Tuesday, 31 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रात भाजप सरकारची आठ  पूर्ण झाल्यानिमित्त आज देशभरात गरीब कल्याण संमेलनाचं आयोजन केलं गेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमल्यातून दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान  मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता शेतक-यांच्या  बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला.प्रत्येक भारतवासियाचं जीवन समृद्ध करण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा आपला संकल्प आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. २०१४ च्या पूर्वीचे दिवस विसरू नका, ते दिवस लक्षात ठेवले तरच आज परिस्थितीत झालेला बदल लक्षात येईल, असं पंतप्रधान म्हणाले.तेव्हा विविध योजनांचा पैसा सामान्य लोकांपर्यंत पोचत नसे, आज तो लाभार्थ्यांच्या खात्यात थेट  जमा केला जातो, असं पंतप्रधान म्हणाले. केंद्राच्या विविध योजनांचा उल्लेख करत, सामान्य जनतेला विविध सुविधा मिळून जीवनमान उंचावलं असल्याचं, तसंच देशाच्या सीमा आज सुरक्षित असल्याचं पंतप्रधान म्हणाले.करोना काळात देशानं तत्काळ केलेल्या लसीकरण योजनेची प्रशंसा पंतप्रधानांनी केली. डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा उल्लेख करत, आपल्या सरकारनं प्रशासन यंत्रणेला सुधारून लोकाभिमुख केल्याचं पंतप्रधान म्हणाले. या योजनेमुळे पूर्वी दलालांच्या हाती जाणारा पैसा आता लाभार्थ्यांच्या हातात पूर्णपणे पोचतो, असं ते म्हणाले. गरीब नागरिकांना सशक्त करणं हे आपल्या सरकारचं प्राधान्याचं काम आहे, याचा पुनरुच्चार करत, सगळ्याच भारतीय नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.आपलं सरकार व्होट बँकेसाठी नाही तर जनतेसाठी काम करतं,  सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास अशी आपली घोषणा असल्याचं  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जाहीर केलं. 

विविध कल्याणकारी योजनांच्या  लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या संवादाचं औरंगाबाद इथं एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आलं.या गरीब कल्याण संमेलन कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  उपस्थित होते.

केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रतिसाद मिळवण्यासाठी मुंबईमधून केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जनतेशी संवाद साधला.

हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर इथे शतप्रतिशत सशक्तिकरण या धोरणांतर्गत गरीब कल्याण संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा या सोहळ्यात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थीत होते.

****

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना पुढची पाच वर्षं सुरू ठेवण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आता ही योजना पंधराव्या वित्त आयोगाच्या अवधीत, म्हणजे २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत सुरू राहील.या योजनेसाठी सुमारे तेरा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या योजनेतून बिगर शेती क्षेत्रात छोटे व्यवसाय उभारण्याला मदत करून युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातल्या विविध लाभार्थींशी संवाद साधला. योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रशासकीय यंत्रणेनं या योजना राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर नियोजनपूर्वक लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. केंद्रानं बंद केलेला पीक कर्जावरचा दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा ,हा परतावा बंद केल्यानं लाखो शेतकऱ्यांची अडचण होत आहे, असं सांगत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी यात लक्ष घालून हा व्याज परतावा सुरू करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टर भागवत कराड यांना केलं.

****

 


राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत  आज सकाळी अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार,  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख,  महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

****

कोकणातल्या हापूस आंब्याला मराठवाड्यात मागणी असते, त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या केशर आंब्याला कोकणात पसंती मिळावी, अशी अपेक्षा फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी आज औरंगाबादमध्ये व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या, विकेल ते पिकेल-उत्पादक ते ग्राहक ,या योजनेतून, जिल्हा नियोजन समितीनं सुरू केलेल्या केशर आंबा विक्री केंद्राचं  भूमरे यांच्याहस्ते उद्घाटन झालं.त्यावेळी  ते बोलत होते.

****

 

No comments: