Saturday, 21 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातली अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सोमवारपासून.

·      मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज.

·      देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू.

****

राज्यातली अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया परवा- सोमवारपासून सुरू होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया ‘11thadmission.org.in/’ या संकेत स्थळावर सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. सोमवारपासून सत्तावीस मे पर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज या संकतेस्थळावर भरता येतील. त्या नंतर २८ तारखेला ही सर्व माहिती काढून टाकली जाईल आणि ३० मे पासून अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत, अर्जाचा पहिला भाग भरता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होईल. या केंद्रीय प्रक्रियेद्वारे सर्वसामान्य महाविद्यालयातल्या ८५ टक्के तर अल्पसंख्यांक महाविद्यालयातल्या ३५ टक्के जागांवर प्रवेश दिले जातील. दोन्ही महाविद्यालयांमधल्या दहा टक्के जागा संस्थांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तर पाच टक्के जागा व्यवस्थापन गटासाठी राखीव असतील. अल्पसंख्याक महाविद्यालयातल्या ५० टक्के जागांवर अल्पसंख्याक गटातून प्रवेश दिले जातील, असं या संदर्भात राज्य सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या उर्वरित ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली

जाणार आहे.

****

मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पाच जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर बारा जून ते पंधरा जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालं आहे.

****

मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिली असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी या महोत्सवस्थळी भारतीय दालनातल्या चर्चासत्रात बोलताना व्यक्त केला. ‘जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचं स्थान’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक  आणि अभ्यासक  अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम सहभागी झाले. कान चित्रपट बाजारासाठी निवड करण्यात आलेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘तिचं शहर होणं’ आणि ‘पोटरा’ या  मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक यावेळी उपस्थित होते.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथंल्या विविध ऐतिहासिक स्थळांची आज पाहणी केली. राजे लखोजी जाधव राजवाडा इथंल्या जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देत त्यांनी दर्शन घेतलं. राजवाड्यातल्या पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करुन पवार यांनी यावेळी सूचना केल्या.  

****

चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर इथं झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.

****

इतर मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणासंदर्भात दोन वर्षांत अनुभवजन्य आकडेवारी तयार करण्यात राज्य सरकार कमी पडलं असल्याचा पुनरुच्चार विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे सरकार तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या सुटकेसाठी धडपड करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

****

देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अमरावती इथं आघाडीचा कार्यक्रम झाला, त्यावेळी विधिज्ञ आंबेडकर बोलत होते. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय वाद उकरुन काढण्यासाठी नसल्याचं ते म्हणाले. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेले बौद्ध विहार कुठं गेले, असा प्रश्र्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते ब्राम्हण विरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी ब्राम्हण संघटनांची बैठक बोलावली असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज राजभवन इथं दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातल्या दिल्ली गेट परिसरातील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनंही राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आज तिघांचा मृत्यू झाला. हिंगोली- सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ एका चार चाकी वाहनाशी झालेल्या अपघातात रिक्षातले दोघं मृत्यूमुखी पडले. दुसऱ्या अपघातात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नांदेड - हिंगोली मार्गावर वरुड तांडा इथं दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं एकाचा मृत्यू झाला.

****

औरंगाबाद शहरातल्या पाणी पश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी आज पूर्व मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर आणि महापालिकेच्या हनुमान नगर इथल्या पाण्याची टाकीवर घागर मोर्चा काढला. महिला कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर माठ फोडून महापालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. दररोज पाणीपुरवठा करा, नळाला येणारं अस्वच्छ पाणी बंद करावं, नळजोडणी नसलेल्या वसाहतींमध्ये त्वरित नळ जोडणी देण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी पाणीपुरवठा विभागाला सादर करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. दरम्यान, शहरातल्या सिडको - हडको भागातल्या पाणीप्रश्नासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आज संध्याकाळी नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन पाण्याबद्दलच्या समस्या जाणून घेणार आहेत. सिडकोतल्या एन ११, गजानन नगर, साई मैदान या भागातून कराड यांचा हा संवाद दौरा सुरु होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड जवळच्या गाढेजळगाव इथं होत असलेला बाल विवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना समजावून सांगत त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं आहे. करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

औरंगाबाद शहरातल्या मौलाना आझाद महाविद्यालय आणि असोसिएशन ऑफ मुस्लीम प्रोफेशनल्स यांच्या भरती मेळाव्यात बारा कंपनी सहभागी झाल्या. या मेळाव्यात साडे सहाशे युवक युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या. भरती मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी जी. व्ही. दंदे यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात सहभागी कंपनींमध्ये सॅन्वो, टेकइन्वेन्टो, टिसीएस यांचा समावेश होता.

****

हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. एल. एम. पठाण यांचं आज हिंगोली इथं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. वर्ष १९८५मध्ये ते मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडून आले आणि विविध नगरसेवक मंडळींच्या सहकार्यानं नगरविकास आघाडीच्या बळावर नगराध्यक्ष झाले होते.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...