Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२२ सायंकाळी
६.१०
****
· १० दशलक्ष टनांपर्यंत साखर
निर्यात करण्यास केंद्र सरकारची परवानगी.
· राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना
नेते संजय राऊत आणि संजय पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.
· आरक्षणाच्या माध्यमातून मागास
समाजाला दिलेल्या सुविधा ओबीसी वर्गालाही देऊन आधार देण्याची गरज - राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचा मुंबईत मोर्चा.
· औरंगाबाद शहरात कायदा आणि
सुव्यवस्था कडक करण्याची शिवसेनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी.
आणि
· महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा
बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक.
****
केंद्र
सरकारनं १० दशलक्ष टनांपर्यंत साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या काही
महिन्यांत साखरेच्या निर्यातीत झालेली मोठी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं,
सरकारनं म्हटलं आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, साखर कारखानदार आणि निर्यातदारांनी
अन्न मंत्रालयाकडून, निर्यात प्रकाशन आदेशाच्या स्वरूपात मंजूरी घेण आवश्यक आहे. ३१
मे पर्यंत कोणत्याही निर्यात मंजुरी आदेश किंवा मंजुरीशिवाय साखर निर्यातीला परवानगी
देण्यात आली आहे. तर १ जून ते ३० ऑक्टोबर दरम्यान निर्यातीसाठी, निर्यात मंजुरी आदेश
आवश्यक असेल. या निर्णयामुळे साखर हंगामाच्या शेवटी म्हणजेच सप्टेंबर २०२२ पर्यंत,
साखरेचा अंतिम साठा ६०-६५ लाख टन राहील, जो २-३ महिने पुरेल इतका साठा असेल. भारतात
दर महिन्याला सुमारे २४ लाख टन साखरेचा वापर होतो.
****
राज्यसभा
निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल
करणार आहेत. संजय राऊत यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, राज्यसभा निवडणुकीसाठी
संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याचं जाहीर केलं. उद्या अर्ज दाखल करताना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतले प्रमुखे नेते उपस्थित राहतील, असं ते
म्हणाले.
दरम्यान,
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानं राज्यसभेसाठी
आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी
मिळणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिब्बल यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
****
आरक्षणाच्या
माध्यमातून मागास समाजाला दिलेल्या सुविधा ओबीसी वर्गालाही देऊन आधार देण्याची गरज
असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते. समाजाची उपेक्षा टाळण्यासाठी
आरक्षण गरजेचं असून, जातिनिहाय जनगणना केली तरच या देशाला ओबींसीची नेमकी संख्या कळेल
असं ते म्हणाले. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका
असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी समाजाला त्यांचं राजकीय आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी,
भारतीय जनता पक्षाच्या राज्य ओबीसी मोर्चाच्या वतीनं, आज मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा
काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील, सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे निघालेल्या
या मोर्चाला पोलिसांनी अडवल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी
आघाडी सरकारच्या विरोधात तसंच ओबीसींना परत राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोरदार
घोषणाबाजी केली. हे सरकार ब्रिटिशांप्रमाणे वागत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी यावेळी
केली.
****
शिक्षण
घेताना आचरण शुद्ध असावं, समाज, देश आपल्याला सातत्यानं काहीतरी देत असतो, आपण सुद्धा
देशाला देण्याची भावना ठेवली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभात ते आज दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित
होते. सामाजिक ज्ञानाचा अंतर्भाव शिक्षणात व्हावा अशी अपेक्षा, सामंत यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
महाराष्ट्राला
लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्याचा, आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या
नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेनं उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचं, मत्स्यव्यवसाय मंत्री
अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या तारापोरवाला मत्स्यालयात स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, 'महामत्स्य अभियाना'चा शुभारंभ, आज शेख यांच्या हस्ते करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या सहाय्यानं
या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सोबत घेऊन राज्याला मत्स्योत्पादनामध्ये प्रथम क्रमांक
प्राप्त करुन देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
माजी
केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं नवी दिल्ली इथल्या मुख्यालयात चौकशीसाठी
समन्स बजावलं आहे. नियमांचं उल्लंघन करत चीनी नागरिकांना व्हीसा मिळवून देण्याचा त्यांच्यावर
आरोप आहे.
****
औरंगाबाद
शहरात कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं आज पोलिस आयुक्त
डॉ.निखील गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत
खैरे, जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या शिष्टमंडळानं आज पोलिस आयुक्त कार्यालयात,
शहरातल्या खुनांची आणि विविध गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येवर चर्चा केली. औरंगाबाद
शहरात गेल्या चार महिन्यांमध्ये ११ खुनांच्या घटना घडल्या आहेत, त्याचप्रमाणे तलवार,
कुकरी, चॉपर सारखे धारदार शस्त्रे सुद्धा ऑनलाईन बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत.
गर्भपाताची आणि नशेची औषधं मेडिकलवर आणि ऑनलाईन सर्रास उपलब्ध होत आहे, तर काही ठिकाणी
धार्मिक रंग देऊन वाद निर्माण होत आहे. या सर्वांवर निर्बंध घालण्याची मागणी यावेळी
करण्यात आली.
****
महिला
वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक
ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक
म्हणून एव्हिएशन विंग्सनं सन्मानित करण्यात आलं. भारतीय सैन्यदलाची हेलिकॉप्टर हवाई
तुकडी असलेल्या आर्मी एव्हिएशन विंगच्या ३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन समारंभ आज
नाशिकच्या गांधीनगर विमानतळावर दिमाखात पार पडला. आर्मी एव्हिएशन चे डायरेक्टर जनरल
आणि कमांडंट लेफ्टन जनरल अजयकुमार सुरी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
होते.
****
दोन
जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. रामसिंग उर्फ सीताराम
बक्का आत्राम आणि माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी अशी त्यांची नावं आहेत.
रामसिंग हा अहेरी तालुक्यातलया अर्कापल्ली, तर माधुरी ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली
इथली रहिवासी आहे. दोघांवरही खून, चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. शासनानं दोघांवरही
प्रत्येकी सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, अशी माहिती, पोलिस अधीक्षक अंकित
गोयल यांनी दिली.
****
औरंगाबादच्या
खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत हिमायतबाग ते पाणचक्कीपर्यंत करण्यात येणाऱ्या
कामाची महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज पाहणी केली. तसंच खाम नदीतील
नियोजित स्वच्छता, रुंदीकरण, खोलीकरण, कठाड्याचं मजबुतीकरण आदी कामं मान्सूनपूर्व पूर्ण
करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. खाम नदीच्या किनारी असलेल्या शहराच्या ऐतिहासिक
संरक्षक तटबंदीचं नागरिकांकडून होत असलेल्या ऱ्हासाबद्दल पाण्डेय यांनी चिंता व्यक्त
केली. या तटबंदीचं जतन, पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी
संवाद साधून सूचना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारने इंधनावरील कर कमी केल्याची नुकतीच घोषणा केली असून, प्रत्यक्षात इंधनाचे दर
कमी झालेले नाहीत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारने येत्या तीन दिवसात इंधनाचे
दर कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उस्मानाबाद भारतीय जनता युवा मोर्चाच्या
वतीनं देण्यात आला आहे. यासंदर्भात भाजयुमोनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
****
कॉंग्रेसच्या
कार्यकाळात अंमलजबावणी करण्यात न आलेल्या लोकपाल कायद्याची मोदी सरकारने प्रभावी अंमलबजावणी
करत यासंबंधी कायदे करून प्रत्येक राज्याला आदेश द्यावेत, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट
करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. केवळ
लोकपाल कायद्याची अंमबलजावणी केल्यानंतरच देशात भ्रष्टाचाराला आळा बसेल, त्यामुळे अण्णा
हजारे यांनी अपूर्ण सोडलेलं आंदोलन पुर्णत्वास घेवून जाण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन
मोठी जनमोहीम उभारणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली मलिक यानं दिली होती.
****
एकदा
वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर एक जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात आली असून,
याची विक्री होत असल्याचं निर्देशनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे
निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment