Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 30 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
देशात
दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व
औषधं आणि विशेष खाद्यपदार्थांना सीमा शुल्कातून सुट देण्याचा
निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सूट मिळालेली ही औषधं आणि खाद्य पदार्थ दुर्मिळ
आजारांसाठी राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध आहेत. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी,वैयक्तिक आयातदाराला, केंद्रीय किंवा राज्य आरोग्य संचालक, किंवा जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल,
असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. सरकारने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधाला मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे.
***
तुरीच्या डाळीचे दर सर्वसाधारण रहावेत यासाठी मिल चालक, व्यापारी आणि आयातदारांकडे असलेल्या साठ्यांवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं
प्रयत्न सुरू केले आहेत. मोठ्या आयातदारांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यांची माहिती
पारदर्शकरित्या जाहीर करावी असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग
यांनी दिले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत वितरण प्रणालीत अडथळे येतील अशारितीने कुठलीही
साठेबाजी करु नये, असंही त्यांनी सांगितलं. डाळ व्यापारी संघटना
आणि आयातदारांनी यासाठी सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
***
राज्यात
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नसून, नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित
पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना
मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान
देतील अशी अपेक्षा होती, मात्र राज्य सरकारनं
शेतकऱ्यांना ३५० रुपयांचं अनुदान दिलं
असून, हे अनुदान वाढवून देण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये
नाफेडकडून कांद्याची
खरेदी बंद झाली असून, ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क
साधणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या किराडपूरा भागातल्या श्रीराम मंदिरात
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड,
पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी श्रीरामचं दर्शन घेतलं.
या परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये झालेल्या
वादातून करण्यात आलेल्या जाळपोळीची या नेत्यांनी पाहणी करत परिस्थितीचा
आढावा घेतला. पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी बोलताना,
परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,
असं आवाहन केलं.
काही नेते या घटनेला राजकीय वळण देत आहेत. हे चुकीचं असून सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
ते म्हणाले….
या क्षणी तिथे शांतता आहे. तरी देखिल ही शांतता राहिली पाहिजे
असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल. म्हणूनच मी म्हटलं की काही नेते जाणीवपूर्वक राजकीय
स्टेटमेंट देवून तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करताहेत. स्वत:च्या स्वार्थाकरता
हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. तो त्यांनी तात्काळ बंद करावा. आणि माझी सगळ्यांना
विनंती आहे शांतपणे आपला सगळा कार्यक्रम पार पाडावा कुठेही गडबड गोंधळ होवू नये, कुणीही
एकमेकांच्या समोर येवू नये, कुठेही शांततेचा भंग होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं.
***
राज्यातल्या ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक
संस्थाशी काल राज्य सरकारने सामंजस्य करार केला. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या
उपस्थितीत हा करार करण्यात आला. अंगणवाडी दत्तक धोरणाअंतर्गत विविध सामाजिक संस्थानी आतापर्यंत तीन हजार ६६८
अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत, त्यामुळे राज्यात एकूण चार हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचं सहकार्य
मिळत आहे, अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली.
***
कुष्ठरोग निर्मूलनात पालघर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कुष्ठरोग
रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणं, रुग्णांना
शारीरिक व्यंग येणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणं, कुष्ठरोग
रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक उपचार चांगल्या
पद्धतीने केल्याबद्दल जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पुणे इथं
काल आयोजित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत जिल्ह्याला हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
***
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील आणि वरिष्ठ
लिपिक प्रदीप वीरनारायण यांना २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात
आलं. खाजगी सावकारावर सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी
ही लाच मागितली होती.
//**********//
No comments:
Post a Comment