Tuesday, 28 March 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      पॅन आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी या वर्षीच्या तीस जूनपर्यंत मुदतवाढ.

·      विरोधकांच्या गदारोळामुळे, संसदेचं कामकाज सलग अकराव्या दिवशी बाधित.

·      दिल्ली उच्च न्यायालयाचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन.

आणि

·      आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध तक्रार दाखल.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं पॅन आणि आधार क्रमांक जोडण्याची मुदत या वर्षीच्या तीस जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत येत्या एकतीस मार्चला संपत होती. या वर्षीच्या तीस जूनपर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्या करदात्यांचे पॅन क्रमांक निष्क्रीय केले जातील, असं मंडळानं म्हटलं आहे. याशिवाय, अशा पॅनवर कोणताही कर परतावा दिला जाणार नाही, असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे. निष्क्रीय झालेलं पॅन कार्ड तीस दिवसात एक हजार रुपये शुल्क भरून सक्रीय करता येईल, असं मंडळानं सांगितलं आहे.

****

अदानी समुहातील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीसाठी, तसंच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधासाठी, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे, संसदेचं कामकाज आज सलग अकराव्या दिवशी बाधित झालं. सकाळी लोकसभेत तालिका अध्यक्ष मिथुन रेड्डी यांनी कामकाज पुकारताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली, तसंच अध्यक्षांकडे कागद भिरकावले. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

राज्यसभेतही याच मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाजाला सुरवात केली. वित्त विधेयकात राज्यसभेनं सुचवलेली सुधारणा लोकसभेनं मान्य करून, तिचा वित्त विधेयकात समावेश केल्याची माहिती, राज्यसभा सचिवांनी दिली. महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन, लव्हलीना बोर्गोहेम, नितू घांगस आणि सविती बूरा, या खेळाडूंनी सुवर्ण पदकं जिंकल्याबद्दल राज्यसभेनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. उपसभापती जगदीप धनखड यांनी या गोंधळातच, येत्या एकतीस तारखेला राज्यसभेचं काम होणार नसल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

****

दिल्ली उच्च न्यायालयानं आज मानहानीच्या एका प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर समन बजावलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार कोटी रुपये देऊन निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं चिन्ह विकत घेतलं आहे असा आरोप या तिघांनी त्यांच्या वक्तव्यांमधून केला होता. यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी मानहानीची तक्रार केली होती, ती न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. राऊत आणि ठाकरे पितापुत्रांनी केलेली मानहानीकारक वक्तव्यं अजूनही मंचावर ठेवणाऱ्या समाज माध्यमांनाही न्यायालयानं नोटीस बजावली असून, ही वक्तव्यं अजूनपर्यंत हटवली का नाहीत, याचा खुलासा विचारला आहे.

****

वकील आचारसंहितेचा भंग करण्याच्या कारणावरून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली आहे. एसटी कर्मचारी आंदोलनात वकिलांचा गणवेश परिधान करून सहभाग घेणं आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेणं, हे वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत बार कौन्सिलनं सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. दरम्यान, बार काऊन्सिलच्या या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्ष येत्या ६ ते १४ एप्रिल या कालावधीत देशभरात सामाजिक न्याय सप्ताह साजरा करणार आहे. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली आहे. संसद भवन परिसरात आज भाजपा संसदीय मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, ज्येष्ठ नेते अमित शहा, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी यांच्यासह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. येत्या १५ मे ते १५ जून या कालावधीत आपापल्या मतदारसंघात केंद्र सरकारच्या विकास योजनांविषयी माहिती देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी पक्षाच्या सगळ्या खासदारांना यावेळी दिले, अशी माहितीही मेघवाल यांनी दिली.

****

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद व्यक्तव्य करून काँग्रेस पक्षानं आणि महाविकास आघाडीनं केलेल्या सावरकरांच्या अपमानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या तीस तारखेपासून सुरू होणारी ही यात्रा येत्या सहा एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यभरात फिरणार आहे, असं त्यांनी सांगितलं. या यात्रेमध्ये रथांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात येईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत विविध ठिकाणी ‘आम्ही सारे सावरकर’ असे फलक लावले.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अयोग्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचं पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिलं आहे. सव्वीस मार्चला झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार शिरसाट यांनी अशी टीका केल्याचं समाज माध्यमांमधून समोर आल्यानंतर दानवे यांनी हे पत्र दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांकडे शिरसाट यांनी लक्ष वेधलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातलं सशुल्क दर्शन बंद करण्याचा आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागानं या मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक आहे.कायद्यानुसार अशा संरक्षित स्मारकांमध्ये मध्ये पैसे न घेण्याचा नियम असल्यामुळे हा आदेश दिल्याचं पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं स्पष्ट केलं आहे.या मंदिर परिसरात असलेल्या दानपेट्या तत्काळ काढून टाकण्याचा आदेशही यात देण्यात आला आहे.

****

ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना यावर्षीचा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक, हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं वितरण येत्या दोन एप्रिलला सोलापूर इथे होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि प्राध्यापक ठाकरे गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा देशपातळीवरील दुसरा गणितरत्न पुरस्कार कोलकाता इथल्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापक नीना गुप्ता यांना आज प्रदान करण्यात आला. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी हा पुरस्कार प्रदान केला. गुप्ता यांनी मागील सात दशकांपासून अनुत्तरीत असलेला ‘झरिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम’ पूर्णतः सोडवण्यात यश मिळवलं आहे.

****

No comments: