Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३१ मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध १६ योजना आणि कार्यक्रमांमधील
लाभार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार
· शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना
निर्देश
· पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा पुन्हा सुरु करण्याची
उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी
· राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज
दाखल
· केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, पहिल्या चारही
स्थानावर महिला उमेदवारांची बाजी
· राज्यात कोविड संसर्गाचे ४३१ नवे रुग्ण
आणि
· हमीभावानं हरभरा खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ
****
सविस्तर बातम्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ योजना
आणि कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिमला इथं
या संमेलनाचं आयोजन केलं गेलं असून, पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं यामध्ये सहभागी होणार
आहेत. २१ हजार कोटींपेक्षा जास्त किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्त्याचं वितरण यावेळी
मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालयं, किसान
विकास केंद्रांमध्ये देखील याचवेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. औरंगाबादमध्ये
कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड तर
जालना जिल्ह्यात बदनापूरमधील कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे सहभागी होणार आहेत.
****
कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण
सहकार्य मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड काळात एक किंवा
दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते,
या योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधला.
जालना जिल्ह्यात ११ बालकांना पीएम केअर योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम, त्याबाबतचे
पासबुक, आरोग्य कार्ड, पंतप्रधानांचं पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सरकार, लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत,
अशा शब्दात टोपे यांनी मुलांना आश्वस्त केलं. याच कार्यक्रमात शाळेत जाणाऱ्या मुलांना
शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरीत करण्यात आली, तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित
करण्यात आलं. औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते २६ बालकांना,
परभणीत जिल्हाधिकारी आंचल गगोयल यांच्या हस्ते सात तर नांदेड जिल्ह्यात ९ मुलांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते
पंतप्रधानांनी दिलेलं प्रमाणपत्र, पीएम केअर्स फॉर चिलड्रन योजनेचं पासबूक, पीएम आरोग्य
कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काल वाटप करण्यात आलं.
****
पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना
पीक कर्जाचं वाटप करावं, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन
यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. या बैठकीत राज्याच्या २०२२-२३
च्या २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यामध्ये
प्राधान्य क्षेत्रासाठी ५ लाख २२ हजार ६८ कोटी रुपयांच्या तर इतर क्षेत्रासाठीच्या
२१ लाख १० हजार ९३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना
कर्ज पुरवठा वाढवावा, तसंच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला
बचतगटांना अधिक कर्ज द्यावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या.
****
केंद्र शासनानं बँकांना पीक कर्जापोटी दोन टक्के व्याज परतावा पुन्हा सुरु करावा,
अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना
पत्राद्वारे केली आहे. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिलं आहे. व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातल्या ७० लाखापेक्षा
जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परतावा न मिळाल्यास जिल्हा सहकारी बँका
आर्थिक अडचणीत येऊन त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असं ते म्हणाले.
****
राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी काल मुंबईत विधान भवनात
उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित
होते.
मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याचा
आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित असून यापुढेही
समर्पित राहील, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी काल मराठीतून शपथ घेत आपला उमेदवारी
अर्ज भरला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे
अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
****
मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्र आणि राज्यांमधल्या
भाजप सरकारमधले सर्व मंत्री, खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील,
असं काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं. नवी दिल्लीतल्या भाजपच्या
मुख्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बूथपासून ते
राष्ट्रीय स्तरापर्यंत ७५ तासांचा जनजागरण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्व
स्तरातले लोकप्रतिनिधी भाग घेतील आणि गावांना भेट देतील. प्रत्येक दिवस हा शेतकरी,
महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी
समर्पित करण्यात आला आहे, असं सिंह यांनी यावेळी
सांगितलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल काल जाहीर केले.
यात पहिल्या चारही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशमधल्या
बिजनौर इथल्या श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यानंतर अंकिता
अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या
गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस आयोगानं केली
आहे.
****
राज्य मार्ग परीवहन महामंडळ- एसटी उद्या १ जून रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
करत असून या दिनाचं औचित्य साधत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 'शिवाई'
या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या पुण्यात होणार आहे,
अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल दिली. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचंही
उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाईच्या लोकार्पणानंतर बालगंधर्व
सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होणार असल्याचं मंत्री परब यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ४३१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८६ हजार ३७५ झाली आहे. राज्यात काल या संसर्गाने
एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५९ झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.
काल २९७ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३५ हजार ३८५ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या तीन हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. “तंबाखूचा आपल्या वातावरणाला
धोका” असं यंदाचं
या दिनाचं घोषवाक्य आहे. त्याअनुषंगानं सामान्य नागरिकांमध्ये विविध प्रकारे समाज प्रबोधन
व्हावं, यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय
दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विद्यार्थी आज सकाळी दहा वाजता रेल्वे स्थानक आणि
सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक इथं पथनाट्याद्वारे तंबाखू विरोधी जनजागृती
करणार आहेत. महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या वतीनं यावेळी प्रवाशांची
मोफत दंत तपासणी करण्यात येणार आहे.
****
पेट्रोलपंप बंद राहण्याच्या अफवेनं काल औरंगाबादच्या ग्रामीण भागातल्या पेट्रोल
पंपावर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी
मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंप चालकांचा कोणताही संप नसून केवळ एका दिवसासाठी पंप
चालक पेट्रोल कंपन्याकडून पेट्रोल - डिझेल खरेदी करणार नाहीत. पंपावर उपलब्ध असलेल्या
पेट्रोल - डिझेलची विक्री सुरुच राहणार असल्याचं औरंगाबाद पेट्रोल पंप डिलर्स संघटनेचे
सचिव अखिल अब्बास यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून शेळीपालन, कोंबडी
पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिकाधिक भर द्यावा, असे निर्देश मानव
विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिले आहेत. नांदेड इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते काल
बोलत होते. अनुसूचित जाती -जमातीतल्या मुलींच्या शिक्षणावर मानव विकास कार्यक्रमात
विशेष भर देण्यात आला असून, त्यांना सायकल देण्यात येते तसंच या कार्यक्रमात पात्र
गरोदर महिलांना पहिल्या वेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जात असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा
खरेदीसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी नियमित
सुरू असतांना अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे २३ मे पासून हरभरा खरेदी बंद झाल्यानं लाखो
क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून होता. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन खासदार चिखलीकर
यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे
मागणीचा पाठपुरावा केला होता, त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या पाझर तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी
जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ही
पाझर तलावं ओसंडून वाहिल्यानं तलावाच्या भिंती वाहून गेल्या तर काही तलावांचे कालवे
फुटले आहेत, यामध्ये १४ तलावांचं अधिक नुकसान झालं असल्यानं त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती
करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरत असून, त्याच्या
निषेधार्थ काल नाशिक जिल्ह्यात प्रहार संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात
आलं. येवला इथं कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं आणि कांद्याचे गडगडणारे
भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात, नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत
देण्यात येणाऱ्या निधीमधून कळंब-ढोकी रोड ते ओम बालरुग्णालय ते बाबा नगर मधील सिमेंट
रस्ता आणि काँक्रीट नालीचं बांधकाम तसंच शहरातल्या दत्त नगर इथल्या सिमेंट रस्ता आणि
काँक्रीट नालीच्या कामांचं उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि माजी आमदार कैलास
पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आल। या कामांमुळे कळंब शहरातील वरील भागातील सांडपाण्याचा
निचरा आणि रहदारीसाठी योग्य रस्ता होणार असून यामुळे नागरिकांच्या सुविधेत भर पडणार
आहे.
****
नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या
पदवी आणि पदव्युत्तर ऊन्हाळी परिक्षा ऑफ लाईन
पद्धतीनं घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यापीठ
परिसरात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना- एन एस यु आय च्या वतीनं काल आक्रोश आंदोलन
करण्यात आलं. त्या नंतर कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment