Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी
जन्मठेप तसंच १० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा
· राज्यसभे पाठोपाठ राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक
· इतर मागासवर्गीय आरक्षणानंतरच आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाः शरद
पवार
· ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचा मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा
· राज्यात काल कोविड संसर्गाचे ४७० नवे रुग्ण
· दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण
आणि
· औरंगाबाद-जालना मार्गावर झालेल्या अपघातात जीप चालकासह पाच जण जागीच ठार तर
दोन जण जखमी
****
सविस्तर बातम्या
जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला
दिल्लीच्या न्यायालयानं भारत सरकार विरोधात युद्ध पुकारणे तसंच दहशतवाद्यांना पैसा
पुरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा तसंच १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विघातक
प्रतिबंधक कायदा तसंच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांअंतर्गत दाखल गुन्ह्यात
विशेष न्यायाधीश प्रवीणसिंह यांनी मलिक याला वेगवेगळ्या कालावधीसाठी
तुरूंगवासाच्या शिक्षा सुनावल्या. शिक्षा सुनावल्यानंतर मलिकची रवानगी तिहार
कारागृहात करण्यात आली. मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं
दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यापूर्वीच्या सुनावणीत यासीन
मलिकनं आरोप स्वीकारले होते.
दरम्यान, जम्मू काश्मीर मधील श्रीनगर सह काही शहरांत बंदोबस्त वाढवण्यात आला असून
इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
****
राज्यसभे पाठोपाठ राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी २०
जूनला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं काल याबाबत घोषणा केली. निवडणुकीची
दोन जूनला अधिसूचना जारी होईल. ९ जूनपासून
अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
विधान पऱीषदेचे १० सदस्य निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
****
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि
संजय पवार आज आपला उमेदवारी
अर्ज दाखल करणार आहेत. संजय राऊत यांनी काल मुंबईत
वर्ताहरांशी बोलताना, राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार
यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याचं जाहीर केलं. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री
आणि महाविकास आघाडीतले प्रमुखे नेते उपस्थित राहतील, असं ते
म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या
पाठिंब्यानं राज्यसभेसाठी काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज
दाखल केला. काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात
आल्यानंतर सिब्बल यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
****
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणाचा विषय
मार्गी लावूनच निवडणुकांना पक्ष सामोरा जाईल, असं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या
ओबीसी सेलच्या वतीनं काल मुंबईत राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन घेण्यात आलं, या अधिवेशनात ते बोलत होते. केंद्र सरकारनं, ओबीसींची
जातीय जनगणना करावी, समाजातील उच्चशिक्षित बेरोजगार तरूणांना
ओबीसी महामंडळाकडून २५ लाख रूपयांचं कर्ज राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावं,
मुंबई, पुणे सारख्या शहरात ओबीसी
विद्यार्थ्यांसाठी १ हजार विद्यार्थ्यांचं वसतिगृह उभारावं. केंद्र सरकारनं मंडल
आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी करावी, ओबीसी समाजातील
उदयोन्मुख तरूणांना पक्षातर्फे उमेदवारीत २७ टक्के आरक्षण दिलं जावं, सातत्यानं पक्षासोबत काम करणाऱ्या ओबीसी तरूणांना
शासकीय समित्यांमधून स्थान द्यावं, आदी ठराव या अधिवेशनात
संमत करण्यात आले.
****
राज्यातल्या इतर मागास प्रवर्ग - ओबीसी समाजाला
त्यांचं राजकीय आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाच्या राज्य ओबीसी
मोर्चाच्या वतीनं, काल मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा
काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार
यावेळी उपस्थित होते. प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे निघालेल्या या मोर्चाला
पोलिसांनी अडवल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. यावेळी
कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात तसंच ओबीसींना परत राजकीय आरक्षण
देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
****
देहू, आळंदी तसंच पंढरपूरच्या आषाढी
आणि कार्तिकी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना यावर्षीपासून
मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश महिला आयोगानं
पुणे, सोलापूर, आणि
साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वारींमध्ये
राज्यातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. वारी काळात दर
दहा ते वीस किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था करण्यात
यावी, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन
ठिकठिकाणी बसवण्यात यावेत, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा
उपलब्ध करुन देण्यात यावी, महिला सुरक्षिततेकरता हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी तसंच मंदिर परीसरात दर्शनी
भागात लावण्यात यावेत अशा सूचना आयोगानं निर्देशात दिल्या आहेत.
****
अवैध पद्धतीनं कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनानं कारवाई
करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काल दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीनं होणाऱ्या
कर्ज वसुलीबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत
काल ते बोलत होते. सनदशीर मार्गानं कर्ज वसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना
अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात
कर्जदारांनी पोलीसात तक्रार द्यावी, असं आवाहनही गृह राज्यमंत्री देसाई यांनी केलं आहे. मायक्रो फायनान्स
कंपन्यांच्या अवैध कर्ज वसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर
करावा. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं देसाई यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ४७० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८३ हजार ८१८ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू
झाला नाही. आतापर्यंत राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५७ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३३४ रुग्ण
कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३३ हजार ७८६
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार १७५
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची
मागणी शिवसेनेच्या वतीनं काल पोलिस आयुक्त
डॉ.निखील गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना नेते
चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या
शिष्टमंडळानं काल पोलिस आयुक्त कार्यालयात, शहरातल्या खुनांची आणि विविध गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येवर चर्चा केली.
औरंगाबाद शहरात गेल्या चार महिन्यांमध्ये ११ खुनांच्या घटना घडल्या आहेत, त्याचप्रमाणे तलवार, कुकरी, चॉपर
सारखे धारदार शस्त्रे सुद्धा ऑनलाईन बाजारातून मोठ्या
प्रमाणात येत आहेत. गर्भपाताची आणि नशेची औषधं मेडिकलवर आणि ऑनलाईन सर्रास उपलब्ध
होत आहे, तर काही ठिकाणी धार्मिक रंग देऊन वाद निर्माण होत
आहे. या सर्वांवर निर्बंध घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
महापालिकेच्या
विशेष सर्वसाधारण सभेसाठी विषय पत्रिका काढण्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरुन लातूर महापालिकेच्या नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
महापालिका प्रशासक अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश जारी
केले. निलंबनापूर्वी देवडे यांना नोटीस बजावली होती. मात्र याबाबत त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे
त्यांना निलंबित करण्यात आलं. महापालिकेची २० मे रोजी विशेष
सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या विशेष सभेची विषय
पत्रिका देवडे यांनी विलंबानं जारी केली होती.
****
अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राज्य सामाईक
प्रवेश परीक्षा ३० जून ते २० जुलै दरम्यान घेण्याची मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. यामुळे सप्टेंबरमध्ये
शैक्षणिक वर्ष सुरू करता येणं शक्य होईल असं आमदार चव्हाण यांनी राज्याचे उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या
प्रवेश परीक्षा लांबल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थी आणि महाविद्यालयांना
बसेल असंही त्यांनी या निवेदनात नमूद केलं आहे.
****
दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं.
रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम आणि माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी
अशी त्यांची नावं आहेत. रामसिंग हा अहेरी तालुक्यातलया अर्कापल्ली, तर माधुरी ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी आहे.
दोघांवरही खून, चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
शासनानं दोघांवरही प्रत्येकी सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, अशी माहिती, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
****
औरंगाबाद-जालना मार्गावर गाढे जळगाव फाट्याजवळच्या वळणावर काल संध्याकाळी बस आणि
बोलेरो जीप यांच्यात झालेल्या अपघातात जीप चालकासह पाच जण जागीच ठार झाले तर दोन
जण जखमी झाले. लहू राठोड, अशोक चव्हाण, रणजित चव्हाण, विकास ढेरे आणि रोहित ढेरे अशी
या अपघातातील मृतांची नावे आहेत. ते सर्वजण
औरंगाबाद शहरातील रहिवासी होते. भरधाव वेगानं येणाऱ्या जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी
रस्त्याच्या दुभाजकावरून विरूद्ध बाजूला गेली. यावेळी औरंगाबादहून जालन्याकडे
जाणाऱ्या महामंडळाच्या पुणे-कळमनूरी बसवर धडकल्याने हा अपघात झाला. अपघातातील दोघा
जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबादच्या खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत
हिमायतबाग ते पाणचक्कीपर्यंत करण्यात येणाऱ्या कामाची महापालिका प्रशासक
आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल पाहणी केली. तसंच खाम नदीतील नियोजित स्वच्छता, रुंदीकरण,
खोलीकरण, कठड्याचं मजबुतीकरण आदी कामं
मान्सूनपूर्व पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. खाम नदीच्या किनारी असलेल्या
शहराच्या ऐतिहासिक संरक्षक तटबंदीचं नागरिकांकडून होत असलेल्या ऱ्हासाबद्दल
पाण्डेय यांनी चिंता व्यक्त केली. या तटबंदीचं जतन, पुनरुज्जीवन
करण्यासंदर्भात भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधून सूचना
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद
करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. एकल वापर प्लास्टिक निर्मूलन आणि
त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित बैठकीत काल ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची
स्थापना करण्यात आली असून प्लास्टिक कचऱ्याचं मूल्यांकन,
विलगीकरण, संकलन, साठवण
आदी कामं या कृती दलाच्या माध्यमातून केली जातील, अशी माहिती
या बैठकीत देण्यात आली.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची विक्री होत
असल्याचं निर्देशनास आल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड इथं काल एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.
****
हिंगोली जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस
झाला. कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा, रामेश्वर, दांडेगाव, डिग्रस इथं
हलका पाऊस पडला. त्याचबरोबर कोपरवाडी, बोथी, माळ धावंडा या ठिकाणी देखील पाऊस झाला.
नांदेड शहरात काल मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह एक
ते दिड तास अवकाळी पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment