Tuesday, 31 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच शिमल्याहून ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता जारी करतील. त्याअंतर्गत दहा कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमधे एकवीस हजार कोटी रुपये जमा केले जातील. सरकारची आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आजचा हा गरीब कल्याण संमेलन कार्यक्रम होत आहे.

****

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी युद्ध पातळीवर शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करावं, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा, तसंच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला बचतगटांना अधिक कर्ज द्यावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बँकांनी दिल्या आहेत.

****

देशातल्या पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचं काल नाशिक मध्ये लोकार्पण करण्यात आलं. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्याच्या उद्देशानं त्यांचं प्रबोधन करण्यासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र विभाग तसंच नाशिक महापालिका आणि नाशिक फर्स्ट या संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचं उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांचं बँक खातं आधार संलग्न करून सुरळीत लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल २०२२ पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येत आहे.

****

दक्षिण काश्मीरमधल्या अवंतीपोरा इथे काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन जिहादी दहशतवादी ठार झाले.

****

No comments: