Friday, 27 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत जगातलं ड्रोन तंत्रज्ञान केंद्र बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भारत ड्रोन महोत्सव २०२२ चं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ड्रोन उद्योगातल्या वाढीमुळे भारतात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून, ड्रोन तंत्रज्ञानाबाबत देशात जो उत्साह दिसत आहे, तो आश्चर्यकारक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ड्रोन हे एक स्मार्ट साधन आहे, जे लवकरच प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा भाग बनणार आहे. कृषी, संरक्षण, पर्यटन आणि आरोग्यसेवा अशा देशातल्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता सुधारण्यात ड्रोनची मदत होईल, असं पंतप्रधान म्हणाले. शेतकर्‍यांचं जीवन अधिक चांगलं करण्यात देखील ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावणार असून, स्वमित्व योजना हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले. या योजनेंतर्गत देशातल्या खेड्यापाड्यात प्रत्येक मालमत्तेचं प्रथमच डिजिटल मॅपिंग करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य कार्ड, ई-नाम किंवा ड्रोन अशा विविध तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये क्रांती होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

ड्रोन उद्योग २०२६ पर्यंत १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल करेल असा अंदाज असून, आज भारतात २७० ड्रोन स्टार्ट-अप असल्याचं नगरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. आपल्याला कुण्या एका पक्षाच्या बंधनात अडकायचं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. घोडेबाजार होऊ नये म्हणून आपण निवडणुकीला समोरं जाणार नाही, ही आपली माघार नसून स्वाभिमान असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

****

सायबर गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी एक आराखडा आणि एक नियामक यंत्रणा तयार केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सायबर गुन्हे हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असून, यासंदर्भात केंद्र सरकार आणि गूगल ला देखील पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांसंदर्भात रेग्युलेटरी यंत्रणा तयार करता येते का याची पडताळणी सुरु असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या, लक्ष्मीदत्त, या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं.

****

राज्यातल्या सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसंच नुतनीकरण प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे, अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईच्या कुपरेज इथल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या कार्यालयात टोपे यांच्या हस्ते गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र - पीसीपीएनडीटीच्या ऑनलाईन वेबपोर्टलचं लोकार्पण काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी तसंच नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

मंकीपॉक्सची लागण झालेल्या एकाही संशयित रुग्णाची नोंद झाली नसली तरी परदेशातून येणारे तसंच यासारखी लक्षणं असलेल्या व्यक्तींवर लक्ष असल्याचं राज्याच्या साथरोग विभागानं स्पष्ट केलं आहे. 'राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे'नंही त्या दृष्टीने नमुन्यांची काळजीपूर्वक तपासणी सुरू केली असून केंद्र सरकारने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सगळ्या सूचनांचं पालन केलं जात असल्याची माहिती राज्याचे साथरोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी काल दिली.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका आणि २२० भूखंडांच्या विक्रीसाठी सोडतीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सदनिकांच्या वितरणासाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत २४ जूनला काढण्यात येईल. इच्छुक अर्जदारांना सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी १० जून ला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल, तर नोंदणीकृत अर्जदारांना ११ जून रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २२ जूनला  म्हाडाच्या संकेतस्थळावर दिली जाईल.

****

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ५७६ स्वयंसहाय्यता समूह कार्यरत असून त्यामध्ये ८० हजार ६७१ कुटुंब समाविष्ट आहेत.

****

No comments: