Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
कर्तव्याच्या
मार्गावर चालूनच आपण समाजाला आणि देशाला सक्षम बनवू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आपल्या `मन की बात` कार्यक्रमामध्ये देशवासियांशी संवाद
साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात कर्तव्य हाच आपला
संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी असं त्यांनी म्हटलं. या महिन्याच्या पाच तारखेला
देशातल्या युनिकॉर्नची संख्या शंभरवर पोहोचली असल्याचं तसंच याचं एकूण मूल्य ३३० अब्ज
डॉलरपेक्षा म्हणजे पंचवीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा
जास्त असल्याचं ते म्हणाले. देशात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती
निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांच्या उत्पादनांची
माहिती गोळा करण्याचं आणि त्यांचा वापर करण्याचं
तसंच त्याद्वारे `आत्मनिर्भर भारत मोहिमे`ला चालना देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
`एक भारत, श्रेष्ठ भारत` या संकल्पने संदर्भात आदर्श असलेल्यांची उदाहरणं त्यांनी दिली.
आता आपल्या देशात चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर यात्रा,
जगन्नाथ यात्रा, अशा अनेक यात्रा होणार आहेत. आपण कुठंही गेलो तरी या तीर्थ क्षेत्रांचा
सन्मान राखला पाहिजे. तिथली शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता
काम नये, ते जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक असल्याचं
मोदी म्हणाले. आता काही दिवसांनी येणारा पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस तसंच
२१ जून हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहनही
त्यांनी केलं. पर्यावरणाबाबत आपण सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर
चालणारं असलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी- “मानवतेसाठी योग” ही या योग दिवसाची
संकल्पना आहे, असं त्यांनी सांगितलं. योग दिनाची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असं
ते म्हणाले. कोरोनाविषयी काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. जपानमध्ये आपल्या परंपरांविषयी
खूप माहिती आहे. त्यांचं आपल्या संस्कृतीबद्दलचं समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय
असल्याचं मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवरुन सांगितलं. `मन की बात`
या मालिकेचा हा एकोणनव्वदावा भाग होता.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा
टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ८१
हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात
आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी २८ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना
कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ कोटी ४६ लाखांहून अधिक नागरिकांना
पूरक मात्रा देण्यात आली आहे. दरम्यान, देशात काल नवीन २ हजार ८२८ बाधित
रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, रुग्ण बरे होण्याचा
दर ९८ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या १७ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या बी. ए. चार
आणि पाच प्रतिरुपाचे सात नव्या रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं आज घरी पाठवण्यात
आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सात पैकी सहा रुग्णांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या दोन्हीही
मात्रा घेतलेल्या होत्या त्यामुळंच त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचंही टोपे यांनी
यावेळी सांगितलं. सर्व सातही रुग्ण
हे पुणे शहरातील असून ४ ते १८ मे या कालावधीत ते आढळून आले आहेत. यात एका नऊ वर्षाच्या
मुलासह चार पुरुष आणि तीन महिला आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज
गुजरात टायटंस आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी
स्टेडियम इथं रात्री आठ वाजता ह्या सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटंस हा संघ पहिल्यांदाच
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर राजस्थान
रॉयल्स संघानं २००८ च्या विजेतेपदा नंतर आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत
प्रवेश केला आहे. दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ७३ सामने
खेळवले गेले आहेत.
****
No comments:
Post a Comment