Wednesday, 29 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 29.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेचं कामकाज आज सलग बाराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काळे कपडे घातलेले विरोधी पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. प्रतिस्पर्धा कायदा सुधारणा विधेयक सदनानं विरोधकांच्या गदारोळातच संमत केलं. परवा शुक्रवारी ३१ मार्च रोजी कामकाज होणार नसल्याचा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. जैवविविधता सुधारणा विधेयक तसंच वन सुधारणा विधेयकही सदनासमोर सादर करण्यात आलं. दरम्यान वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.

राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

****

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. बापट हे १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते. १९८३ ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते. बापट यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पुणे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १३ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येतील, असं कुमार यांनी सांगितलं. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले वयोवृद्ध मतदार आपल्या घरूनच मतदान करू शकणार आहेत.

****

प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री या योजनेसाठी शिक्षण मंत्रालयानं देशभरात नऊ हजार शाळांची निवड केली आहे. देशभरातले केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालयांसह दोन लाख ५० हजार शाळांमधून पीएमश्री योजनेतल्या शाळांची निवड करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. अभ्यासक्रम, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधा, मानवी साधनसंपत्ती आणि लिंगभाव समानता यांच्यासह सहा ठळक निकषांनुसार ही निवड करण्यात आली आहे.

****

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी या उद्देशाने फिरत्या एलईडी वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाला कालपासून नांदेड इथं सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवून या वाहनांना रवाना केलं. विविध योजनांची माहिती असलेली ही पाच वाहनं जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून जनजागृती करतील. वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनावर आधारित चित्रफित दाखवण्यात येत आहे.

****

रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं आज मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सामाजिक सौहार्द जपूण हे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर इथं कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कांद्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. या सततच्या पडत्या दरांमुळे आज सकाळी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव थांबवला. कांद्याची किंमत प्रति किलो दोन ते चार रुपये झाल्यानं कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागत असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

****

रेल्वे विभागाच्या भुसावळ यार्डातल्या कामामुळे नांदेड-अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. उद्या ३० आणि परवा ३१ तारखेला नांदेड इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे धावण्याऐवजी अकोला, भुसावळ कोर्ड लाईन, खांडवा मार्गे धावेल. त्याचप्रमाणे उद्या अमृतसर इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस देखील खांडवा, भुसावळ कोर्ड लाईन, अकोला, पूर्णा मार्गे धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments: