Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मे २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग
करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
·
विरोधक जाती आणि धर्माच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न
करत असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप.
·
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड लसीकरण मोहिमेची
गती कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त.
·
मराठवाड्यातल्या भौगोलिक मानांकन प्रात्त केसर आंबा आणि मोसंबी
यांची निर्यात करण्यासाठी सरकार प्रयत्नरत - फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे.
आणि
·
हिंगोली जिल्ह्यात कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू.
****
आता
सविस्तर बातम्या
****
वाराणसी
इथलं ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या चित्रीकरणाला आव्हान देणाऱ्या
याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर
आज सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीशांनी कशाप्रकारे काम करावं याचे आदेश आपण देणार नाही,
असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू करण्यास न्यायालयानं आठ
आठवड्यांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे च्या अंतरिम आदेशाचं
पालन करावं, तसंच जोपर्यंत जिल्हा न्यायाधिश या प्रकरणी काही निर्णयापर्यंत येत नाही,
तोपर्यंत शिवलिंगाची सुरक्षा आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे
आदेश न्यायालयानं दिले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात
पुन्हा सुनावणी होणार आहे.
****
विरोधक
जाती आणि धर्माच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज जयपूर इथं भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या
बैठकीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी
विष टोचण्यासाठी तणावाच्या छोट्या छोट्या घटनांचा शोध घेत असतात, अशावेळी पदाधिकाऱ्यांनी
देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर चिकटून राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. भाजपाला पुढील
२५ वर्षांसाठी राष्ट्रीय उद्दिष्टांवर काम करण्याची गरज आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांसाठी
देशासाठी लक्ष्य साध्य करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचं ते म्हणाले. देशापुढील
सर्व आव्हानांचा सामना आपण सर्वांनी केला पाहिजे, संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहत आहे,
असं पंतप्रधान म्हणाले.
****
शिक्षण
संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संस्कारांवर काम करण्याची गरज
असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. पुण्यातल्या
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या तेराव्या पदवीप्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते.
उच्च शिक्षित लोकांनीही जगातली मोठी वाईट कृत्य केल्याची उदाहरणं आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना
केवळ शिक्षण पुरेसं नसून, त्यांना संस्कारांचीही गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी
त्यांच्या एकूण जीवनात स्थितप्रज्ञ राहून संतुलन राखणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांच्यासह
विविध विभागांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या पदवीप्रदान समारंभात पदवी-पदव्युत्तर शिक्षण
पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली, त्यात २६ सुवर्णपदकं
आणि १२ पीएचडीचा समावेश आहे.
****
राज्यं
आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड लसीकरण मोहिमेची गती कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारनं
चिंता व्यक्त केली असून, मोहिमेला गती देण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव
राजेश भूषण यांनी यासंदर्भातल्या बैठकीत, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, यासाठी
तात्काळ उपाययोजना करण्याचं सूचित केलं आहे. पुढील महिन्यापासून घरोघरी जावून या अभियानाबाबत
जागरूकता निर्माण करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. कोविडच्या मात्रा वाया जाऊ न देण्याचं
आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
काँग्रेस
नेते माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं.
त्यांना ३४ वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं एक वर्ष कारावासाची
शिक्षा सुनावली आहे. २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा इथं गुरनाम सिंग या ६५ वर्षीय वृध्दासोबत
झालेल्या हाणामारीत गुरनाम यांचा मृत्यू झाला होता.
****
श्रीलंकेनं
दिवाळखोरी जाहीर केली आहे. देशात इंधन आणि अन्न धान्याची टंचाई असल्यानं पंतप्रधान
रानिल विक्रमसिंघे यांनी ही घोषणा केली आहे. या अभूतपूर्व गोष्टीला यापूर्वीचं सरकार
जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्याकडे डॉलर्स नाही, आमच्याकडे रुपया नाही,
आमचा देश अस्थिर परिस्थितीत आहे, इंधनाच्या किंमती सातत्यानं वाढत आहे आणि त्यात आणखी
वाढ होत राहील, असंही ते म्हणाले.
****
मराठवाड्यातल्या
भौगोलिक मानांकन प्रात्त केसर आंबा आणि मोसंबी यांची निर्यात करण्यासाठी सरकार प्रयत्नरत
असल्याचं, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. कृषी पणन मंडळ आणि कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं औरंगाबादच्या जाधववाडी इथं आयोजित चार दिवसीय आंबा महोत्सवाचं
उद्धाटन आज भुमरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या
माध्यमातून शहरात केसर आंब्याच्या विक्रीसाठी १२ ठिकाणी आंबा विक्री केंद्र सुरु करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले. केसर आंबा आणि मोसंबी निर्यातीसाठी आवश्यक प्री कुलींग,
कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असून, यांच्या क्षमतेत वाढ करण्यात
येणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली
जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा आणि अत्याचार प्रतिबंधाच्या अनुषंगानं कायदेविषयक
जनजागृतीसाठी राबवण्यात येणारं ‘जननी अभियान’ संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी महिला आयोगाच्या
वतीनं प्रयत्न करण्यात येईल, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी
म्हटलं आहे. हिंगोली इथं पोलिस विभाग, आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्या आज बोलत
होत्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समिती तयार करतांना जाणकार महिलांचीच निवड
करावी, या समितीमध्ये नवनवीन उपक्रम राबवून नवचैतन्य आणण्याचं काम करावं, आदी सूचना
त्यांनी यावेळी दिल्या.
****
हिंगोली
ते सेनगाव राज्य रस्त्यावर सरकळी पाटीजवळ आज सकाळी कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात
कारचा चालक ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हिंगोली इथून सेनगावकडे जात असताना
टेम्पोनं कारला धडक दिली. यात कारच्या समोरील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.
****
चंद्रपूर
जिल्ह्यात चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर इथं आज पहाटे टँकर आणि ट्रक मध्ये झालेल्या
भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या
ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागली. आगीमुळे मृतदेह जळल्याची
प्राथमिक माहिती असून, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
****
बँकॉक
इथं सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं
उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या
अकाने यामागुची चा २१ - १५, २० - २२, २१ - १३ असा पराभव केला.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या बेंबळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातल्या कृषी पर्यवेक्षक अलका सांगळे
यांना दोन हजार रूपयांची लाच घेतांना आज उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
रंगेहाथ पकडलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजेनमधून घेतलेल्या तुषार आणि ठिबक सिंचनच्या
सठाच्या अनुदानाचा अहवाल शासनाकडे ऑनलाईन पाठवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून चार
हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती, तडजोडीअंती दोन हजार रूपये स्वीकारतांना त्यांना
पकडण्यात आलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथल्या देशी दारू दुकानाचा परवाना तत्काळ रद्द
करा, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीनं आज पैठण - औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील निलजगाव
फाट्यावर निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हे नियोजित दुकान मध्यवस्तीत
होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होणार आहे. तसंच रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा
घालणाऱ्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढेल, त्यामुळे हे दुकान नियोजित ठिकाणी सुरू करण्यास
परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे यांनी केली आहे.
****
इतर
मागासवर्ग - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाकडे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष
करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चातर्फे आज धुळ्यात ढोल, नगारे
वाजवत, भाले उंचावत सरकारचा निषेध करण्यात आला. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण मध्यप्रदेश
सरकारनं मिळवून दिलं पण महाराष्ट्रातलं आघाडी सरकार मात्र त्या बाबतीत सपशेल अपयशी
ठरल्याचा आरोप, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी यावेळी केला. आंदोलनात
पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
अमरावती
इथं महागाई विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, आणि गॅस सिलिंडरची
अंत्ययात्रा काढण्यात आली.
राष्ट्रवादी
काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
****
जागतिक
मधमाशी दिनाचं औचित्य साधून धुळे तालुक्यातल्या निमगुळ इथं आज गावातल्या तरुण शेतकऱ्यांना
कृषी विभागाच्या वतीनं अनुदानानं मधमाशा पालन करण्यासाठी ४० ते ५० पेट्या देण्यात आल्या.
यावेळी शेतामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे पेटीत मधमाशा कशा येतात, त्यामुळे उत्पादनात
कशी वाढ होते याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
राजर्षी
शाहू महाराजांच्या कृषी धोरणाला मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री
शाहू छत्रपती मिलमध्ये आजपासून २२ मे पर्यंत कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. विषमुक्त
शेती, किटकनाशकांच्या वापरावर निर्बंध आणि सेंद्रीय शेतीला चालना देणे हे कृषी प्रदर्शनाचं
प्रमुख उद्दिष्ट आहे. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment