Friday, 27 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांसह सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे तर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना कर्ज घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

·      हमी भावानं केली जाणारी हरभऱ्याची खरेदी २८ जूनपर्यंत वाढवण्याची राज्य सरकारची केंद्र शासनाला विनंती

·      परभणी आणि हिंगोलीसह राज्यातील पाच जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाची जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि अठरा उपविभागीय कार्यालयं सुरु करणार

·      राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी

·      राज्यात कोविड संसर्गाचे ५११ नवे रुग्ण

आणि

·      कमिशन वाढवण्याच्या मागणीसाठी ३१ मे पासून इंधन खरेदी न करण्याचा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचा इशारा

****

सविस्तर बातम्या

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे मारले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. परब यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर देखील ईडीनं काल छापे घातले. जवळपास तेरा तास ही कारवाई सुरू होती. संचालनालयानं परब यांच्या चौकशीसाठी यापूर्वी समन्स बजावलं होतं. दापोलीमध्ये जमिन खरेदी-विक्री संदर्भात आर्थिक घोटाळा केल्याचा परब यांच्यावर आरोप असून, संचालनालय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. परब यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे, मात्र तपास पारदर्शक व्हावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते, असा आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा असल्याचं पवार म्हणाले.

****

डीएचएफएल आणि येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं काल अटक केली. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं गेल्या महिन्यात भोसले यांच्या घरासह स्थावर मालमत्तांची झडती घेतली होती. यावेळी जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना काल अटक करण्यात आली. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवान यांच्या विरोधातल्या २०२० मधल्या एका प्रकरणासाठी ही कारवाई करण्यात आली. कपूर यांनी त्यांच्या मालकीच्या कंपन्यांद्वारे स्वकीयांना अवाजवी फायद्यांच्या बदल्यात येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल ला आर्थिक साहाय्य देण्यासाठी कट रचला होता. हा घोटाळा २०१८ मध्ये उघडकीस आला होता.

****

कोविड बाधित रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून, राज्यातल्या जनतेनं मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोविड पूर्णपणे संपलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. 

****

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथीला नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतल्या खारघर इथं, तीन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला.

****

हमी भावानं केली जाणारी हरभऱ्याची खरेदी २८ जूनपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून, त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचं, उमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं. या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून, हरभऱ्याच्या खरेदीची अंतिम तारीख २९ मे २०२२ असल्याचं त्यांनी सांगितलं. ही तारीख वाढवण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. सध्या हरभऱ्याचा बाजारभाव ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल आहे. गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालचं क्षेत्र २२ लाख ३१ हजार हेक्टर, तर एकूण उत्पादन २३ लाख ९७ हजार टन इतकं होतं. सध्या सरासरी एकरी उत्पादन १ हजार १५८ क्विंटल प्रती हेक्टर आहे.

****

मृद आणि जलसंधारण विभागाची पाच जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयं आणि अठरा नवीन उपविभागीय कार्यालयं सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. परभणी, हिंगोली, रायगड, नंदुरबार, भंडारा या पाच ठिकाणी नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयं सुरू करण्यात येणार असून, परभणी जिल्ह्यात सेलू आणि पाथरी, हिंगोली जिल्ह्यात वसमत, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह राज्यात अठरा ठिकाणी नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालयं सुरू करण्यात येणार आहेत.

****

शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काल राज्यसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अन्य आमदार आणि खासदार उपस्थित होते. या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र असून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर निवडून येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असून, ते ३१ तारखेला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निश्चित झाल्यानंतर तेही अर्ज दाखल करतील. या निवडणुकीत सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुंबईत सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

****

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं आदेश दिला तर पक्ष राज्यसभेची तिसरी जागा लढवेल आणि जिंकेलही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. भाजपचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते, असं ते म्हणाले. शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीनं मारलेल्या छाप्याविषयी बोलताना पाटील यांनी, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ५११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८४ हजार ३२९ झाली आहे. राज्यात काल या संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५७ झाली आहे तर मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३२४ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३४ हजार ११० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या, लक्ष्मीदत्त, या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते, लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

****

३१ मे पासून इंधन खरेदी करणार नसल्याचा इशारा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन या पेट्रोल पंप चालक संघटनेनं दिला आहे. औरंगाबाद पेट्रोल पंप चालक संघटनाही यामध्ये सहभागी होणार असून, संघटनेचे सचिव अकिल अब्बास यांनी यासंदर्भातलं निवेदन प्रशासनाला काल दिलं. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या अपूर्व चंद्र समतीनं इंधन विक्रेत्यांना प्रत्येक सहा महिन्यानंतर इंधनावरील कमिशन वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, २०१७ पासून हे कमिशन वाढवून मिळालं नसल्यानं, इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालक संघटनेनं घेतला असल्याचं, अब्बास यांनी सांगितलं. सरकार जेंव्हा पेट्रोल - डिझेल दरात आठ ते नऊ रुपयांनी कपात करतं तेंव्हा पेट्रोल पंपचालकांना याचं मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं ते म्हणाले.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेचं उर्वरित काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत हेाते. या योजनेसाठी खोदण्यात आलेली रस्त्यांची कामं मजुरांची संख्या वाढवून पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्याच्या सुचनाही बनसोडे यांनी यावेळी दिल्या. दिवसाला कमीत-कमी २०० नळ जोडणी करून वाढीव भागातली नळ जोडणी पूर्ण करावी, तांत्रिक तसंच सौरऊर्जा प्रकल्पाच्या अडचणी दुरूस्त कराव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. बीड जिल्ह्यात किल्लेधारुर परीसरातही काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे. अमरावती जिल्ह्यातही काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. अमरावती शहरासह जिल्ह्यात तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यातल्या मुकुटबन आणि परिसरातील बहुतांश भागातही काल वादळी पाऊस झाला.

दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments: