आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल
परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी निवासस्थानासह सात ठिकाणांवर सक्तवसुली
संचालनालयानं आज छापे मारले. अनिल परब यांच्या दापोली इथल्या रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई
झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय
बृहत् आराखड्याच्या धर्तीवर राज्यांनीही गती शक्ती बृहत् आराखडा तयार करावा, असं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यासाठी राज्यपातळीवर विभाग गठीत करावेत,
असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगती मंचाची बैठक झाली.
आठ प्रकल्प आणि एका कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रासह १४ राज्यांशी
संबंधित असलेले हे आठ प्रकल्प ५९ हजार ९०० कोटी रुपये खर्चाचे आहेत.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुराग ठाकूर यांनी कोविड १९ महामारीच्या आव्हानात्मक काळात भारतीय माध्यमांच्या
भूमिकेचं कौतुक केलं. १७ व्या आशिया माध्यम परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित
करताना ते बोलत होते. भारतीय माध्यमांनी कोविडच्या काळात कोविड जागरूकता संदेश, महत्त्वपूर्ण
सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांचा
मोफत सल्ला देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली. दूरदर्शन आणि
आकाशवाणीनं तत्पर कव्हरेज, गावोगावच्या बातम्या आणि सार्वजनिक आरोग्यावर कार्यक्रम
आयोजित करुन कठीण काळात सार्वजनिक सेवेच्या सरकारी आदेशाचं वितरण केलं, असं ठाकुर म्हणाले.
****
औरंगाबाद शहरातल्या बापू
नगर आणि पैठणगेट भागातला पाणी प्रश्न तातडीनं सोडवावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट
पक्षाच्या वतीनं काल महानगरपालिकेवर पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मुबलक
पाणी, पाण्याचा सहा ते सात दिवसांचा खंड कमी होत नाही, दुषित आणि कमी दाबाने पाणी हे
प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत वारंवार पदयाञा काढून आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड अभय
टाकसाळ आणि महिला आंदोलकांनी यावेळी प्रशासनाला दिला.
****
No comments:
Post a Comment