Sunday, 25 December 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २५ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक क्षेत्रात भारताला मिळालेलं यश म्हणजे वर्ष २०२२, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणी वरच्या आपल्या ‘मन की बात कार्यक्रमाच्या ९६ व्या भागात देशवासियांशी संवाद साधत होते. हे वर्ष अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायक आणि अद्भुत ठरलं. या वर्षी भारतानं स्वातंत्र्य प्राप्तीची ७५ वर्ष पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला. देशानं या वर्षात जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा, २२० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा, ४०० अब्ज डॉलर निर्यातीचा टप्पा गाठला याचा त्यांनी उल्लेख केला. या वर्षात देशातल्या प्रत्येक नागरिकानं ‘आत्मनिर्भर भारत हा संकल्प स्वीकारला.  आयएनएस विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचं स्वागत झालं. अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात देशाचं मोठं नाव झालं असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, तरुणाईनं प्रचंड सामर्थ्य दाखवलं. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत या भावनेचा विस्तार या वर्षात झाला. लोकांनी एकता साजरी करण्यासाठी अद्भुत कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं त्यांनी म्हटलं. या वर्षी G-20 समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी देशाला मिळाली आहे. याला आता लोकचळवळीचं रूप द्यायचं आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या पालघरसारख्या भागातल्या आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या अनेक सुंदर वस्तुंमुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळत आहे. शिवाय त्यांच्या कौशल्याला ओळख प्राप्त होत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नमामी गंगे, आत्मनिर्भर भारत, स्वच्छभारत अभियान योजनांना मोठं यश मिळत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी जनतेला नाताळ आणि नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मास्क घालणं आणि हात धुणं यासारख्या उपायांचं अधिकाधिक पालन करा, असं पंतप्रधान म्हणाले.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन झालं. जनतेच्या हितासाठी आपलं सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. अधिवेशनात विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित होती, मात्र महाविकास आघाडी ला विदर्भाविअषयी आपुलकी नाही. विदर्भाच्या विकासासाठी महाविकास आघाडीशी चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचं ते म्हणाले. तुम्ही टीका करत रहा आम्ही काम करत राहू असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला. त्यानंतर ते छावणी परिषदेच्या मैदानावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेत मार्गदर्शन करण्यासाठी रवाना झाले .

****

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे औरंगाबाद शहरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहराच्या विविध रस्त्यांसह पदपथ आणि चौकातील कचरा संकलित करण्यात आला. रस्त्याच्या कडेला उगवलेली झुडुपं तसंच गवतही काढण्यात आलं आणि नाल्यांचीही सफाई करण्यात आली. औरंगाबाद नजीकच्या बजाजनगर आणि रांजणगाव इथेही सकाळपासून स्वच्छता अभियान सुरु आहे. आतापर्यंत ७४० टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं आहे. या मोहिमेतून आज दिवसभरात १००० टन कचरा संकलित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे रवी तंब्बेवार यांनी दिली आहे.

****

भारतानं बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना तीन गडी राखून जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला आहे. ढाका इथं सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं आज चार बाद ४५ धावांवरुन पुढं खेळताना विजयासाठी आवश्यक १४५ धावा सात गडी गमावत पूर्ण केल्या. एकवेळी भारताची अवस्था सात बाद ७४ अशी झाली होती. रविचंद्रन अश्विननं ४२ आणि श्रेयस अय्यरनं २९ धावा काढताना केलेल्या दमदार फलंदाजीमुळं भारतानं विजय साकारला.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्मारक सदैव अटल या ठिकाणी आज सकाळी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या औचित्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

//***********//

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 17 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 17 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...