Sunday, 29 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल.

·      तांत्रिक निकष, वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि अविरत संशोधनाद्वारे आयुर्वेद अधिकाधिक लोकप्रिय करावं - राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

·      राज्यात कोरोना विषाणूचं नवं प्रतिरूप आढळल्यानं आरोग्य विभागाला सज्ज राहाण्याच्या सूचना.

आणि

·      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार.

****

राज्यात उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला आहे. नेहमीच्या एक जून या तारखेच्या तीन दिवस आधीच तो केरळमध्ये दाखल झाला, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. केरळात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. हे देशातल्या मोसमी पावसाचं अधिकृत आगमन मानलं जातं. २७ मे च्या आसपासच्या चार दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवला होता.

****

तांत्रिक निकष, वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि अविरत संशोधन या माध्यमातून आयुर्वेद अधिकाधिक लोकप्रिय केलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज उज्जैन इथं अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या ५९ व्या महाअधिवेशनाचं उदघाटन झालं, त्यावेळी कोविंद बोलत होते. सरकार स्थानिक उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी विविध पावलं उचलत असून यासाठी २०१४ मध्ये स्वतंत्र आयुष मंत्रालयाचीही स्थापना करण्यात आल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी डिजिटल पद्धतीने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती लाभ जारी करतील. शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम ते हस्तांतरीत करतील. या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मदत निधीचे पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जातील. कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांचं शिक्षण, राहणं तसंच जेवणाची व्यवस्था तसंच शिष्यवृत्ती द्वारे त्यांना सक्षम बनवणं, वयाची २३ वर्षे पूर्ण झाल्यावर १० लाख रुपये आर्थिक सहाय्य देवून स्वयंपूर्ण तसंच सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

****

राज्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. नागरिकांनी आपलं लसीकरण लवकर पूर्ण करुन घ्यावं असंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी मास्क बंधनकारक करणं गरजेचं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाच्या अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्याचं देखील टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाच्या सात नव्या रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं आज घरी पाठवण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली इथं आज भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमूख, कार्यकर्ते, ग्रामस्थांसह  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा `मन कि बात`हा कार्यक्रम  ऐकला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उस्मानाबाद तालुक्यातल्या सांजा इथं हा कार्यक्रम ऐकला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाद्वारे केलेलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आणि प्रेरणा देणारं, असल्याची प्रतिक्रीया आमदार पाटील यांनी या प्रसंगी नोंदवली.

****

राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल काही दिवसांपुर्वी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. या संदर्भातलं निवेदन त्यांनी राज्य महिला आयोगाला पाठवलं असून त्यामध्ये ही दिलगीरी व्यक्त केली आहे. इतर मागास प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्यानं त्रागानं आपण हे वक्तव्य केल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

****

गोंदिया इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३४९ कोटी २४ लाख रुपयांच्या रस्ता आणि उड्डान पुलाच्या बांधकामाचं भूमिपुजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या कामांमध्ये आमगाव ते गोंदिया या २२ किलोमीटर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम, किडगीपर इथं रेल्वे उड्डान पुल, गोंदिया शहरात गड्डाटोली इथं रेल्वे उड्डान पुल, आणि गोंदिया शहरात बस स्थानकापासून कटंगी पर्यंत रेल्वे वर उड्डान पुल बांधकाम आदींचा समावेश आहे. दरम्यान, भंडारा इथल्या लाखनी आणि साकोलीच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आलं.

****

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यासंदर्भातले अंतिम अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. हा आराखडा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याच्या बातम्या खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या असल्याचं या संदर्भात माहिती देताना महापालिकेचे निवडणूक विभाग प्रमुख डॉ. संतोष टेंगले यांनी म्हटलं आहे.

****

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज जालना इथं या योजनेअंतर्गत शेतकरी गट आणि कंपन्यांना फळं, भाजीपाला वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार वाहनांचं लोकार्पण झालं, त्यावेळी टोपे बोलत होते. शेतकरी कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली फळं, भाजीपाला बाहेर राज्यातल्या बाजारपेठेत पाठवता येणार असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार मिळत असल्याचं टोपे म्हणाले.

****

९६ वावे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन वर्धा इथं होणार असल्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये हे संमेलन घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

****

आकाशवाणी नांदेड केंद्राचा ३१ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. आतापर्यंतच्या काळात आकाशवाणी नांदेड केंद्रानं किसानवाणी, युवावाणी, घरसंसार, गीतशिल्प, गीतगुंजन, फोन फर्माईश अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमानी लोकांची मन जिंकली तसंच अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट बांधावर सारखे कार्यक्रम या केंद्रानं सादर केले. यानिमित्तानं आकाशवाणी परिसरात रक्तदान शिबीर झालं.

****

मध्य रेल्वे विभागानं तांत्रिक कारणांमुळं मुंबई - जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस उद्या आणि परवा अशी दोन दिवस रद्द केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

लडाखमध्ये बस अपघातात वीरगती प्राप्त झालेले सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या विसापूरचे सैनिक विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी विसापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव देह सकाळी दहा वाजेच्या सुमारास लष्कराच्या पथकानं विसापूर इथं आणला होता. सैनिक विजय शिंदे यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

****

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अमरावती इथं विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांनी काल अमरावतीमध्ये दाखल होतांना जागो जागी हनुमान चालीसा पठण केलं, त्यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण केला तसंच मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा सुरू ठेऊन ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

****

औरंगाबाद इथल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आज शहरातल्या शहागंज आणि हिमायत बाग समोरील परिसरात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी शेख खलील उर्फ खोपडी आणि मिर शब्बीर अली या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. त्यांच्याकडून २६ हजार रुपयांच्या १०० गुंगीकारक औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्याखाली या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

खो खो स्पर्धेत पंचांना क्षणात निर्णय घ्यावे लागतात, त्यांच्या त्या एका निर्णयावर खेळाडूंची कारकीर्द अवलंबून असल्यामुळं पंचानी त्यांचा निर्णय अचूक द्यावा, असं राज्य खो -खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. सोलापूर इथं राज्य संघटनेच्या खो-खो पंच शिबिर समारोप प्रसंगी ते बोलत होते. या पंच शिबिरात प्रथमच विक्रमी ३२५ पंच सहभागी झाले होते. महिला पंचाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

****

फ्रेंच टेनिस स्पर्धेत आज भारताचा रोहन बोपन्ना आणि स्लोवेनियाची आंद्रेजा क्लेपैक हे मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत खेळणार आहेत. इक्वाडोरचा गोंजालो एस्कोबार आणि चेक प्रजासत्ताकची लूसी हेराडेका यांच्याविरुद्धचा त्यांचा हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार आहे. महिला दुहेरीमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक सहकारी लूसी हेराडेका यांची उपउपांत्यपूर्व फेरीतली लढत अमेरिकेच्या कोको गॉफ आणि जेसिका पेगुला यांच्याविरुद्ध आज होणार आहे.

****

No comments: