Saturday, 28 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

थोर क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण करत एक चित्रफित जाहीर केली आहे. सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि समाजातून अस्पृश्यता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.

****

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. तसंच खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं अनावरण,  भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं कुस्ती केंद्र असलेल्या गुलशे तालीम आणि पुणे महापालिकेच्या तक्षशीला क्रीडानगरीचं उद्घाटन देखील ते करणार आहेत.

****

थॅलेसिमियानं ग्रस्त असलेल्या चार बालकांना रक्त दिल्यानंतर त्यांना एड्सची लागण झाली, आणि त्यापैकी एकाचा नागपुरात मृत्यू झाला, याची स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना नोटिस बजावली आहे. याप्रकरणी सहा आठवड्यात सविस्तर अहवाल द्यावा, असं या नोटिसीत म्हटलं आहे.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजचे सैनिक हुतात्मा प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीत इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लडाख मध्ये लेह जिल्ह्यात तुरतुक जवळ काल सकाळी एक बस कोसळून झालेल्या अपघातात प्रशांत जाधव यांच्यासह सात सैनिकांचा मृत्यू झाला.

****

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथून आज शोभा यात्रा काढण्यात येत आहे. ही शोभा यात्रा ३१ मे रोजी नगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं पोहचणार आहे. या यात्रेत २०० भाविक सहभागी होत आहेत.

****

No comments: