Wednesday, 25 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्याचा उर्जा निर्मितीसाठी रि न्यू पॉवर कंपनीसोबत ५० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार

·      इतर मागासर्गीय प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इम्पिरिकल डेटा न्यायालयाला सादर करणार

·      राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाचं मारेकरी असल्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

·      राज्यात कोविड संसर्गाचे ३३८ नवे रुग्ण

·      शिवसेनेकडून संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा

·      पुण्यात दापोडी परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक

आणि

·      मराठवाडा विभागात किमान आधारभूत दरानं हरभरा खरेदीसाठी सुरू केलेली केंद्र सुरु ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्याची हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची मागणी  

****

 

सविस्तर बातम्या

दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत काल महाराष्ट्रानं उर्जा निर्मितीसाठी रि न्यू पॉवर कंपनीसोबत ५० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. गेल्या तीन दिवसांत या परिषदेत राज्यानं जवळपास ८० हजार कोटी रुपयांचे करार पूर्ण केले आहेत. यामध्ये गुंतवणुकीतून राज्यात दहा ते १२ हजार मेगा वॅट वीज निर्माण केली जाणार आहे. याशिवाय इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीनं रायगड जिल्ह्यात जवळपास दीड अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीसाठी करार केला.

राज्य सरकारनं राज्यातील दुर्गम भागातील तसंच मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी बायजूस यांच्या सोबत एक सामंजस्य करार केला.  शिवाय राज्यानं जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

****

इतर मागासर्गीय प्रवर्ग-ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राखण्याच्या दृष्टीनं नेमलेल्या समर्पित आयोगाच्या बांठिया समितीकडून इम्पिरिकल डेटा तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा इम्पिरिकल डेटा न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं काल राज्य सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं.

जून महिन्यात राज्यात होणाऱ्या १४ महापालिकांच्या निवडणुकांच्या आधी त्रिस्तरीय परीक्षणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षणासह या  निवडणुका होतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे इतर मागासवर्गीय - ओबीसी आरक्षणाचं मारेकरी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं तीन स्तरीय परीक्षण करायला सांगितलं, मात्र राज्य सरकारनं वेळ घालवला. त्यामुळे न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आजपर्यंत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाहीत. हे एक षडयंत्र असून, ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार विरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये प्रति लिटर आहे, तर राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी केला.

****

राज्यसभेच्या, महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून या सहा सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज येत्या ३१ तारखेपर्यंत दाखल करता येतील. अर्जांची छाननी १ जूनला होईल. ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. निवडणूक लढवली गेली तर दहा जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेतलं जाईल, असं विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी कळवलं आहे.

****

राज्यातल्या अंगणवाड्या अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होण्यासाठी महिला आणि बालविकास विभागानं लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. लाईटहाऊस लर्निंगद्वारे दोनशे पेक्षा जास्त अंगणवाड्यांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व अंगणवाड्या दर्जेदार करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. या प्रकल्पात अंगणवाडी शिक्षिका आणि सेविकांनाही नियमीत प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं लाईटहाऊस लर्निंगचे सहसंस्थापक प्रजोध राजन यांनी सागितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३३८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८३ हजार ३४८ झाली आहे. काल या संसर्गाने राज्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २७६ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३३ हजार ४५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ही नावं निश्चित झाली असून यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्र गोळा करण्याची तयारीही सुरू केल्याचं पवार यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेकडे पाठिंबा मागितला असला तरी शिवसेना त्यास तयार नाही. उमेदवारी हवी असेल तर तुम्हाला पक्षात प्रवेश करावा लागेल अशी अट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्या पुढं ठेवली होती. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेशास नकार दिला. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा न देता संजय राऊत यांच्यासोबत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे.

मात्र दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून पुढं काय करायचं याचंही नियोजन झालं आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी काल कोल्हापुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

 

Byte ….

माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे , ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.

 

****


पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं शहरातल्या दापोडी परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. जुनैद मोहम्मद असं या संशयिताचं नाव असून काश्मीरमधल्या अतिरेकी संघटनेकडून त्याला अर्थपुरवठा झाल्याचा संशय आहे. काश्मीरमधल्या गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. लष्कर - ए - तय्यबा या संघटनेशी त्याचे संबंध असल्याचंही स्पष्ट झालं आहे. जुनैद मोहम्मद याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्याला विशेष न्यायालयानं तीन जूनपर्यंत दहशतवाद विरोधी पथकाची कोठडी सुनावली आहे. दीड वर्षापासून पुण्यात राहणारा जुनैद मूळ बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावचा रहिवाशी आहे.

****

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडनं मराठवाडा विभागात किमान आधारभूत दरानं हरभरा खरेदीसाठी सुरू केलेली केंद्र सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारनं मुदतवाढ द्यावी, अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल एका निवेदनाद्वारे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. किमान आधारभूत किंमतीनं हरभरा खरेदी करण्याची तारीख २९ मे पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारनं अचानक २३ मे रोजी खरेदी केंद्र बंद केली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अस पाटील यांनी म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातले गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी काल वाळू प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. जिल्ह्यात वाळू माफियांनी मांडलेला उच्छाद थांबवावा तसंच वाळूचा सर्वसामान्यासाठीचा दर कमी करावा यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण केलं.

दरम्यान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपोषणाच्या अनुषंगानं वाळू ठेकेदारांची बैठक घेऊन वाळूचे दर कमी करण्याचे आदेश काल दिले, सर्व लिलावधारक ठेकेदारांनी या बैठकीत वाळू दर कमी करण्यास सहमती  दिली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर आमदार पवार यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक असणाऱ्या पद निर्मितीला उच्चस्तरीय सचिव समितीनं मान्यता दिली असल्याची माहीती आमदार कैलास पाटील यांनी दिली. या समितीनं ३३ पदांना मान्यता दिल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात १ जून रोजी ७५ ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात पीक कर्जाचे ४०० कोटी रूपये तर बचतगटांसाठी १०० कोटी रुपयांचं कर्ज वाटप होणार असल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गास पुर्ववत आरक्षण मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल नांदेड इथ धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व आमदार भीमराव केराम, आमदार राम पाटील रातो‍ळीकर, भाजप महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी केलं.  मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षणाची परवानगी प्राप्त झाली असून या परवानगीचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने नव्याने न्यायालयात प्रस्ताव मांडावा अस निवेदनात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील करंजखेडा इथं घरात छापा मारुन प्रतिबंधीत गुटखा उत्पादन आणि पॅकिंगचं साहित्य पोलिस आणि अन्न, औषधी प्रशासन विभागानं  काल जप्त केलं . एकनाथ गवारे याच्या घरात आणि दुकानात चार पथकांनी एकाच वेळी छापा मारला असता गवारे हा घरीच गुटख्याचं उत्पादन करत असल्याचं निदर्शनास आलं. यापैकी पॅकिंग मशीनचा अर्धा भाग रईस गुलाब खॉ पठाण याच्या घरात मिळून आल्यानं गवारे आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, चिकलठाणा पोलिसांनी औरंगाबादच्या देवळाई परिसरात धाड टाकून एक लाख २१ हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.

****

येत्या दोन दिवसात  राज्याचा सर्व  विभागांमधे तुरळक ठिकाणी  पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याकाळात विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

****

No comments: