आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
श्रीराम नवमी आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या विविध
मंदिरांमधून रामजन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी
देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभू
रामाचे आदर्श आत्मसात करावे आणि भारताला एक गौरवशाली राष्ट्र बनवण्यासाठी स्वतःला समर्पित
करावं, असं आवाहन, राष्ट्रपतींनी आपल्या
शुभेच्छा संदेशात केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं गजानन महाराज संस्थान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून
सुरु असलेल्या श्रीराम नवमी महोत्सवाची आज सांगता होत आहे.
शिर्डी इथं साईबाबा देवस्थानात राम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. भाविक मोठ्या संख्येनं या उत्सवासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.
छत्रपती
संभाजी नगर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या किराडपुरा इथल्या
राममंदिरात दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा आणि विधिवत पुजा होणार असल्याची माहिती
मंदिर विश्वस्त समितीचे दयाराम बैसय्ये यांनी दिली.
***
सरकारची धोरण, योजना आणि कार्यपद्धतीविषयी जनतेत जागरुकता
निर्माण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात भारतीय माहिती सेवेच्या २०१८ ते
२०२२ तुकडीच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. परिणामकारकरित्या आणि
योग्य माहिती नागरिकांना पुरवून हे अधिकारी देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकतात,
असं त्या म्हणाल्या.
***
भारतीय स्पर्धा आयोगाने अँन्ड्रॉईड मोबाइल प्रकरणी गुगल कंपनीला ठोठावलेला दंड, राष्ट्रीय कंपनी विधि अपीलीय न्यायाधिकरणानं योग्य ठरवला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने गेल्या २० ऑक्टोबर रोजी अँड्रॉइड
मोबाईल उपकरणांच्याबाबतीत स्पर्धाविरोधी वर्तनाबद्दल गुगलला दंड ठोठावला होता.
***
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात महावितरणची सर्व अधिकृत
वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी म्हणजेच ३० मार्च, एक आणि दोन एप्रिल रोजी सुरु राहणार आहे.
उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातूनही ग्राहकांनी वीजबिलाचा त्वरीत भरणा
करावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment