Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 25 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्य
विधीमंडळाच्या पुढच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा
मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चर्चा केली जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
आज दिलं. यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची
मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. मराठवाड्याच्या
प्रश्नावर चर्चा घेण्यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. गेल्या
अधिवेशनातही हा विषय चर्चेला आला होता. मात्र आज या अधिवेशनाचा
शेवटचा दिवस आला तरी यावर चर्चा झाली नसल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांनी याला पाठिंबा दिला. सरकारने यासंदर्भात सर्व तयारी केली असून, मंत्र्यांची समिती स्थापन केली असल्याचं, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
***
राहुल गांधी यांच्या विरोधात अवमानकारक आंदोलन केल्याप्रकरणी विधान परिषदेच्या
पीठासीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आचारसंहितेचा निर्णय घेऊ, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
आज दिलं. विधानसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस गटनेते बाळासाहेब
थोरात यांनी तत्काळ निर्णय जाहीर करण्याची मागणी केली होती.
प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून याप्रकरणी लगेच
निर्णय जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत
पाटील यांनी केली. पण अध्यक्ष लगेच निर्णय जाहीर करत नसल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी
सभात्याग केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या आचारसंहिता जाहीर करण्याचा
निर्णयाला पाठिंबा दिला.
दरम्यान,
महाराष्ट्र पोलिस सुधारणा विधेयक २०२३ आणि महाराष्ट्र सरकारी संस्था सुधारणा विधेयक
२०२३ विधानसभेत पारित करण्यात आले.
***
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या
आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तोंडावर काळ्या पट्टया
बांधून मूक आंदोलन केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा
आजचा शेवटचा दिवस असून, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास
दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.
***
भारताच्या जी 20 देशांच्या अध्यक्षपदाअंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक
कार्यगटाची पहिली बैठक येत्या २८ ते ३० मार्च या कालावधीत मुंबईत होत आहे. तीन दिवस
चालणाऱ्या या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार
आणि गुंतवणूक वाढीसाठी चर्चा होणार आहे. या बैठकीच्या दुसऱ्या
दिवशी व्यापार आणि गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य
आणि उद्योग मंत्र्यांच्या हस्ते होईल. परिषदेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी जागतिक
व्यापारात सुक्ष्म आणि लघू उद्योगांच्या वाढीसाठी व्यापार आणि गुंतवणूक गटाचे प्रयत्न
या विषयावर चर्चा होणार आहे.
***
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा - नेट उद्या घेण्यात येणार असून, यासाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज
केला आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील उपलब्ध करून देण्यात आले असून, महाराष्ट्र आणि गोव्यातल्या एकूण २६५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार.
***
पशुधनाचं शंभर टक्के लसीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातलं
एकमेव राज्य असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन,
दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी म्हटलं
आहे. शिर्डीमध्ये आयोजित महापशुधन एक्सपो २०२३ चं उद्घाटन केल्यानंतर
ते काल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार
हे होते. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीनं हे तीन
दिवसांचं महाप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे, त्यात देशभऱातले पशुपालक सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनाच्या बाबतीत राज्य
सरकार संवेदनशील असून, पशुधनाच्या लम्पी आजारांवरच्या मोफत लसीकरणासाठी
शासनानं तातडीनं उचललेल्या पावलांमुळे राज्यातल्या दीड कोटी पशुधनाचं
लसीकरण विक्रमी कालावधीत पूर्ण झाल्याचं विखे पाटील म्हणाले.
***
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ९९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
***
सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या द्वितीय मानांकित भारतीय जोडीनं
काल डॅनिश जोडीचा २१-१५, १०-२१, १५-२१ असा पराभव केला.
महिलांच्या एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुला इंडोनेशियाच्या
कुसुमा वारदानी हिच्याकडून पराभव स्विकारावा लागला.
***
नवी
दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत आज भारताच्या नितु घंसास
आणि स्वीटी बुरा अंतिम सामने खेळणार आहेत. नितुचा सामना मंगोलियाच्या, तर स्वीटीचा
सामना चीनच्या खेळाडुसोबत होणार आहे.
//**********//
No comments:
Post a Comment