Saturday, 28 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      समाज सुधारणेत महाराष्ट्र कायम अग्रणी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं मत

·      घोडे बाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीतून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा माघार

·      लडाखमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात मराठा लाईफ इन्फंट्रीच्या सात जवानांचा मृत्यू, मृतात कोल्हापूर जिल्ह्यातील जवानाचा समावेश

·      मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवला उद्यापासून प्रारंभ

·      राज्यात कोविड संसर्गाचे ५३६ नवे रुग्ण

·      कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट

आणि

·      आयसिस या  आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेसाठी काम केल्याच्या आरोपावरुन परभणीच्या मोहम्मद शाहीद खानला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

****

सविस्तर बातम्या

महाराष्ट्र ही संतांची आणि महात्म्यांची भूमी असून, समाज सुधारणेत महाराष्ट्र कायम अग्रणी असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. पुण्याच्या लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या संत परंपरेने देशातला सामाजिक सलोख्याचा धागा बळकट केला, तसंच लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाज धुरीणांनी देशात जनजागृतीची ज्योत तेवती ठेवली, असं ते म्हणाले.  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप परदेशी यावेळी उपस्थित होते. मंदिराच्या लक्ष्मीदत्त या कॉफिटेबल बुकचं प्रकाशन यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. कोरोना काळात ट्रस्टनं केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर. माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते, लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं.

****

राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल जाहीर केलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी आपल्याला कुण्या एका पक्षाच्या बंधनात अडकायचं नसल्याचं स्पष्ट केलं. घोडेबाजार होऊ नये म्हणून आपण निवडणुक लढवणार नाही, ही आपली माघार नसून स्वाभिमान असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

****

मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोध चिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काल झालं. काळाच्या महत्वाच्या पाऊलखुणा जपणं महत्वाचं आहे आणि त्यामुळेच कागदावरून आता प्रत्यक्ष जमिनीवर नाट्य संग्रहालयाचा हा प्रकल्प साकारणार आहे हे अतिशय समाधान देणारं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी आणि अभिमानास्पद परंपरा आहे आणि त्यामुळे आपल्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती, असं त्यांनी नमुद केलं.

****

सायबर गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी एक आराखडा आणि एक नियामक यंत्रणा तयार केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सायबर गुन्हे हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असून, यासंदर्भात केंद्र सरकार आणि गूगल ला देखील पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांसंदर्भात नियामक यंत्रणा तयार करण्याबाबत पडताळणी केली जात असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

येत्या ३० जूनपर्यंत राज्य शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला आहे. प्रशासकीय कारणासाठी तातडीनं एखादी बदली करणं आवश्यक असेल, तर ती मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं करावी, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.

****

सुयोग्य नियोजन केल्यामुळे कोविड परिस्थितीत तसंच तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही उर्जा विभागानं राज्यात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट २०२१ मध्ये महाराष्ट्रानं ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. ‘इंडिया गव्हर्नन्स फोरमचा एक भाग म्हणून १८ जून ला नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी प्रदान करण्यात येणार आहे.

****

लडाख मध्ये लेह जिल्ह्यात तुरतुक जवळ काल सकाळी एक बस कोसळून झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या मराठा लाईफ इन्फंट्रीच्या सात जवानांचा मृत्यू झाला. तर १९ जण गंभीररित्या जखमी झाले. यात मृत पावलेल्या जवानांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या प्रशांत जाधव या जवानाचा समावेश आहे.  हे २६ जवान पर्तापूर संक्रमण शिबिरातून तुरतुक सेक्टरमधल्या हनीफ भागात निघाले होते. बस चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ही बस रस्त्यावरून घसरून श्योक नदीत कोसळली.

****

देशातला अग्रगण्य चित्रपट महोत्सव- मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ २०२२ उद्यापासून सुरु होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या द्विवार्षिक  महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मुंबईतल्या वरळी इथल्या  नेहरू केंद्रात होणार आहे, तर चित्रपटांचं  प्रसारण, फिल्म डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या विविध अत्याधुनिक चित्रपटगृहांत  होईल. या महोत्सवासाठी, ३० देशांतून एकूण ८०८ प्रवेशिका आल्या आहेत. महोत्सवाच्या  स्पर्धा विभागात, १०२ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यापैकी ३५ आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि ६७ राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात असतील. १८ चित्रपट मिफ्फ प्राइम विभागात दाखवले जातील.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ५३६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८४ हजार ३५४ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५७ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३२९ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३४ हजार ४३९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ५६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सहा जणांना अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं क्लिनचीट दिली आहे. तर १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नसल्याचं एनसीबीचे विभागीय संचालक संजय सिंह यांनी सांगितलं. गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर ला एनसीबीकडून कॉर्डिलिया क्रूझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं, त्यात आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली.

****

आयसिस या  आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेसाठी काम केल्याच्या आरोपाखाली परभणीच्या मोहम्मद शाहीद खानला विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा- एनआयए न्यायालयानं दोषी ठरवलं असून सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईत काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आरोपीला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. परभणी- हिंगोली परिसरातल्या तरुणांना नादी लावून आयसिसच्या जाळ्यात ओढण्याचा कट २०१६ मधे राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं उघडकीस आणला होता. त्यातल्या नासिर बिन यफाई- चाऊस या  आरोपीला यापूर्वीच न्यायालयानं७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परीषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर शाई फेकली. निंबाळकर हे विद्यापीठाचे विभाजन करुन उस्मानाबाद इथं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबतचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परीषदेनं मंजूर केला असून राज्य शासनानं यासाठी समिती स्थापन केली आहे.

दरम्यान, काल झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर- डी. लिट ही पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

सुमारे ६० कोटी रुपयांच्या बनावट खरेदी आणि विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन, तसंच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून, शासनाची १० कोटी ४२ लाख रुपयांच्या कर महसुलाचं नुकसान करणाऱ्या, पुण्यातला व्यापारी इरफान इस्माईल शेख याला महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं अटक केली आहे. त्याला पुण्याच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मेसर्स अयान ट्रेडर्स असं त्याच्या फर्मचं नाव आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडे उपलब्ध बीफा, प्राईम, ई वे बिल पोर्टल अशा विविध विश्लेषण प्रणालींच्या आधारे या कर चोरीचा शोध घेतल्याची माहिती अपर राज्य कर आयुक्त कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

****

लातूर महानगरपलिका सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारत असून, हा प्रकल्‍प देशातला पहिलाच प्रायोगिक आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात प्रतिदिवस १५० ते २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. वेस्ट ऑफ ‍एनर्जी या नविन प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्यात या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करून इंधन तसंच चारकोल तयार केलं जाणार आहे. दुसऱ्या टप्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वीत होईल.

****

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात कर्ज वाटप महामेळाव्यात काल ६०८ बचत गटांना सात कोटी ९८ लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं. बचत गटातील महिला आणि मुलींचं शिक्षण, महिला रोजगार निर्मिती, बाल विवाह रोखणं, गावातल्या अनिष्ट प्रथा बंद करणं यासाठी एकत्र येण्याची गरज उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

****

राज्य शासनानं इतर मागास प्रवर्ग - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरता मध्य प्रदेश प्रमाणे सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा, अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. माळी महासंघानं यासंदर्भात सुरु केलेली जनसंपर्क यात्रा औरंगाबाद इथं दाखल झाली आहे.

****

अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करुन जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात औरंगाबाद इथले राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं.

****

मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्सिटिट्यूट - मार्टी ची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी मार्टी कृति समितीच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. आपल्या विविध मागण्याचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

****

कोविड १९ साथीच्या काळात शासनानं निर्धारित करुन दिलेल्या दरा पेक्षा जास्त पैसे रुग्णांकडून वसूल करणाऱ्या औरंगाबाद शहरातल्या ७ रुग्णालयांनी एकूण २१ लाख ७५ हजार ७३४ रुपयांची रक्कम रुग्णांना परत केली आहे. याबाबत रुग्णांनी राज्य शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रार करणाऱ्या २७ पैकी १३ रुग्णांना आकारण्यात आलेलं अतिरिक्त शुल्क परत करण्याचे निर्देश आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या समितीनं  या रुग्णालयांना दिले होते.

****

आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमानं औरंगाबादमध्ये आज आदिवासी शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा आणि कृषि व्यापार महोत्सव-२०२२ चं आयोजन करण्यात आलं आहे. सेंद्रिय खत कसं तयार करायचं, त्याचा योग्य वापर कसा करायचा, याचं प्रशिक्षण तसंच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं, त्याला योग्य भाव आणि योग्य बाजारपेठ याविषयीचं  मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.

****


ग्राहकांना वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी आज आणि उद्या दोन दिवस, औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातले महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी महावितरणच्या केंद्रांवरुन तसंच डिजिटल माध्यमांद्वारे देखील आपल्या चालू आणि थकीत वीज बिलाचा भरणा करावा असं आवाहन  महावितरणनं केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील देगलूर - उदगीर या ६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. हे काम तीन टप्प्यांत पूर्ण केलं जाणार आहे असंही पत्रकात म्हटलं आहे.

****

मध्य रेल्वे विभागात नॉन इंटरलॉकिंग काम करण्यात येणार असल्यानं मुंबई - जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ३० आणि ३१ मे हे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं हि माहिती दिली आहे.

****

मौसमी पावसाचं आगमन येत्या दोन- तीन दिवसांत केरळमध्ये होण्याच्या दृष्टीनं वातावरण अनुकूल आहे, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. याशिवाय अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या काही भागात नैऋत्य मान्सूनची आगेकूच होण्याचीही शक्यता विभागानं व्यक्त केली आहे. सध्या नैऋत्य मान्सून अरबी समुद्राचा दक्षिण भाग, संपूर्ण मालदीव आणि लगतच्या लक्षद्वीप बेटांच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

****

No comments: