Monday, 30 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन.

·      केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा परत सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी.

·      राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल.

आणि

·      केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ परिक्षेचा निकाल जाहीर, उत्तर प्रदेशची श्रुती शर्मा प्रथम. 

****

कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते, या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या मुलांना पंतप्रधानांनी आज साहाय्य हस्तांतरित केलं. ज्या मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत, त्यांचा भार कमी करण्यासाठी पीएम केअर्स माध्यमातून मुलांसाठीची ही योजना उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी केलेल्या योगदानामुळे पीएम केअर्स हा उपक्रम शक्य होऊ शकला, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

जालना जिल्ह्यात ११ बालकांना पीएम केअर योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, त्याबाबतचे पासबुक, आरोग्य कार्ड, पंतप्रधानांचं पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सरकार, लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत, अशा शब्दात टोपे यांनी मुलांना आश्वस्त केलं.

याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित करण्यात आलं.

****

केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा परत सुरु करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्राद्वारे केली आहे. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिलं आहे. व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातल्या ७० लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परतावा न मिळाल्यास जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत येन त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असं ते म्हणाले. ही व्याज परतावा योजना सुरु करण्यात जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीक कर्ज देणं हा उद्देश होता, मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी शेतकरी हे ह्या बँकांवर अवलंबून असतात, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं.

दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देखील हा व्याज परतावा परत सुरू करण्याबाबत ठराव करण्यात आला.

****

राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस उपस्थित होते.

मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याचा आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित असून यापुढेही समर्पित राहील, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.

****

साखर कारखान्यांना साखरेबरोबर अल्कोहोल, इथेनॉल आणि वीज निर्मिती करावी लागणार असून, यासाठीचं धोरण साखर कारखान्यांना आखावं लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात बोधेगाव इथल्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचं सुमननगर इथं नियोजित ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी आणि इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन आज पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी दाखवण्यात आला. जास्तीचं साखर उत्पादन न घेता इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे, असं ते म्हणाले.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १६ योजना आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिमला इथं या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार आहेत. २१ हजार कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं वितरण यावेळी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान विकास केंद्रांमध्ये देखील याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

****

मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्र आणि राज्यांमधल्या भाजप सरकारमधले सर्व मंत्री, खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील, असं आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिं यांनी सांगितलं. नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बूथपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत ७५ तासांचा जनजागरण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्वस्तरातले लोकप्रतिनिधी भाग घेतील आणि गावांना भेट देतील. प्रत्येक दिवस हा शेतकरी, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे, असं सिंह यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या चारही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशमधल्या बिजनौर इथल्या श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस युपीएससीनं केली आहे.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन उद्या पाळण्यात येणार आहे. “तंबाखूचा आपल्या वातावरणाला धोकाअसं यंदाचं या दिनाचं घोषवाक्य आहे. त्याअनुषंगानं सामान्य नागरिकांमध्ये विविध प्रकारे समाज प्रबोधन व्हावं, यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विद्यार्थी उद्या ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता रेल्वेस्थानक आणि सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक इथं पथनाट्याद्वारे तंबाखू विरोधी जनजागृती करणार आहेत. महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या वतीनं यावेळी प्रवाशांची मोफत दंत तपासणी करण्यात येणार आहे.

 

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त धुळे तालुक्यातल्या निमगुळ इथं आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अंनिस तर्फे जनजागृती फलक लावून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्याचं आवाहन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून शेळीपालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिकाधिक भर द्यावा, असे निर्देश मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिले आहेत. नांदेड इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. अनुसूचित जाती -जमातीतल्या मुलींच्या शिक्षणावर मानव विकास कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला असून, त्यांना सायकल देण्यात येते तसंच या कार्यक्रमात पात्र गरोदर महिलांना पहिल्या वेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

हनुमानाचं जन्मस्थान हे नाशिक जिल्ह्यातलं अंजनेरी मानलं जातं, मात्र किष्किंधा इथले मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी मात्र नाशिक मध्ये येऊन किष्किंधा हेच हनुमान जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे, त्यासाठी त्यांनी रथयात्रा सुरू केली आहे. मात्र हनुमान जन्मस्थळाचा वाद निर्माण करत शांतता बिघडवणाऱ्या स्वामी गोविंदानंद सरस्वती यांची अपप्रचार करणारी रथयात्रा थांबवावी, अशी मागणी अंजनेरी येथील महंत आणि गावकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे. तसंच आज नाशिक त्र्यंबक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं.

अंजनेरी गडाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असून, हनुमान जन्मस्थळाबाबत संत-महंतांनीही दाखले दिलेले आहेत. अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असून, त्याचे पुरावेदेखील आहेत. त्यामुळे स्वामी गोविंदानंद यांनी उलटसुलट विधाने करणे थांबवावे व त्यांची रथयात्राही थांबवावी, अशी मागणी साधू-महंतांनी केली आहे.

****

नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी नियमित सुरू असतांना अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे २३ मे पासून हरभरा खरेदी बंद झाल्यानं लाखो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून होता. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खासदार चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे मागणीचा यशस्वी पाठपुरावा केला होता, त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.

****

No comments: