Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २६
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
·
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाचा समारोप;येत्या १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन
·
अधिवेशन यशस्वी झाल्याची मुख्यमंत्र्यांची
प्रतिक्रिया;मात्र सरकार बेफिकीर असल्याची विरोधकांची टीका
·
मराठवाडा मुक्ती
संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात चर्चा-विधानसभा अध्यक्षांचं आश्वासन
·
खासदार संजय राऊत
यांच्या विरोधात हक्कभंग सूचना पुढील कारवाईसाठी राज्यसभेकडे
·
राहुल गांधी यांचं
लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
·
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसीय नाट्य महोत्सवाचं आयोजन
·
जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत
भारताला दोन सुवर्णपदकं
आणि
·
स्विस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या
पुरुष दुहेरीत भारतीय जोडीची अंतिम फेरीत धडक
****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या
अधिवेशनात एकूण १७ विधेयकं मंजूर झाली, त्यामध्ये वित्त विधेयकासह गोसेवा आयोग विधेयक,
पोलीस सुधारणा विधेयक, सहकारी संस्था सुधारणा विधेयक, कामगार कायदे सुधारणा विधेयक
आदी विधेयकांचा समावेश आहे. पुढील पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून मुंबईत होणार आहे.
****
अर्थसंकल्पीय अधिवेशन विक्रमी आणि यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिली आहे. ते काल अधिवेशन संस्थगित झाल्यावर पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल आणि त्यात महिलांचाही समावेश करू असं आश्वासन त्यांनी
दिलं. मुंबई गोवा महामार्ग आणि समृद्धी महामार्ग सरकार डिसेंबरपर्यंत पूर्ण करेल, असं
त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
तसंच मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न,
लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. यातून विधीमंडळ कामकाजाबद्दल,
सरकारची अनास्था, बेफीकिरी समोर आल्याची टीका पवार यांनी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी यावेळी बोलताना, शेतकरी, तसंच कामगारांच्या प्रश्नांवर आम्ही सभागृहात
आवाज उठवला, मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसलं, अशी टीका केली.
****
आपलं सरकार हे कायद्याने स्थापन झालेलं बहुमताचं सरकार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला
उत्तर देत होते. आपण घेतलेला निर्णय लोकभावनेतून घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते म्हणाले…
आम्ही घेतलेली ही भूमिका आहे ही
सर्वसामान्यांची भूमिका आहे. मला खूप लोकं चांगले भेटतात. विविध क्षेत्रांमध्ये ज्यांची
किर्ती आहे, ते मला नेहमी सांगतात, ज्या ज्या कार्यक्रमामध्ये मी जातो, तिकडे सांगतात
फार एकनाथराव तुम्ही धाडसी काम केलं. ते राज्याच्या हिताचं काम होतं. आणि योग्य वेळी
केलं. परंतू जे केलं ते आम्ही छातीठोकपणे केलंय. या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं काम
केलं. या शिवसेना भाजप युतीच्या मतदारांचं मॅनडेट होतं ते आम्ही काम केलं. हिंदुत्वाची
बेईमानी केली त्यांच्या विरोधात आम्ही काम केलं.
****
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी उत्तर दिलं. या चर्चेदरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं प्रधानमंत्री आवास योजनेत
झालेल्या घोटाळा प्रकरणी होत असलेल्या कारवाईबाबत फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले…
छत्रपती संभाजीनगरमध्ये
महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जेवढं ते टेंडर होतं, त्याच्या चारपट
घरं ही बांधण्याचे कार्यादेश देण्यात आलेत. ज्यावेळेस हे सरकार आलं, त्यावेळेस काही
तक्रारी प्राप्त झाल्या. म्हणू आपण त्याच्यावर कमिटी तयार केली आहे. त्या कमिटीने सांगितलं
की, ही सगळी प्रक्रिया सदोष आहे. त्यासंदर्भात असं लक्षात की याच्यात काही घोटाळे झालेत.
म्हणून ही सर्व प्रक्रिया रद्द झाली. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. कारण
विकासकांनी खोटे कागदपत्र त्याठिकाणी वापरल्याचं देखील लक्षात आलंय. आणि ज्या अधिकाऱ्यांनी
केलंय त्यांच्यावरदेखील कारवाई सुरू आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पुढच्या पावसाळी
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त चर्चा केली जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलं.
यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याला पाठिंबा
दिला. सरकारने यासंदर्भात सर्व तयारी केली असून, मंत्र्यांची समिती स्थापन केली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
****
राहुल गांधी यांच्या विरोधात अवमानकारक आंदोलन केल्याप्रकरणी विधान परिषदेच्या
पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आचारसंहितेचा निर्णय घेऊ, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी काल दिलं. काल विधानसभेचं कामकाज
सुरु होताच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ निर्णय
जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र
अध्यक्ष लगेच निर्णय जाहीर करत नसल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग
केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या आचारसंहिता जाहीर करण्याचा
निर्णयाला पाठिंबा दिला.
****
राज्यातल्या मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर
असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी,
मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी दिलं आहे, विधानभवनात मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत काल ते बोलत होते. दरम्यान,
राज्यातल्या मंदिरांवर प्रशासक आणि न्यायाधीश यांची नियुक्ती करू नये, अशी मागणी आचार्य
महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे.
****
‘दी मॅजेस्टिक’ या विधानमंडळ अतिथीगृह तसंच आमदार
निवास वास्तूच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते काल झालं. या वास्तुचं अत्याधुनिकीरण येत्या १८ महिन्यात पूर्ण करणार
असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ‘दि मॅजेस्टिक’ वास्तू
, टू-ए दर्जाची हेरिटेज इमारत असून ती धोकादायक झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या
निर्देशानुसार तिचं नूतनीकरण होत आहे.
****
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची
संयुक्त चिकित्सा समिती नेमण्यात आली आहे. १८ सदस्यांच्या
या संयुक्त समितीत विधानपरिषदेतले सहा आणि विधांसभेतले बारा सदस्य असतील, राधाकृष्ण
विखे पाटील या समितीचे अध्यक्ष असतील.
****
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात दाखल अस्लेल्या हक्कभंग सूचना पुढील कारवाईसाठी राज्यसभेच्या सभापतींकडे
पाठवण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल सदनात ही माहिती
दिली. राऊत यांनी खुलासा करतांना हक्कभंग समितीच्या निःपक्षपातीपणाबद्दल प्रश्नचिन्ह
उपस्थित केलं, त्या मताशी आपण सहमत नसल्याचंही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान,
विधानसभेकडूनही हे प्रकरण राज्यसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात येणार असल्याचं विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं. राऊत यांच्या कडून हक्कभंगासंदर्भात
समाधानकारक उत्तर आलं नसल्याचं नार्वेकर म्हणाले.
****
सगळ्या पोलिस ठाण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग सुरू करणार असल्याचं गृहमंत्री
तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत एकनाथ खडसे
यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. हा निर्णय झाल्यावर राज्याच्या सगळ्या
सीमांवर या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात सीमालगत भागात मध्यप्रदेशातून गांजा तसंच गुटख्याची चोरटी वाहतुक होत
असल्याचा मुद्दा खडसे यांनी उपस्थित केला होता.
****
येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यातील २१ जिल्ह्यांत निवडणूक साक्षरता मंच उपक्रम
सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल
पुण्यात निवडणूक साक्षरता मंच पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही घोषणा केली. या मंचच्या
माध्यमातून पुण्यात मतदार जागृतीचे चांगले काम झालं असून, हा अनुभव इतर जिल्ह्यांसाठी
उपयुक्त ठरेल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व
रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर
तातडीने सुनावणी करण्याची मागणी गांधी यांच्यातर्फे करण्यात आली आहे. केरळच्या आभा
मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात याचिका
दाखल केली आहे.
दरम्यान, सदस्यत्व रद्द केलं म्हणजे आपल्याला
गप्प केलं जाऊ शकतं, हा भारतीय जनता पक्षाचा भ्रम आहे, आपण प्रश्न विचारत राहू असं,
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अडानी
यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक कुणाची आहे, असा सवाल गांधी यांनी विचारला
असून, विमानतळ हस्तांतर प्रकरणी केंद्र सरकारने अडानी यांच्याशी बेकायदा व्यवहार केल्याचा
आरोप गांधी यांनी केला.
****
दरम्यान, अडानी प्रकरणावरुन राहुल गांधी देशात भ्रम पसरवत असल्याचं,
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते काल पाटणा इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. राहुल गांधी यांच्याप्रमाणे आजवर ३२ सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं असल्याची माहितीही
प्रसाद यांनी दिली.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी याचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर
काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. ठाणे इथं पंतप्रधान
मोदी आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. लातूर इथं काल
जिल्हा काँग्रेस आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने
केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
****
दरम्यान, राहुल गांधी यांनी इतर मागास वर्ग- ओबीसी संदर्भात
अवमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर निषेध
आंदोलन करण्यात आलं. मुंबई इथं गांधी आणि कॉँग्रेस विरोधात घोषणा देत निषेधाचे फलक
दर्शवण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल टी पाँईट इथं रास्ता रोको आंदोलन
आणि निदर्शनं करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याला जोडे मारत त्याचं दहन केलं. धाराशिव इथंही गांधी यांच्या कथित वक्तव्याच्या
निषेधार्थ भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
****
'जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
नाट्यशास्त्र विभागात आज आणि उद्या नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरू
डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज दुपारी एक वाजता
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार
आहे. तर उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता 'आधुनिक जागतिक रंगभूमी ' या विषयावर प्रसिद्ध
नाट्य समीक्षक आणि अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचं व्याख्यान होणार आहे. दोन्ही
दिवसात पाच नाट्यप्रयोग होणार आहेत.
****
जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नीतू घंसास हिने ४८ किलो वजन गटात
तर स्वीटी बुरा हिनं ८१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे. नीतूने मंगोलियाच्या
लुतसाईखान अल्तानसेतेसेग चा पराभव करत तर स्वीटीनं चीनच्या वांग लिनाचा पराभव करत या
स्पर्धेत इतिहास रचला आहे.
****
भारतीय बॅटमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने स्विस खुल्या
बॅटमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल बासेल इथं झालेल्या
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने मलेशियाच्या ओंग यू सिन आणि टियो ई यी या
जोडीचा २१-१९, १७-२१, २१-१७ असा पराभव केला. आज चीनच्या जोडीशी त्यांचा अंतिम सामना
होणार आहे.
****
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या
भिरडा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे
जिल्ह्यातल्या अनेक भागात शेतीचं नुकसान झालं आहे. शासन तातडीने शेतकऱ्यांनी मदत करणार
असल्याचं आश्वासन सत्तार यांनी दिलं.
हिंगोली इथं जिल्हा कृषी महोत्सवाचं सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शेतकऱ्यांनी
तृणधान्य पिके घेऊन सेंद्रीय शेतीकडे वळावं, असं आवाहन सत्तार यांनी केलं. सेंद्रीय
शेतीतून मिळणाऱ्या मालाला दीडपट भाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची ग्वाही
सत्तार यांनी यावेळी दिली.
****
उमरगा इथल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या खाटांची संख्या ३०० करण्याची
मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. ते काल विधान
परिषदेत बोलत होते.
****
बीड इथं नवतेजस्विनी महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या
हस्ते काल झालं. स्वयं सहायता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स
या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात
भरलेलं हे प्रदर्शन उद्या २७ तारखेपर्यंत सकाळी १० ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी
खुलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या इयत्ता
पाचवी ते आठवीच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे. या मुलांना श्रीहरिकोटा इथलं अंतरिक्ष
केंद्र तसंच थुंबा इथं स्पेस म्युझियम, पाहता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment