Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
भारतीय महिलांनी देशातल्या
राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली - राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन.
·
कोविड बाधित रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत
असून, राज्यातल्या जनतेनं मास्क वापरण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन.
·
राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात ३६
पूर्णांक ६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक.
·
परिवहन मंत्री अनिल परब
यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे
छापे.
आणि
·
३१ मे पासून इंधन
खरेदी करणार नसल्याचा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचा इशारा.
****
भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका
बजावली असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. केरळमधल्या तिरुवअनंतुरम इथं देशातल्या महिला खासदार
आणि आमदारांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज
बोलत होते. अशा प्रकारची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आजादी का
अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून आयोजित केली आहे. दोन दिवस
चालणाऱ्या या परिषदेत संविधान, स्वातंत्र्यलढा, कायदा, लोकप्रतिनिधित्व अशा विविध परिप्रेक्ष्यातून
महिलांच्या भूमिकेबाबत चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानं इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान,
राष्ट्रपती उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त
मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ, त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या
कालावधीचा आढावा घेणाऱ्या, लक्ष्मीदत्त, या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय
निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु
माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या
प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय
तज्ञ प्राजक्ता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते, लक्ष्मीबाई
पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
कोविड
बाधित रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून,
राज्यातल्या जनतेनं मास्क वापरण्याचं
आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. रुग्णालयात दाखल
रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन
सर्वांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत सांगितलं.
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव
विकास संस्था - सारथीला नियोजन
विभागामार्फत नवी मुंबईतल्या खारघर इथं, तीन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
हरभऱ्याची खरेदी २८ जून २०२२ पर्यंत
वाढवण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून,
त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ
बैठकीत सांगितलं. या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली
असून, हरभऱ्याच्या खरेदीची अंतिम तारीख २९ मे २०२२ असल्याचं त्यांनी सांगितलं. ही तारीख वाढवण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित असल्याचं उपमुख्यमंत्री
म्हणाले.
****
राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि
लघु पाटबंधारे प्रकल्पात ३६ पूर्णांक ६८ टक्के एवढा जलसाठा
शिल्लक आहे. तसंच राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा
करण्यात येत आहे. धरणातल्या जलसाठ्याचा विचार करता अमरावती
विभागात एकूण साठ्याच्या ७४ पूर्णांक २२ टक्के जलसाठा उपलब्ध
आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात तीन हजार ३२७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४५ पूर्णांक १३
टक्के साठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागात ४३ गावं आणि २३ वाड्यांना ५९
टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी
निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली
संचालनालयानं आज छापे मारले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या
दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई
करण्यात आली. संचालनालयानं
परब यांना समन्स बजावलं होतं आणि त्यांची चौकशी केली होती. दापोलीमध्ये मालमत्ता
खरेदी-विक्री संदर्भात आर्थिक घोटाळा केल्याचा परब यांच्यावर आरोप असून, या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. परब यांच्यावर गुन्हा देखील दाखल
करण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या
यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे, मात्र तपास पारदर्शक व्हावा,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार महाविकास
आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते, असा आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. केंद्रीय
यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा असल्याचं पवार म्हणाले.
****
शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी
आज राज्यसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास
मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अन्य आमदार आणि खासदार उपस्थित होते. या
निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र असून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर
निवडून येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असून, ते ३१ तारखेला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार
निश्चित झाल्यानंतर तेही अर्ज दाखल करतील. या निवडणुकीत सहापैकी चार जागांवर
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असं राऊत म्हणाले.
****
३१ मे पासून इंधन खरेदी करणार नसल्याचा इशारा फेडरेशन ऑफ ऑल
महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन या पेट्रोल पंप चालक संघटनेनं दिला आहे. औरंगाबाद पेट्रोल पंप चालक संघटनाही यामध्ये सहभागी होणार असून,
संघटनेचे सचिव अकिल अब्बास यांनी यासंदर्भातलं निवेदन प्रशासनाला आज सादर केलं. केंद्रीय पेट्रोलियम
मंत्रालयाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या अपूर्व चंद्र समतीनं इंधन विक्रेत्यांना प्रत्येक
सहा महिन्यानंतर इंधानावरील कमिशन वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, २०१७ पासून हे कमिशन वाढवून मिळालं नसल्यानं,
इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंप संघटनेनं घेतला असल्याचं,
अब्बास यांनी सांगितलं. सरकार जेंव्हा पेट्रोल
- डिझेल दरात आठ ते नऊ रुपयांनी कपात करते तेंव्हा पेट्रोल पंपचालकांना
याचं मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं ते म्हणाले.
****
साखरेच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असल्याची टीका, स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ते आज कोल्हापूर इथं बोलत
होते. केंद्र सरकारने रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, त्याचा
फटका गहू उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. मात्र आज कांदा एक
रूपया प्रति किलो दराने शेतकर्यांकडून खरेदी केला जात आहे,
त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, असं ते म्हणाले.
यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन होणार असून,
देशात या क्षणाला ८० लाख टन साखर शिल्लक आहे. पुढच्या वर्षी देखील
११० लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. पुढील वर्षीच्या निर्यातीचे
आतंरराष्ट्रीय बाजारातले करार न झाल्यास साखर उद्योगावर
गंभीर परिणाम होतील. म्हणून केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं राजू
शेट्टी म्हणाले. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन
तातडीने साखर निर्यातीचं धोरण राबवावं, असं ते म्हणाले.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातल्या हुंबरट ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श
घेऊन राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याचा आदेश राज्य
सरकारनं दिला होता, त्या पार्श्वभूमीवर हुंबरट
ग्रामपंचायतीन हा निर्णय घेतला आहे.
****
राज्याच्या आरोग्य सेवेत महत्वाचं काम करणाऱ्या परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी
महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्यावतीने आज धुळे इथं आंदोलन
सुरू करण्यात आलं. धुळ्यातल्या
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांनी निदर्शनं
केली. या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची
शासनाने दखल न घेतल्यास २८ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
नांदेड
जिल्ह्यात भोकर तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह मोठ्या
प्रमाणात पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे.
अमरावती जिल्ह्यातही आज मान्सूनपूर्व पाऊस झाला. अमरावती शहरासह जिल्ह्यात तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
****
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा
राज्यसभेची तिसरी जागा लढवेल आणि जिंकेलही, असा
विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment