Saturday, 28 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या समूह विकास कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं नवीन मार्गदर्शक तत्वांना मंजुरी दिली आहे. ही तत्वं १५व्या वित्त आयोगाच्या कालावधीत अंमलात आणली जातील. प्रकल्प खर्च पाच कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंत असल्यास या सामूहिक सुविधा केंद्रांसाठी सरकारी अनुदानाची मर्यादा ७० टक्के इतकी, तर १० ते ३० कोटी रुपये इतका प्रकल्प खर्च असल्यास, ही मर्यादा ६० टक्के असेल, असं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. मात्र ईशान्येकडची राज्यं आणि आकांक्षी जिल्ह्यांना ही मर्यादा प्रकल्प खर्चाच्या श्रेणीनुसार  अनुक्रमे ८० आणि ७० टक्के असेल, असं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.      

****

जम्मु काश्मीरच्या बारामुल्ला इथं लष्कर - ए - तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाने आज अटक केली. त्याच्याकडे शस्त्र आणि काही प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हा दहशतवादी पळून जाण्याच्या तयारीत असतांना दैनंदिन तपासणीच्या वेळी सुरक्षा दलांच्या नजरेस पडला होता, त्याची चौकशी केली असता त्यात तो दहशतवादी गटाचा सदस्य असल्याचं सुरक्षा दलाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

थोर क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण करत एक चित्रफित जाहीर केली आहे.

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

देशातल्या अठरा वर्षांवरच्या ८८ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा घेतली असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी म्हटलं आहे. कोवि़ड लसीच्या मात्रा घेतल्या असल्या तरी नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करावं असं अवाहन त्यांनी ट्विट संदेशाद्वारे केलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ३९ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी १३ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ६८५ कोविड रूग्णांची नोंद झाली, ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार १५८ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १६ हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी आर्यन खानची निर्दोष मुक्ताता झाली असल्यामुळे खोट्या गुन्ह्यासाठी तत्कालिन अंमली पदार्थ नियत्रण विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांना केली  आहे. ते आज कोल्हापूर इथं माध्यमांशी बोलंत होते. नवाब मलिक यांनी सातत्याने वानखेडे यांचा खोटोपणा उघड केला होता, आता तो सिद्ध झाला आहे त्याबद्दल मी नवाब मलिक यांचं अभिनंदन करतो असंही राऊत म्हणाले.

****

अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरातल्या विविध कामांची पाहणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केली. कृषि विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या तलावाचं जलपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र शासनाच्या 'अमृत सरोवर' या धर्तीवर या तलावाची निर्मिती करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधल्या जाणाऱ्या अकोल्यातल्या दोन उड्डाणपुलाचं लोकार्पणही आज संध्याकाळी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

****

विधान परिषदेच्या जागेसाठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत बोलताना मुंडे यांनी, सबळ पुरावे मिळाले म्हणून कारवाई झाली, असं म्हटलं आहे.

****

महाजीविका अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या ३३१ महिला बचतगटांना चार कोटी चार लाख ३० हजार रुपयाचं कर्ज वाटप करण्यात आलं. या कर्ज वितरण सोहळ्याचं उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्या हस्ते झालं.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला जळगांव मधून अटक केली आहे. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, पुणे पोलिसांचा सायबर विभाग याचा अधिक तपास करत आहे.

****

No comments: