Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे
गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
·
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
·
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री उदय सामंत यांच्या
गाडीवर हल्ला
·
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची विरोधी पक्षनेते
अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी
·
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे
मागणी
·
राज्यात कोविड संसर्गाचे झालेले नवे १
हजार ८८६ रुग्ण, मराठवाड्यात ८२ बाधित
·
ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक, श्रीकांत भराडे यांचं निधन
·
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक
आणि
·
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय
****
१६ आमदारांच्या
अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च
न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर
ही सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला
आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका, तसंच शिंदे गटातल्या आमदारांना ठाकरे गटानं अपात्र
ठरवणं, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याबद्दल शिंदे गटानं दाखल केलेली याचिका या सर्वांवर
एकत्रित सुनावणी होणार आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते काल पुण्यात
पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातलं सरकार संवेदनशून्य असल्याचा विरोधी पक्षनेते
अजित पवार यांचा दावा, मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला. पूर परिस्थितीत केलेल्या पाहणी
दौऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना
थांबली होती, ती आम्ही कार्यान्वित केली, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या,
असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, पुणे विभागीय आयुक्त
कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा
बैठक घेतली. विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,
प्रशासनाला शासनाचं सर्वतोपरी सहकार्य राहील, असं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या
गाडीवर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात ही
घटना घडली. यानंतर सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आपल्यावर
झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, आपल्याला जिवानिशी मारण्याचा
त्यांचा प्रयत्न होता, कुणीतरी सुपारी देऊन हा हल्ला करायला सांगितला, असा आरोप सामंत यांनी
केला.
****
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून
खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळानं
मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन या मागण्यांचं निवेदन सादर केलं. मराठवाडा तसंच विदर्भात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून, याची तातडीनं पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची
मागणी, या निवेदनात करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नसल्याकडेही
या पत्रातून लक्ष वेधण्यात आलं आहे. राज्यपालांनी याबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांशी
चर्चेचं आश्वासन दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले...
‘‘महाराष्ट्रातला आज शेतकरी-शेतमजूर
जो संकटात आहे, तो संकटातनं बाहेर काढण्याच्या करता सरकारनी तातडीनं या सगळ्या गोष्टी
करणं, अधिवेशन बोलावणं, ओला दुष्काळ जाहीर करणं, पंच्याहत्तर हजार रुपये खरीपाच्या
पिकांना हेक्टरी मदत करणं, जे काही फळबागा आहेत त्यांना दीड लाख हेक्टरी मदत त्या ठिकाणी
करणं, आणि पुन्हा त्यांना रब्बीची पिकं घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं, अशा या
सगळ्या गोष्टी, आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. आणि त्याबद्दल आम्ही चर्चा
केली. अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितीत त्या सगळ्या आम्ही सर्वांनी त्यांच्या लक्षात
आणून दिल्या. त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मी त्याच्यासंदर्भात सीएम शी डीसीएम शी
त्याठिकाणी बोलतो.’’
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे
केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं. यावेळी खासदार
डॉ. श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक आणि राजेंद्र गावित
उपस्थित होते. शेवाळे यांनी २०१५ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी
लोकसभेत मागणी केली होती, तेव्हापासून ते सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत आहेत.
****
जगातल्या इतर
चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी खूपच चांगली असून, आता रुपया
हळू हळू वधारत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी काल राज्यसभेत सांगितलं. अमेरिकी डॉलरच्या
तुलनेत रुपयाच्या घसरणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.
भारतीय रुपयाच्या मूल्यात मोठे चढउतार होऊ नयेत, याकरता रिजर्व बँकेनं वेळोवेळी हस्तक्षेप केला असल्याचं,
त्यांनी सांगितलं. महागाई दर सध्या सात टक्के आहे, तो सहा टक्के करण्यासाठी रिजर्व्ह
बँकेच्या सहकार्याने प्रयत्न केले जात असल्याचं, त्यांनी सांगितलं.
बॅँकेतून पैसे काढण्यावर वस्तू आणि सेवा कर आकारला जाणार नसल्याचं, सीतारामन यांनी
नमूद केलं.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८८६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ५० हजार १७१
झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ११० इतकी झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार १०६ रुग्ण
बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ८९ हजार ४७८ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ टक्के झाला
आहे. राज्यात सध्या १२ हजार ५८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ८२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या २५, औरंगाबाद
२२, लातूर १८, उस्मानाबाद दहा, तर जालना जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
****
मुंबईतल्या पत्राचाळ पुनर्विकास
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं काल मुंबईत दोन ठिकाणी छापे
टाकले. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा काही भाग बोगस
व्यवहाराद्वारे रोखीत रुपांतरित करुन जमिनीच्या खरेदी विक्रीसह विविध कारणांसाठी वापरण्यात
आल्याचा ईडीचा आरोप आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक,
कवी आणि नाटककार श्रीकांत भराडे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ६७ वर्षांचे
होते. कर्करोग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. भराडे यांनी औरंगाबाद, जालना,
परभणी, नांदेड इथं लोकमत वृत्तसमुहात संपादक विभागात अनेक वर्ष काम केलं. पाय हरवलेली
माणसं हा त्यांचा ललित लेखसंग्रह विशेष गाजला. आणीबाणीने पाजलं पाणी या नाटकानं, काळा
आर्य या काव्यसंग्रहानं आणि दटके या कादंबरीने भराडे यांना साहित्यिक म्हणून ओळख दिली.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी परभणी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
ई-श्रम
पोर्टलवर ई-श्रम कार्डसाठी असंघटित क्षेत्रातल्या जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी
व्हावी, यासाठी आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात, नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातल्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर - सी एस सी वर जाऊन नोंदणी करावी, असं आवाहन, सरकारी कामगार अधिकार्यांनी केलं आहे. सदर नोंदणीस कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.
****
बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या
राष्ट्रकूल स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.
लॉन बॉलमध्ये
भारतीय महिला संघानं सुवर्ण पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. नयनमोनी सैकिया,
पिक्की, लवली चौबे आणि रुपाराणी तिर्की यांच्या संघानं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा
१७ - १० असा पराभव केला. लॉनबॉल मध्ये भारताचं हे पहिलंच पदक आहे.
टेबल टेनिसमध्ये
भारतीय पुरुष संघाने सिंगापूरला हरवत सुवर्ण पदक पटकावलं.
भारोत्तोलनात
९६ किलो वजनी गटात विकास ठाकूर याने रौप्यपदक जिंकलं. त्यानं एकूण ३४६ किलो वजन उचलून ही कामगिरी केली.
बॅडमिंटनमध्ये भारताच्या मिश्र
संघानं रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत भारतीय संघाला मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला.
ॲथलेटिक्स मध्ये मुरली श्रीशंकर
आणि मोहम्मद अनीस याहिया यांनी पुरुषांच्या लांब उडी प्रकारात, तर महिलांच्या गोळाफेक
प्रकारात मनप्रीत कौरनं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
पदकतालिकेत भारत
पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह सहाव्या स्थानावर आहे.
****
सेंट किट्स इथं झालेल्या तिसऱ्या
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम
फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित षटकात पाच बाद १६४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
भारताच्या संघानं एकोणिसाव्या षटकात तीन गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. या विजयाबरोबरच
भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.
****
केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद
मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेंतर्गत, परतूर तालुक्यातल्या १६ गावांमधली प्रलंबित
कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. सर्वांगिण विकास कामं डीपीआर नुसार पूर्ण
करण्याची जबाबदारी, त्या-त्या विभागाची असल्याचं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment