Thursday, 26 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी निवासस्थानासह सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे मारले. अनिल परब यांच्या दापोली इथल्या रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे, मात्र तपास पारदर्शक व्हावा, असं उपमुख्यमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा असल्याचं पवार म्हणाले.

****

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांना, ऊर्जा संक्रमणासाठी राज्यस्तरीय सुकाणू समित्या स्थापन करण्यास सांगितलं आहे. ऊर्जा संक्रमणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अनेक मार्गांवर एकत्र काम करावं लागेल, २०२४ पर्यंत कृषी क्षेत्रात शून्य डिझेलसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं आहे. 

****

नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या दोन हजार १०० हून अधिक राजकीय पक्षांच्या विरोधात टप्प्याटप्प्यानं कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. या पक्षांची यादी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाला दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या २९ ए आणि २९ सी कलमाच्या तरतुदींची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई केली जाणार आहे. याअंतर्गत राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते.

****

भाजी आणि फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी. पाटील यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. कर्नाटक राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही 'ई-पिक पाहणी' ॲप कार्यरत असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचं ते म्हणाले. मुंबईत या शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही राज्यांच्या कृषी विषयक योजना, जास्तीत जास्त उत्पादन वाढवणं, कृषी उत्पादकांना थेट बाजार उपलब्ध करून देणं याबाबत विस्तृत चर्चा झाली.

****

नांदेड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकातर्फे सुरू असलेल्या ईलेक्ट्रीक वाहनांच्या तपासणी मोहिमेदरम्यान रस्त्यावर धावणारी आठ वाहनं दोषी आढळून आली असून, त्यापैकी चार वाहनं जप्त केली आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीनं ही माहिती देण्यात आली. वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत, असं आवाहन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

परभणी तालुक्यातल्या पांढरगळा इथले अल्पभूधारक शेतकरी रामेश्‍वर ठोंबरे यांची खाजगी सावकाराकडे गहाण असलेली एक एकर १९ गुंठे शेतजमीन त्यांना परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिले आहेत. ठोंबरे यांनी वडीलांच्या औंषधोपचारासाठी परभणी शहरातल्या सोनार सावकाराकडून चार टक्के व्याज दरानं तीन लाख रुपये घेऊन ही जमीन गहाण ठेवली होती. पैसे देताना सावकाराने ठोंबरे यांची जमीन पत्नीच्या नावे गहाण खत करून घेतलं होतं. व्याजासह मुद्दल परत करताना सावकाराच्या पत्नीने दहा लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. त्यामुळे ठोंबरे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

****

आर्थिक अडचणींमुळे बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर या कारखान्यातून साखरेचं उत्पादन झालं आहे काल साखरेच्या पहिल्या पोत्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. नाशिक सहकारी साखर कारखान्याची क्षमता पुढील हंगामात गाळापापूर्वी वाढवण्यात येईल, अशी माहिती, खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी दिली.

****

१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलांचं कोविड लसीकरण पूर्ण करण्यात नाशिक जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. जिल्हा लसीकरणाचे घटना प्रमुख गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक ६९ पूर्णांक १४ टक्के लसीकरण झालं आहे.

****

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रामकुमार रामनाथन अमेरिकन साथीदार हंटर रीस याच्यासोबत दुसर्या फेरीत पोहोचला आहे. या जोडीनं जर्मनीच्या डॅनियल अल्टमायर आणि ऑस्कर ओटे या जोडीचा पराभव केला. या स्पर्धेत आज सानिया मिर्झाचा महिला दुहेरीचा तर रोहन बोपन्नाचा मिश्र दुहेरीचा सामना होणार आहे. 

****

No comments: