Saturday, 28 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      देशात पुढच्या वर्षापर्यंत एक हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार - केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

·      मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

·      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

·      श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन २०१० च्या ७९ कोटी रुपयाच्या मुळ आराखड्यास मान्यता

आणि

·      जास्तीत जास्त शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं - बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांचं आवाहन

****

सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र असून, पुढच्या वर्षापर्यंत ही संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्यानं साकारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं नामकरण खाशाबा जाधव क्रीडा संकुल असं करण्याचा समारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. भावी खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंना वर्षाला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

क्रीडा क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधांवर भर दिल्यापासून भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे, विशेषत: दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून, राज्यांनीही अशा प्रकारे तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

****

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. रुग्णांचं निदान करण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागात चाचण्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मास्क सक्ती जरी नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ते म्हणाले,

‍Byte -

ॲक्टीव्ह केसेस सापडण्याची संख्या नक्कीच वाढलेली आहे. ज्या अर्थी संख्या वाढतीये त्या अर्थी असं व्हायला नको की टेस्ट न केल्यामुळे असेच लोक राहून जातील. आणि तशीच लोक जर राहून गेले तर मग ते घरी इंफेक्शन वाढेल आणि त्यामुळे आम्ही टेस्ट वाढवण्याचा एक नक्की निर्णय घेतोय. आज आपण चाळीस हजार टेस्ट दररोज करतोय. मास्क जरी कम्पलसरी नसले तरी आता लोकांना परत अलर्ट कराव लागेल. ज्या अर्थी संख्या वाढतेय, त्या अर्थी आपण मास्क घालण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. सतर्क राहुया एवढं मला यानिमित्त निश्चितंच सांगावसं वाटतं.

****

मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसंच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातल्या ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

****

संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा उमेदवारी हा त्यांच्यातला आणि शिवसेनेतला विषय आहे, इतरांनी त्यात ढवळाढवळ करू नये,सं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपला असून, त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले.

****

ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट आढाव्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार एक आराखडा विकसित करणार आहे. ई-कॉमर्स ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांना वस्तू विकत घेण्यापूर्वी प्रत्यक्ष हाताळता येत नाही, त्यामुळे ते बरेचदा अशा उत्पादनांच्या समीक्षेवर आणि ते उत्पादन वापरलेल्या ग्राहकांच्या मतावर अधिक विश्वास ठेवतात. ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं, या समीक्षकांची सत्यता पडताळणं आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची यासंदर्भातली जबाबदारी या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सावरकरांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा तसंच माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मुंबईमध्ये दादरच्या सावरकर स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या सावरकरांच्या जन्मस्थानी विविध संस्थांनी अभिवादन केलं. सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत या संस्थेच्या स्मारकाच्या नूतनीकरणाला आज प्रारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे भगूर इथं सावरकर यांच्या स्थानबद्धतेच्या कालावधीतल्या त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या लघुपटाचंही लोकार्पण करण्यात आलं. समाज क्रांतिकारक सावरकर अशा आशयावरील या लघुपटामध्ये, सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना केलेलं कार्य दाखवण्यात आलं आहे.

औरंगाबाद शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आज अभिवादन करण्यात आलं. तसंच विटखेडा इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन २०१० च्या ७९ कोटी रुपयाच्या मुळ आराखड्यास मान्यता दिली असल्याची माहिती, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. माहूरगड विकास आराखड्यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक, आदी पायाभूत सुविधांचा समावेश असून, पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्या दृष्टीनं लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक घेऊ, असं चव्हाण यावेळी म्हणाले.

****

जास्तीत जास्त शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यगृहात, श्री श्री नैसर्गिक शेती संस्था आणि एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाच्या, शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा आणि कृषी व्यापार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, त्या आज बोलत होत्या. सेंद्रीय शेती केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित न राहता गावोगावी राहिबाई तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीच्या मार्गाचा अवलंब करावा, महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होत असून, देशासमोर या प्रयोगाचा आदर्श निर्माण होईल, सं कार्य शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहन, आदिवासी मंत्रालयाचे सहसचिव नवल कपूर यांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचं, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या नागमठाण, टेंभी, सटाणा, लाडगाव इथंल्या मंजूर झालेल्या एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन, आज चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी सरकारने जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागासाठी दिला असल्याचं ते म्हणाले.

****

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जालना इथं शिवसेनेच्यावतीनं आज मस्तगडवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. माजीमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होत गॅस सिलिंडची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शिरपूर शहरातल्या पाच कंदील चौकात जाहीर सभा झाली. यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा स्वामीनाथन आयोगाचे सदस्य अतुलकुमार अंजान यांनी संबोधित केलं.

****

No comments: