Tuesday, 24 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये सहमती.

·      सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी, एक्क्याऐंशी कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर.

·      राज्यात इंग्रजांच्या काळापासून असलेलं दीक्षांत समारंभाचं स्वरुप बदलून ते मराठमोळ्या पद्धतीचं करण्यात येईल - उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन.

·      राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाचं मारेकरी असल्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस टीका.

आणि

·      सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना बोट उलटल्यामुळे दोन पर्यटकांचा मृत्यू.

****

भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. टोकियो इथं आज क्वाड शिखर परिषपार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांशी सुसंगत राहत कोरियन द्वीपकल्पाला पूर्णपणे अण्वस्त्रमुक्त करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार या नेत्यांनी आज केला. दहशतवाद आणि हिंसक अतिरेकवादाच्या प्रत्येक प्रकाराचा त्यांनी तीव्र निषेध केला. पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठीही या सर्व नेत्यांना सहमती दर्शवली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यवसायाचा सातत्यानं विस्तार होत असून, या दोन देशांची भागीदारी विश्वसनीय असल्याचं पंतप्रधानांनी या चर्चेनंतर बोलताना सांगितलं. अमेरिका विकास वित्त परिषदेसाठी भारत आणि अमेरिका यांच्यात करार झाल्याबद्दल, तसंच दोन्ही देश भारत-अमेरिका लस कृती कार्यक्रमाचं नूतनीकरण करत असल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी आनंद व्यक्त केला. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज  यांच्यासोबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केल्या.

****

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी, एक्क्याऐंशी कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सेवाग्राम विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. याअंतर्गत करण्याची कामं वेळेत पूर्ण व्हावीत तसंच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेच्या ठरलेल्या वार्षिक निधीच्या व्यतिरिक्त दरवर्षी दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी- एक अनुभूती-हा नवा प्रकल्प राबवण्याची परवानगीही आजच्या बैठकीत देण्यात आली.

****

राज्यात इंग्रजांच्या काळापासून असलेलं दीक्षांत समारंभाचं स्वरुप बदलून ते मराठमोळ्या पद्धतीचं करण्यात येईल, सं आश्वासन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. नागपूर इथल्या शासकीय तंत्र निकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ आज सामंत यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी असतो, त्यामुळे असा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रितच असावा, असं ते म्हणाले. दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी उद्योग, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, नामांकित कंपन्यांचे व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा ही गरज होती, मात्र आता ऑफलाईन परीक्षा पद्धती स्वीकार करणं गरजेचं असून, यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवून त्यांचं समुपदेशन करण्यासाठी प्राचार्य आणि प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असं सामंत यावेळी म्हणाले.

****

पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं शहरातल्या दापोडी परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. जुनैद मोहम्मद असं या संशयिताचं नाव असून काश्मीरमधल्या अतिरेकी संघटनेकडून त्याला वित्तपुरवठा झाल्याचा संशय आहे. काश्मीरमधल्या गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली. लष्कर - - तय्यबा या संघटनेशी त्याचे संबंध असल्याचंही स्पष्ट झालं आहे. जुनैद मोहम्मद याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्याला विशेष न्यायालयानं तीन जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. दीड वर्षापासून पुण्यात राहणारा जुनैद हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथला रहिवासी आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान राखतील याची खात्री आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आपलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बोलणं झालं असून, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे, असं ते म्हणाले. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीकरता अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असून, शिवसेनेनं मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घातलेली आहे. शिवसेनेच्या या अटीबाबत संभाजीराजे यांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही, तर दुसरीकडे शिवसेनेनंही आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

****

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षणाचं मारेकरी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट करायला सांगितली, मात्र राज्य सरकारनं वेळ घालवला. त्यामुळे न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आजपर्यंत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाही. हे एक षडयंत्र असून, ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये प्रति लिटर आहे, तर राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी केला.

****

राज्यसभेच्या, महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून या सहा सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज येत्या ३१ तारखेपर्यंत दाखल करता येतील. अर्जांची छाननी १ जूनला होईल. ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. निवडणूक लढवली गेली तर दहा जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेतलं जाईल, असं विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी कळवलं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना अचानक बोट उलटल्यामुळे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या सात जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर अकरा जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी पाठवण्यात आलं. आज दुपारी तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरच्या सागरी भागात ही बोट अचानक उलटून त्यातले महिला आणि मुलांसह वीस पर्यटक समुद्रात फेकले गेल्यानं हा अपघात झाला.

****

औरंगाबाद इथल्या प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं दोन ते सहा वर्षांच्या तीस अनाथ मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती, संस्थेचे सचिव रोहित गिरी यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचबरोबर कोविड काळात बेरोजगार झालेल्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासह, महिलांसाठी एक वर्षाचं आंगणवाडी शिक्षिका प्रशिक्षण, तसंच महिलांना स्वत:चा उद्योग सुरु करुन देण्याची जबाबदारीही प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं उचलली असल्याचं, गिरी यांनी सांगितलं. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या औरंगाबाद इथल्या व्यंकटेश नगर इथल्या कार्यालयात किंवा ९८ ८१ ४७ ७७ १९ या क्रमांकावर संपर्क साध्याण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त येत्या एकतीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभधारकांशी करणार असलेल्या राष्ट्रीय संवादासाठी नांदेड जिल्हा प्रशासन पूर्व तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या दुर्गम भागातल्या लाभार्थ्यांपासून महानगरांच्या लाभार्थ्यांपर्यंत पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल आढावा बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: