर्जे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २४५ नवप्रशिक्षित सैनिकांचा शपथविधी यावेळी झाला. हे सर्व सैनिक देशसेवेसाठी सज्ज असल्याचं दोर्जे यावेळी म्हणाले. सैनिकांनी देशाची मान उंचावेल, असं कर्तृत्त्व करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशींची अंमलबजावणी केली नसल्याच्या निषेधार्थ लहू प्रहार संघटनेतर्फे काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत, अनुसूचीत जाती आरक्षण वर्गीकरण मागणी कडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केला आहे.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील अंबुलगा इथला बंद पडलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आता ट्वेन्टीवन शुगर लिमिटेड कंपनीनं  चालवण्यासाठी घेतला आहे. काल गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री  अमित  देशमुख यांच्या हस्ते काल यंत्रसामुग्रीचं पूजन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथलं भारतीय स्टेट बँकेचं एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्यानं कापून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला हरियाणा राज्यातून पोलिसांनी अटक केली. आलम अली मोहम्मंद उमर असं या चोरट्याचं नाव असून त्यानं एटीएम मधून नऊ लाख ६४ हजार रुपये रक्कम चोरली होती.

****

नांदेड शहरात वजिराबाद भागात बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचं लोकार्पण काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार मोहन हंबर्डे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता करण्यात आला आहे.

****

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकाल दोन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. हळदीला काल प्रतिक्विंटल कमाल १० हजार ११ रुपये, किमान ८ हजार रुपये तर सरासरी ९ हजार रुपये दर मिळाला.

****

 

 

बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातल्या कवडगाव इथल्या बंधाऱ्या जवळ सेल्फी काढण्याच्या नादात तीन जणांचा काल बुडून मृत्यु झाला. मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.  या बंधाऱ्यावर तहा शेख, सिद्दीकी शेख आणि अन्य एक जण दोन मुलांना घेऊन फिरायला गेले होते. सेल्फी काढत असताना तोल गेल्याने हे पाचही जण बुडू लागले. यामध्ये दोन मुलांना बाहेर काढण्यात यश आलं तर इतर तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...