Monday, 30 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविडमुळे आई वडील गमावलेल्या बालकांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी पूर्ण मदत केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते, या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेअंतर्गत १८ ते २३ वर्ष वयोगटातल्या मुलांना निश्चित रक्कम मिळेल आणि २३ व्या वर्षानंतर त्यांना दहा लाख रुपये मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच पंतप्रधान मदत निधीचे पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित करण्यात आले. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे पाटील, कपिल मोरेश्वर पाटील, डॉ. भागवत कऱ्हाड, श्रीपाद नाईक यांच्या हस्ते बालकांना शिष्यवृत्ती आणि आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले. राज्यात सुमारे दोनशेहून अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

****

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान उद्या १६ योजना आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिमला इथं या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार आहेत. २१ हजार कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं वितरण यावेळी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान विकास केंद्रांमध्ये देखील याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळांत प्रत्येक योजनेचा लाभ शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचावा हा राष्ट्राचा संकल्प आहे. गरिबांच्या कल्याणासाठी कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहाता कामा नये असं उद्दिष्ट आहे. यानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या गुंडीपोरा गावात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. चकमकीच्या ठिकाणाहून दोन ए के ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहोळा आज प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यावेळी उपस्थित होते. युद्धाचं स्वरुप बदलत आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करुन तयार राहणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी छात्र अभिमन्यू सिंग राठोड यांना सुवर्ण, अरविंद चौहान यांना रौप्य आणि नीतीन शर्मा यांना कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं.

****

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद - एन सी टी ई नं, शिक्षक शिक्षण कार्यक्रम मान्यता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संकेतस्थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळामुळे उच्च शैक्षणिक संस्था, तांत्रिक शिक्षण संस्थांच्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देण्याची प्रक्रिया तसंच अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवण्यापासून ते संस्थांच्या तपासणीसह मान्यता आदेश जारी करण्याच्या टप्प्यापर्यंत सुलभता प्राप्त होणार आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दोन लाख २८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी ३१ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नवीन दोन हजार ७०६ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ७० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. काल २५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला तर देशात सध्या १७ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची सौम्य वाढ होत असतानाच लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला पुन्हा गती देण्यासाठी राज्यात येत्या एक जूनपासून ‘हर घर दस्तक’ योजना पुन्हा राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे काल ही माहिती देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती कमी होत असल्याचं लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व राज्यांना एक जूनपासून ‘हर घर दस्तक’ या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची सूचना केली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...