Tuesday, 31 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 


·      सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे- पंतप्रधान नरेन्द्र मोदी.

·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद.

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी.

·      सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा, नांदेडच्या दत्ता भगत यांचा विजेत्यांमध्ये समावेश. 

आणि

·      पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यभरातून अभिवादन.

****

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा संदेश पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज दिला. केंद्रात भाजप सरकारनं आठ वर्षं पूर्ण केल्याच्या निमित्तानं देशभरात आयोजित केल्या गेलेल्या गरीब कल्याण संमेलन, या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शिमला इथून भाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या आठ वर्षांच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीनं भ्रष्टाचार कमी झाला,२०१४ पूर्वी देशात लूटमार आणि भ्रष्टाचाराची चर्चा होत असे, आता सरकारी योजनांची चर्चा होते, असं पंतप्रधान म्हणाले. गरीबकल्याण आणि सुशासनासाठी केलेल्या योजनांनी सरकारची व्याख्या बदलली असून, देशवासी आता सरकारकडे सत्ताधीश म्हणून नाही तर एक सेवक म्हणून पाहतात, असंही ते म्हणाले. आजचा नवीन भारत हा शत्रूच्या नजरेला नजर देणारा आणि त्याचवेळी गरजू राष्ट्रांना दबावरहित मदतीचा हात पुढे करणाराही आहे असं पंतप्रधान म्हणाले. विविध क्षेत्रात होत असलेल्या विकासकामांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अकराव्या हप्त्याचं हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातले केंद्रीय राज्यमंत्री विविध ठिकाणांहून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरहून, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याहून तर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादहून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं समाजातल्या सर्वच घटकांसाठी १६२ प्रकारच्या कल्याणकारी योजना आणल्या असून या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद इथं एक माहिती केंद्र सुरु करण्याची गरज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं गरीब कल्याण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भारत झपाट्यानं प्रगतीकडे वाटचाल करत असून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत पाच देशांमध्ये सहभागी झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद साधला. योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रशासकीय यंत्रणेनं या योजना राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर नियोजनपूर्वक लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागानं राज्यस्तरीय संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही चाळीस टक्के वाटा आहे असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा तर २०२२-२३ साठी जल जीवन मिशन योजनेकरता एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ असं चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावेळी लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसंच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का हे जाणून घेतलं.

यावेळी औंरगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या रायपूरचे बाळू राऊत, सिल्लोड तालुक्यातल्या भराडीचे कृष्णा महाजन आणि फुलंब्रीच्या सुवर्णा भुईगळ यांनी योजनांच्या लाभाविषयी मनोगत व्यक्त केलं.

****

सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी आशा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. देशमुख यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय कडून विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं एक एप्रिलला फेटाळली होती.

****

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लोककलाक्षेत्रातल्या प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्यासाठीचा विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार आतांबर शिराढोणकर आणि संध्या माने यांना मिळाला आहे.२०२०-२१ या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार नांदेडच्या दत्ता भगत यांना तर २०२१-२२ साठीचा हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. या चार पुरस्कारांसह इतरही विविध पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.

****

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज राज्यभरातून अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी अहिल्यादेवी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. परकीय आक्रमणामुळे पुसल्या गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणांचं संवर्धन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं, असं डॉ.कराड यावेळी म्हणाले.

****

देशात नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण अनुकूल बनलं असून, येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, आज दुपारी नांदेड शहरातल्या काही भागांमध्ये सुमारे अर्धा तास वादळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातही आज दुपारी काही वेळ वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही वादळी वारं आणि ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातही आज दुपारी वादळी पाऊस झाला.

****

तृतीय पंथियांचा अभ्यास करुन त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. तृतीय पंथीयांचा अभ्यास करण्यासाठी आयोग दोन जणांना तीन लाख रुपयांची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर इंथ प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या शिष्यवृत्तीसाठी १० जुनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

****

औरंगाबाद शहर पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान-११' ही विशेष शोधमोहीम येत्या १ ते ३० जूनदरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या महिला आणि शून्य ते १८ या वयोगटातली हरवलेल्या किंवा पळवून नेलेल्या मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पथकाची नेमणूक करण्यात आली असून, शोध लागलेल्या मुलांना कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

****

No comments: