Monday, 25 April 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

 ठळक बातम्या

·    औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपूल, वेरुळ अजिंठ्यात हेलिकॉप्टर सुविधांसह अनेक प्रकल्पांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

·      उदगीरच्या ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, विविध २० ठराव संमत

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देशवासियांना अर्पण

·      राज्यात १४४ तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण

·      खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

आणि

·      मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज  मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

****

 सविस्तर बातम्या

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्ग, औरंगाबाद शहरात मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपुलांच्या दोन मार्गिका, वेरुळ अजिंठ्यात पर्यटनवृद्धीसाठी हेलिकॉप्टर सुविधा, आदी प्रकल्पांची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं विविध रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते.

या प्रकल्पांमध्ये औरंगाबाद ते तेलवाडी, नगर नाका जंक्शन ते केंब्रीज स्कूल, तसंच शिवूर ते येवला या ८६ किलोमीटर लांबीच्या तीन महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण, तसंच औरंगाबाद ते पैठण या ४२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचं चौपदरीकरण, विविध रस्त्यांचं दुहेरीकरण तसंच काँक्रीटीकरणाचं भूमिपूजनासह, एकूण पाच हजार पाचशे ६९ कोटी रुपये कामांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग १० हजार कोटी रुपये खर्चाचा असून तो पैठण, बीड, आणि अहमदनगर या भागातून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात पार करता येणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

 Byte

 

औरंगाबाद ते पुणे हा नविन द्रुतगती महामार्ग बांधायचं आम्ही ठरवलं आहे. हा मार्ग जवळपास दहा हजार कोटी रुपयांचा आहे. या नविन अलायमेंटमध्ये हा बीड, नगर आणि पैठण या भागातून जाणार आहे. त्याची अलायमेंट फायनल झालेली आहे. पुढच््यावेळी जेंव्हा मी येईन तेंव्हा याच्या भुमीपूजनाकरता येईन, असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि यामुळे औरंगाबाद ते पुणे हा प्रवास केवळ सव्वा घंट्यात पूर्ण होईल

 

 वेरुळ तसंच अजिंठा इथं पर्यटकांकरता सोयीसुविधा उपलब्ध करुन हेलिपॅड उभारणार असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. यामुळे पर्यटनाचा विकास होऊन नवीन रोजगार निर्माण होतील. याकरता लागणारे रस्त्याचे जाळे २०२४ पर्यंत निर्माण करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. धुळे सोलापूर महामार्गावर औट्रम घाटातला बोगदा चार पदरी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात २०२४ पर्यंत २५ हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. औरंगाबाद शहरातल्या डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रकल्पाबाबत गडकरी यांनी माहिती दिली, ते म्हणाले

 Byte

 

औरंगाबादमध्ये एमआरटीएस Mass Rapid Transport system म्हणजे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर जो तयार आहे त्याचंही काम महामेट्रोकडून होत आहे. दोन कॅरिडोअर राहणार आहेत. पहिला कॅरिडोअर चिकलठाणा ते क्रांती चौक ते औरंगाबाद रेल्वेस्थानक असा असेल.ज्याची लांबी जवळपास १२ किमी असणार आहे. आणि याच कॅरिडोअरमध्ये चिकलठाणा ते क्रांतीचौक हा डबलडेकर फ्लायओवरचा समाविष्ट आहे. दुसरा कॅरिडोअर हा औरंगाबाद रेल्वेस्थानक - हर्सुल टी पॉईंट ते सिडको बसस्थानक पर्यंत असेल ज्याची लांबी १३ किमी असेल आणि याकरता मेट्रो देखिल योजना तयार करत आहे.

  

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मनमाडपासून ते नांदेडपर्यंत ७५० कोटी रुपये निधी खर्च करुन, रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं प्रदुषण कमी होईल, रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरण, आणि पीटलाईन या सुविधा औरंगाबादमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचं, दानवे यांनी सांगितलं. औरंगाबाद शहर हे राज्याचा औद्योगिक केंद्रबिंदू असल्याने रस्त्याच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याची भावना डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या संमेलानाच्या समारोप सत्रात, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासह, विविध २० ठराव संमत करण्यात आले. देशाच्या प्रगतीचा आणि भविष्याचा वेध घेणारे साहित्य निर्माण होत असताना, मतभेद आणि मनभेद होणारच, मात्र साहित्यात विरोधी मतांचाही आदर केला जावा, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.

मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार नाहीत यासाठी तातडीने कृती कार्यक्रम आखावा, मराठी शाळांची मागणी करणाऱ्या संस्थांना शासनानं सकारात्मक प्रतिसाद द्यावा, जेम्स लेन आणि अशा तत्सम कुप्रवृत्तीचा निषेध, उदगीर जिल्ह्यासह हत्तीबेटास जागतिक पर्यटनाचा "अ" दर्जा द्यावा, बोलीभाषा आणि आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी ‘बोलीभाषा अकादमीची स्थापना, सीमा भागातल्या मराठी शाळा आणि महाविद्यालयांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत, स्वतंत्र मराठी विद्यापीठाची स्थापना, उदगीर इथं पशूवैद्यकीय विद्यापीठाची स्थापना, बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीसह मराठी सीमाभागाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने सर्व शक्तीनिशी, तर केंद्रानं निःपक्षपातीपणे हे प्रकरण न्यायालयात लढवावं आणि मराठी भाषकांना न्याय देत त्यांचा हक्क मान्य करावा, केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी, त्याचबरोबर आम्ही सर्व साहित्यप्रेमी शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, साहित्य संमेलनाच्या उद्घाटन, समारोप आणि संमेलनातील इतर कार्यक्रमांचं प्रक्षेपण दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून विनाशुल्क करण्यात यावं, आदी ठरावही संमेलनात पारित करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या समारोप सत्राला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. आरोग्य, शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन, राष्ट्रपतीनं यावेळी केलं.

उदगीर संमेलन विलक्षण यशस्वी ठरल्याचं समेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी सांगितलं. या संमेलनानं एक वेगळी प्रतिष्ठा उदगीरला दिली. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, ऊहापोह झाला. आदानप्रदान प्रक्रिया घडून आली, हे अतिशय चांगलं चित्र असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

देशभरातल्या विविध भाषांमधून गाणी गायलेल्या लता दिदी या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचं मूर्त उदाहरण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, काल पंतप्रधानांना मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, या पुरस्काराला उत्तर देताना, पंतप्रधानांनी, हा पुरस्कार समस्त देशवासियांना अर्पण केला. संत मीराबाई यांची प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसिद्ध गायिका संगीतकार मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, यांच्यासह संगीत क्षेत्रातले अनेक मान्यवर संगीतकार, गायक गायिका, या सोहळ्यात उपस्थित होते.

या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातल्या योगदानाबद्दल तरुण गायक राहुल देशपांडे यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार, तर सामाजिक कार्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात' कार्यक्रमातून ते काल नागरिकांशी संवाद साधत होते. रोखविरहित व्यवहार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. देशात सध्या दिवसाला सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार युपीआय च्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. १८ मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर, देशातल्या नागरिकांनी सुटीच्या काळात जवळपासच्या संग्रहालयांना भेट द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यांनी यावेळी केलं. दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेलं प्रधानमंत्री संग्रहालय लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान,  जम्मू काश्मीरमध्ये सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते काल झाली. सरोवर मोहिमेची घोषणा त्यांनी यावेळी केली. या योजनेतून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंचाहत्तर सरोवरं निर्माण केली जाणार आहेत. आज साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या औचित्यानं पंतप्रधानांनी देशभरातल्या सगळ्या ग्रामसभांना संबोधित केलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ८४१ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८३४ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ९५ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ७७ लाख २८ हजार ९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिन अर्जावर २९ तारखेला सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहळा आणि अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांनी नाशिक मध्ये आल्यावर, पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत काल आमदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर. हनुमान चालिसाचं वाचन करण्यासाठी केलेल्या अट्टाहासामुळे, तणाव निर्माण झाला, असा दावा, अजित पवार यांनी यावेळी बोलतांना केला. राज्यात तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर राणा यांच्यामागे प्रत्यक्षात सूत्र हलविणारे वेगळेच कोणी आहेत, अशी शंका गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

****

राज्यातलं माहविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न होत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य मित्र कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व शिकवलं, त्यांच्याच घरासमोर हनुमान चालिसा वाचणं म्हणजे विनोदच असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली.

****

मराठवाड्यात आठही जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले शेत रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामं जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. औरंगाबादमध्ये मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला ठरवून दिलेल्या इष्टांकाप्रमाणे जूनअखेरपर्यंत कामं पूर्ण करावीत, सर्व कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

****

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं थकबाकी भरल्यानं, महावितरणकडून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाअंतर्गत, औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५८, तर जालना जिल्ह्यातल्या १३५ शाळांचा वीजपुरवठा, वीजबिल थकबाकीमुळे तात्पुरता खंडित करण्यात आला होता. वीजबिलांची एकत्रित रक्कम जमा झाल्यानं काल संध्याकाळी या सर्व शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

****

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१ काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये बीड इथले धावपटू अविनाश साबळे, औरंगाबाद इथले सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी, औरंगाबाद इथले उद्योजक अश्विन पावडे यांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शिवूर इथं एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं. बिलोणी गावात होत असलेला हा बालविवाह, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पेट्रोलिंग दरम्यान रोखल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मराठवाड्यात काही भागात परवा रात्री पाऊस झाला. नांदेड, उस्मानाबादसह हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस झाला असून, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, औंढा, वसमत, सेनगाव या तालुक्यात हळद, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरच्या आंब्यांची पडझडही झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या बाराशीव हनुमान या गावात हळद झाकण्यासाठी शेतात गेलेल्या रामप्रसाद चव्हाण या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव इथं ४४ अंश सेल्सियस इतकी झाली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...