Sunday, 29 May 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

 

·      देशात पुढच्या वर्षापर्यंत खेलो इंडिया केंद्रांची संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

·      पुण्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाचे सात रुग्ण आढळले

·      राज्यात कोविड संसर्गाचे ५२९ नवे रुग्ण, वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्याचं आवाहन  

·      अमर्याद कामगार भरती करून साखर कारखाने अडचणीत आणणाऱ्या संचालकांबाबत कडक निर्णय घेण्याची आवश्यकता- शरद पवार

·      सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन

·      जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांचं आवाहन

आणि

·      तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी मंदिरात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

****

सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र असून, पुढच्या वर्षापर्यंत ही संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्यानं साकारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं खाशाबा जाधव क्रीडा संकुल नामकरण त्यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. भावी खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंना वर्षाला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

क्रीडा क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधांवर भर दिल्यापासून भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे, विशेषत: दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून, राज्यांनीही अशा प्रकारे तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

****

राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार आणि पाच प्रतिरुपाचे सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्व सातही रुग्ण हे पुणे शहरातील असून ४ ते १८ मे या कालावधीत ते आढळून आले आहेत. यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार पुरुष आणि तीन महिला आहेत. यापैकी दोघां जणांनी दक्षिण आफ्रिका आणि बेल्जीयम देशाचा प्रवास केलेला आहे तर तिघे जणांनी केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केलेला आहे. अन्य दोन जणांनी कोणताही प्रवास केलेला नाही. नऊ वर्षाचा मुलगा वगळता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही मात्रा घेतले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे कोणालाही रुग्णालयात भरती करण्यात आलेलं नाही. विषाणूचा हा नवा प्रकार ओमायक्रान वंशावळीतील असल्यामुळे त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ५२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८ हजार ३९४ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३२५ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३हजार ७६४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ७७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते काल जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. रुग्णांचं निदान करण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागात चाचण्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मास्क सक्ती जरी नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ते म्हणाले,

ॲक्टीव्ह केसेस सापडण्याची संख्या नक्कीच वाढलेली आहे. ज्या अर्थी संख्या वाढतीये त्या अर्थी असं व्हायला नको की टेस्ट न केल्यामुळे असेच लोक राहून जातील. आणि तशीच लोक जर राहून गेले तर मग ते घरी इंफेक्शन वाढेल आणि त्यामुळे आम्ही टेस्ट वाढवण्याचा एक नक्की निर्णय घेतोय. आज आपण चाळीस हजार टेस्ट दररोज करतोय. मास्क जरी कम्पलसरी नसले तरी आता लोकांना परत अलर्ट कराव लागेल. ज्या अर्थी संख्या वाढतेय, त्या अर्थी आपण मास्क घालण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. सतर्क राहुया एवढं मला यानिमित्त निश्चितंच सांगावसं वाटतं.

 

****

मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसंच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातल्या ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

****

संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा उमेदवारी हा त्यांच्यातला आणि शिवसेनेतला विषय आहे, इतरांनी त्यात ढवळाढवळ करू नये, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपला असून, त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेनं संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न देणं म्हणजे छत्रपती घराण्याचा अवमान असल्याचं म्हणनं हे चुकीचं आहे असं मत श्रीमंत शाहू महाराज यांनी नमूद केलं. याबाबत शिवसेनेसोबतची चर्चा फिस्कटली असं म्हणता येईल असं शाहू महाराज म्हणाले. संभाजी राजे यांनी अपक्ष लढावे, ही भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर, यावर आपण सत्य तेच बोलत आहोत आणि वडील शाहू महाराज यांचा आदरच करत असून त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रीया देणार नसल्याचं  संभाजीराजें यांनी काल ट्वीटरवरील संदेशाद्वारे स्पष्ट केलं.

****

बंद होत असलेल्या साखर कारखान्यांचा एक मोठा प्रश्न  भेडसावत असतांनाच  अमर्याद कामगार भरती करून साखर कारखाने  अडचणीत आणणाऱ्या संचालकांबाबत कडक  निर्णयाची आवश्यकता असल्याचं  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात  इस्लामपूर इथं  आयोजित राज्यस्तरीय साखर कामगार मेळाव्यात  ते काल बोलत होते. अवाजवी कामगार भरती करणाऱ्या कारखाना संचालकांकडूनच कामगारांचा पगार वसूल करण्यासह अशा संचालकांना यापुढे  निवडणुक लढवण्यास प्रतिबंध करणारा कायदा करावा लागेल असा इशारा शरद पवार यांनी  यावेळी बोलतांना  दिला. या पार्श्वभूमीवर, सहकार तसंच कामगार मंत्र्यांसह साखर आणि कामगार आयुक्त, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची एक बैठक तातडीनं  घेतली जाईल असं ते म्हणाले.

****

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ २०२२ ला आजपासून  प्रारंभ होत आहे. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, मंत्री पीयूष गोयल, या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या द्वैवार्षिक  महोत्सवाचा उद्घाटन समारंभ वरळी इथल्या  नेहरू केंद्रात, तर चित्रपटांचं प्रसारण, फिल्म डिव्हिजनच्या संकुलात  होणार आहे.

****

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं, असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यगृहात, श्री श्री नैसर्गिक शेती संस्था आणि एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाच्या, शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा आणि कृषी व्यापार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, त्या काल बोलत होत्या. सेंद्रीय शेती केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित न राहता गावोगावी राहिबाई तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीच्या मार्गाचा अवलंब करावा, महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होत असून, देशासमोर या प्रयोगाचा आदर्श निर्माण होईल, असं कार्य शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहन, आदिवासी मंत्रालयाचे सहसचिव नवल कपूर यांनी यावेळी केलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन २०१० च्या ७९ कोटी रुपयांच्या मूळ आराखड्यास मान्यता दिली असल्याची माहिती, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. माहूरगड विकास आराखड्यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक, आदी पायाभूत सुविधांचा समावेश असून, पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्या दृष्टीनं लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक घेऊ, असं चव्हाण यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी मंदिरात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीनं केली आहे. १९९१ ते २००९ या काळात दानपेटी लिलावात ८ कोटी, ४५ लाख, ९७ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचं गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीच्या चौकशी अहवालात स्पष्ट झालं होतं. यामध्ये ९ लिलावदार, ५ तहसिलदार, १ लेखापरिक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या अहवालास पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्यानं हिंदु जनजागृती समितीनं  राज्यव्यापी  आंदोलनाचा शारा दिला आहे. याप्रकरणी न्यायालयीन लढाही देणार असल्याचं  समितीचे  पदाधिकारी  राजन बुणगे यांनी काल  वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

****

राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचं, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या नागमठाण, टेंभी, सटाणा, लाडगाव इथंल्या मंजूर झालेल्या एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन, काल चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे म्हणून महाविकास आघाडी सरकारनं जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागासाठी दिला असल्याचं ते म्हणाले.

****

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जालना इथं शिवसेनेच्यावतीनं काल मस्तगडवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होत गॅस सिलिंडर्सची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

****

नांदेडमध्ये एका गोदामातून सोयाबीन बियाण्याच्या बनावट बॅगा काल कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून जप्त केल्या. मयूरी सोयाबीन असं संबंधीत बॅगांवर नाव असल्याचं आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड शहरात विविध विकास कामांचा काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अण्णाभाऊ साठे चौक -हिंगोली दरवाजा  रेल्वे पुल -  वन विभाग कार्यालय -महावीर चौक-मल्टी पर्पज हायस्कूल ते बंदा घाट रस्त्याचं सिमेंट काँक्रेटिकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकांसह संगम स्थळांच्या सुधारणा कामांचा यात समावेश आहे.

****

 

जालना जिल्ह्यासाठी शासनाकडून मंजूर तरुणांच्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठीचं  आदर्श प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर  विजय राठोड यांनी दिली. जालना इथं काल, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला, या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचं  प्रशिक्षण केवळ प्रमाणपत्रासाठी न घेता ते गांभीर्यानं -प्रामाणिकपणे घ्यावं  असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यातून तब्बल १०२ तरुणांची विविध स्थापनांध्ये नोकरीसाठी निवड झाली.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सावरकरांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला काल अभिवादन करण्यात आलं. तसंच विटखेडा इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातही सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं.

उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं 

बीड, परभणी, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयास्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं.

****

हवामान

येत्या चोवीस  तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...