Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३० मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार
· राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे
यांना तर काँग्रेसची उत्तर प्रदेशातील कवी इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी
· अॅनिमेशन पटांचा उद्योग विकसित करण्याची भारतात प्रचंड क्षमता - केंद्रीय वाणिज्य
आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचं मत
· ९६वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार
· राज्यात कोविड संसर्गाचे ५५० नवे रुग्ण
· औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक प्रारुप प्रभाग आराखड्याबाबत सामाजिक माध्यमांवर
प्रसारित बातम्या खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या- महापालिकेचं स्पष्टीकरण
· नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, राज्यात आजपासून तुरळक ठिकाणी मेघगर्जना
आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल संघाचा सात गड्यांनी पराभव करत गुजरात
टायटन्स संघांला विजेतेपद
****
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मुलांसाठी
गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कोविड साथीच्या काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना या योजनेच्या माध्यमातून
मदत दिली जाते. याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम पंतप्रधान
हस्तांतरीत करतील. या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मदत निधीचे पासबुक आणि आयुष्मान
भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जातील.
या मुलांचं शिक्षण, राहणं तसंच जेवणाची व्यवस्था तसंच शिष्यवृत्ती द्वारे त्यांना सक्षम
बनवणं, वयाची २३ वर्षे पूर्ण झाल्यावर १० लाख रुपये आर्थिक सहाय्य देवून स्वयंपूर्ण
तसंच सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे
या योजनेचं उद्दिष्ट आहे. देशातल्या एकूण ४ हजार, ३४५ मुला-मुलींना या योजनेचा लाभ
मिळणार आहे. यात महाराष्ट्रातले ७९० मुले आहेत
तर मराठवाड्यातील १८ वर्षापेक्षा कमी वयोगटात औरंगाबाद जिल्ह्यातील २५, जालना ११, बीड
१३, उस्मानाबाद ९, लातूर ७, परभणा आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी पाच, आणि हिंगोली
जिल्ह्यातील तीन मुलांना लाभ दिला जाणार आहे, तर १८ वर्षावरील मुलांमध्ये उस्मानाबाद
जिल्ह्यातील पाच, नांदेड जिल्ह्यातील चार, औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी
दोन तर लातूर जिल्ह्यातील एका मुलाला लाभ दिला जाणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं, विविध राज्यांमध्ये येत्या
१० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काल एकूण १६ उमेदवार जाहीर केले. यामध्ये
महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि
हरियाणा या राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष
गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि अमरावतीचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनं ही आपल्या १० उमेदवारांची यादी जाहीर केली,
यात महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील कवी इम्रान प्रतापगडी यांना तर मुकुल वासनिक यांना
राजस्थानमधून उमेदवारी दिली आहे. राज्यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि संजय पवार
यांनी आपले अर्ज यापूर्वीच भरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रफुल्ल पटेल यांना
राज्यातून उमेदवारी दिलेली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काही
दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या संदर्भातलं निवेदन त्यांनी राज्य महिला आयोगाला
पाठवलं असून त्यामध्ये ही दिलगीरी व्यक्त केली आहे. इतर मागास प्रवर्गाला आरक्षण न
मिळाल्यानं त्राग्यानं आपण हे वक्तव्य केल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
****
अॅनिमेशन पटांचा उद्योग विकसित करण्याची भारतात प्रचंड क्षमता आहे, आपल्याकडे
या क्षेत्रातले अनेक गुणवंत कलाकार आहेत, त्यामुळे आपण भविष्यात या चित्रपट निर्मितीकडे
लक्ष द्यायला हवं, यातून देशातल्या युवकांच्या कलागुणांना वाव मिळेल, तसंच मोठ्या रोजगार
निर्मितीलाही वाव मिळेल. असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी
व्यक्त केलं आहे. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या १७व्या मुंबई आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवाचं काल मुंबईत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यावेळी
ते बोलत होते. माहितीपटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडे काही प्रस्ताव आहेत
आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांना वाणिज्यिक आणि व्यापारी दृष्टीनं चालना देण्याकरता विविध मंत्रालयांना एकत्र आणून सरकारी
पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमात ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर
यांना यंदाचा ‘डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’, गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन, तसंच रावसाहेब दानवे, कपिल पाटील, रामदास आठवले, आणि भागवत कराड हे
केंद्रीय राज्यमंत्री आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते शाजी करून उपस्थित होते.
****
येत्या २१ जून रोजी ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात ७५ ठिकाणी मोठ्या स्वरुपात कार्यक्रम
आयोजित केले जाणार आहेत. कोविडविषयक सर्व काळजी घेऊन यात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरुन प्रसारीत
होणाऱ्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यंदाच्या योग दिवसाला ‘संरक्षक वलय‘ हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल. यामध्ये सूर्याचे भ्रमण साजरे केले जाईल, म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या
विविध भागातून जसे जसे भ्रमण करत जाईल, तिथे तिथे आपण योगाद्वारे त्याचे स्वागत करू,
अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
****
९६वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार असल्याची घोषणा महामंडळाच्या
अध्यक्षा उषा तांबे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. पुढील वर्षी जानेवारी
किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये हे संमेलन घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात
आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी केलं आहे. नागरिकांनी आपलं लसीकरण लवकर पूर्ण करुन घ्यावं असंही त्यांनी
सांगितलं आहे. ते म्हणाले...
बाईट
हे जे सगळे रुग्ण आपल्याला आढळलेले
आहेत. ह्यांनी बऱ्यापैकी दोन्ही डोसेस घेतलेले आहेत. आणि त्यामुळेच कदाचित त्यांना
कुठलाही त्रास जाणवलेला नाही. ते संपूर्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. त्यामुळे चिंता
करण्याचं कारण नाही. व्हॅक्सीनेशन होणे हा यामागचा सर्वात महत्वाचा विषय आहे. लसीकरण
करणे आणि त्यामुळे ज्यांचं राहिलं आहे त्यांनी नक्की लसीकरण करुन घ्या. असं माझं यानिमित्तानं
सांगणे आहे. आम्ही आरोग्य विभागाला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अर्लट दिलेला आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ५५० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८५ हजार ९४४ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने
एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या एक लाख ४७ हजार ८५९ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल
३२४ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३५ हजार ८८ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १० शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या दोन हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
राज्य सरकारी रुग्णालयातल्या परिचारिका संघटनेकडून विविध मागण्यांसाठी पुकारण्यात
आलेला संप काल सलग तिसऱ्या दिवशी सुरुच होता. या संपाला राज्य निवासी डॉक्टरांच्या
राज्यव्यापी मार्ड संघटनेनं काल पाठिंबा दिला आहे. कोविड काळात परिचारिकांनी मोलाचं
योगदान दिलं आहे, परिचारिकांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे
विचार करावा असं मार्डनं म्हटलं आहे. अजूनही राज्यसरकारकडून चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं नसल्याचं परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा
तोटे यांनी काल सांग़ितलं.
****
औरंगाबादमध्ये पर्यटकांची वाढती संख्या, औद्योगिक विकास तसंच शहराची वेगानं
होत असलेली वाढ लक्षात घेता विमानांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय अर्थ
राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद विमानतळावर काल फ्लाय
बिग या खाजगी विमान वाहतूक सेवेचा प्रारंभ डॉ. कराड यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते
बोलत होते.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सेवानिवृत्त ज्येष्ठ उद्घोषक अनंत काळे यांचं आज
पहाटे अडीच वाजता पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं .ते ६६ वर्षांचे होते.
जवळपास ३५ वर्ष त्यांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्य केलं. भारदस्त
आवाजाची देणगी लाभलेले अनंत काळे यांचा साहित्य क्षेत्रातही वावर होता. ते एक दिवाळी
अंक ही काढत असत. चारच दिवसांपूर्वी ते औरंगाबादहून पुण्याला रहायला गेले होते. त्यांच्यावर
पुण्यातील न-हे इथं दुपारी १२ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
****
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग आराखडा राज्य निवडणूक
आयोगाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यासंदर्भातले अंतिम अधिकार राज्य निवडणूक आयोगाला
असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. हा आराखडा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याच्या
बातम्या खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या असल्याचं या संदर्भात माहिती देताना महापालिकेचे
निवडणूक विभाग प्रमुख डॉ. संतोष टेंगले यांनी म्हटलं आहे.
****
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं
जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते काल जालना इथं
या योजनेअंतर्गत शेतकरी गट आणि कंपन्यांना फळं, भाजीपाला वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात
आलेल्या चार वाहनांचं लोकार्पण झालं, त्यावेळी टोपे बोलत होते. शेतकरी कंपन्यांना उपलब्ध
करून देण्यात आलेल्या या वाहनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली फळं, भाजीपाला बाहेर
राज्यातल्या बाजारपेठेत पाठवता येणार असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या
आर्थिक उन्नतीला हातभार मिळत असल्याचं टोपे म्हणाले.
****
मध्य रेल्वे विभागानं तांत्रिक कारणांमुळं मुंबई - जालना - मुंबई जनशताब्दी
एक्सप्रेस उद्या आणि परवा अशी दोन दिवस रद्द केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी इथल्या राजश्री शाहू महाराज मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह
सोसायटी-माजलगाव या आर्थिक संस्थेच्या अध्यक्ष -उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाविरुद्ध
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कमी कालावधीत दाम दुप्पट रक्कम तसंच मुदत ठेवींवर जास्त व्याजदर अशी आमिषे दाखवून पाथरी
शहरासह तालुक्यातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले, मात्र करार संपल्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं
आढळून आल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले.
****
नैऋत्य मोसमी पाऊस काल केरळमध्ये दाखल झाला आहे. नेहमीच्या एक जून या तारखेच्या
तीन दिवस आधीच तो केरळमध्ये दाखल झाला, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. केरळात
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. हे देशातल्या मोसमी पावसाचं अधिकृत आगमन मानलं जातं.
२७ मे च्या आसपासच्या चार दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान
खात्यानं यापूर्वीच वर्तवला होता.
दरम्यान, राज्यात आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या प्रामुख्याने
दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
इथल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं काल शहरातल्या शहागंज आणि हिमायत बाग समोरील
परिसरात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी शेख खलील उर्फ खोपडी आणि
मिर शब्बीर अली या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश
आघाव यांनी दिली. त्यांच्याकडून २६ हजार रुपयांच्या १०० गुंगीकारक औषधांच्या बाटल्या
जप्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर
परिणाम करणारे पदार्थ कायद्याखाली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह १४
कार्यकत्यार्त्यांविरुद्ध अमरावती इथं विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात
आले आहेत. त्यांनी काल अमरावतीमध्ये दाखल होतांना जागो जागी हनुमान चालीसा पठण केलं,
त्यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण केला तसंच मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा
सुरू ठेऊन ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये खासगी बस अपघातात वीर मरण आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील
गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रशांत जाधव आणि सातारा जिल्ह्यातील खटाव
तालुक्यातल्या विसापूरचे सैनिक विजय सर्जेराव शिंदे यांच्या पार्थिव देहावर काल लष्करी
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान
रॉयल संघाचा सात गड्यांनी पराभव करत प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स
संघांनं विजेतेपद पटकावलं. प्रथम फलंदाजी करत
राजस्थान रॉयल संघानं, विजयासाठी गुजरात टायटन्स संघासमोर १३१ धावांचं लक्ष्य ठेवलं.
गुजरात टायटन्सनं १८ षटकं आणि एका चेंडूत तीन गड्याच्या मोबदल्यात हे आव्हान पुर्ण
करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
No comments:
Post a Comment