Monday, 23 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नसल्याचं सांगून, काळजी करण्याची गरज नाही असं ते म्हणाले. सध्या सर्वत्र गर्दी आणि राजकीय मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम होत असूनही कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या फारशी वाढत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात लसीकरणही चांगलं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या एक हजार ९५० असून, हा फार मोठा आकडा नसल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुस्टर डोस देण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीर मध्ये पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना - द  रेसिस्टेंस फ्रंटच्या दोन स्थानिक दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही संघटना लश्कर -ए- तय्यबाची शाखा असल्याचं मानलं जातं. पकडलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारं, दारुगोळा, इतर काही आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल आठ लाख ८१ हजार ६६८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी ३८ लाख ४५ हजार ६१५ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार २२ कोविड रूग्णांची नोंद झाली, ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ९९ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता पैठण गेट इथून या मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेव्हापासूनची पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

इतर मागासवर्ग-ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनानं नियुक्त केलेल्या समर्पित आयोगानं काल नाशिक इथं पाच जिल्ह्यातल्या विविध संघटनांची एकूण ८७ निवेदनं स्वीकारली. नाशिक इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाचे अध्यक्ष जयंत कुमार बांठिया यांच्यासह पाच सदस्यांच्या उपस्थितीत ही निवेदनं स्वीकारण्यात आली. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातून ही निवेदनं आली आहेत.

****

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघानं सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या दीपावली अंकांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. यात संकीर्ण विभागातून नांदेडच्या दैनिक सत्यप्रभाच्या दीपोत्सव या दीपावली अंकाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे. द्वितीय पुरस्कार अमरावतीच्या ज्ञानपथला तर उत्तेजनार्थ सोलापूरच्या लोकमंगल मैत्रला घोषित करण्यात आला आहे.

****

सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा समारोप काल कोल्हापूर इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल असं ते म्हणाले. तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात येत असल्याचंही कदम यांनी सांगितलं.

****

चंद्रपूरच्या सीनाळा जंगलात राज्यातल्या सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. तो १७ वर्षांचा होता. वाघडोह नावाने प्रसिद्ध असलेल्या या वाघानं प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवला होता. आज सीनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्यूमुखी पडल्यानं वन्यजीवप्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात ओझर गावाजवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका कंटेनरमधून ७३ लाख रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. काल या मंदिरावर सुवर्ण कलशाचं रोहण करण्याचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कलश सोहळ्यासाठी भाविकांकडून एक कोटी १६ लाख रूपये जमा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

अकराव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा पहिला सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान इंडोनेशियातल्या जकार्ता इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना सुरु होईल. गतविजेत्या भारताला जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशियासह अ गटात स्थान देण्यात आलं आहे.

आशियायी क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानशी भारताचा दुसरा सामना २४ मे तर यजमान इंडोनेशियासोबत २६ मे रोजी होईल.

****

No comments: