Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 26 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
अवयव दान हे एखाद्याला जीवन देण्याचं
एक सशक्त माध्यम बनलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरच्या
`मन की बात` मालिकेतल्या नव्व्यान्नवाव्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधला. आज
आपल्या देशात अनेक गरजू लोक निरामय जीवन लाभावं म्हणून मोठ्या आशेनं अवयवदात्यांची
वाट पाहत आहेत. या दिशेनं काम करताना, राज्यांच्या
अधिवासाची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच
आता रुग्ण देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन, अवयव
मिळवण्यासाठी नोंदणी करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. हे नवरात्रीचं पर्व असून
शक्तीची उपासना करण्याचा हा काळ असल्याचं ते म्हणाले. भारताची क्षमता नव्यानं उजळून
सामोरी येत आहे, त्यात आपल्या महिलांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जेमध्ये सर्वांचे प्रयत्न
भारताला पुढं घेऊन जात असल्याचं ते म्हणाले. पुण्यामधल्या एमएसआर-ऑलिव्ह
गृहसंकुलातील लोक सामूहिक वापराच्या गोष्टी म्हणजे पिण्याचं पाणी, उदवाहक आणि विद्युत प्रकाश यंत्रं आता सौर उर्जेनंच चालवतात,
या बद्दल त्यांनी कौतुक केलं. या सोसायटीतल्या सगळ्यांनी एकत्र येऊन सौर पॅनेल्स लावले
यातून अंदाजे दर महिन्याला चाळीस
हजार रुपयांची बचत होत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. `मन की बात`ला मिळणाऱ्या प्रतिसादांची माहिती त्यांनी यावेळी
दिली. काश्मीरमधील कमळाचं देठ- नादरूच्या सामुहिक शेतीची तसंच शेतीच्या इतर
यशकथाही त्यांनी सांगितल्या. एप्रिलच्या महिन्यात आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. या
दोन्ही महापुरुषांनी समाजातले
भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान
दिलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
सध्या काही ठिकाणी कोरोना विषाणू
संसर्ग वाढत आहे त्यामुळं प्रत्येक
नागरिकानं सुरक्षिततेची तशीच स्वच्छतेचीही काळजी
घ्यावी, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं
आज एकाच वेळी ३६ उपग्रह प्रक्षेपित
केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-थ्री या रॉकेटनं आज सकाळी ९ वाजता
श्रीहरिकोटा इथून अवकाशात ३६ उपग्रहांसह उड्डाण केलं. उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-३नं
झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला एलव्हीएम-थ्री / वनवेब इंडिया-टू असं
नाव देण्यात आलं. इस्रोनं सामाजिक संपर्क माध्यमावरुन याबाबत माहिती दिली आहे. या प्रक्षेपणामुळं जगातल्या प्रत्येक
अवकाश आधारीत
ब्रॉडबँड इंटरनेट योजनांना मदत मिळणार आहे.
****
राहुल
गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्द्यावर आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं
देशभर संकल्प सत्याग्रह करण्यात येत आहे. केंद्र
शासन तानाशाही प्रवृत्तीनं वागत असल्यामुळे राहुल गांधी त्याविरोधात सातत्यानं आवाज
उठवत आहेत. हा आवाज दाबण्यासाठीच त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. मात्र कॉंग्रेस
पक्ष यासंदर्भात संघर्ष अजून तीव्र करणार असल्याचं कॉंग्रेस पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नागपूर
इथं आज
या संदर्भात धरणं आंदोलन झालं, त्यावेळी पटोले बोलत होते.
****
महाराष्ट्र
सरकार अवकाळीनं नुकसान
झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी घोषणा होईल अशी अपेक्षा होती मात्र विरोधक
आणि उद्धव ठाकरेंवर टीका यापलीकडे सत्ताधाऱ्यांच्या विधीमंडळातल्या भाषणांतून काही मिळालं नाही अशी टीका राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम
सुरु असल्याचं प्रक्रीया असल्याचंही ते म्हणाले. लक्षद्विपच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या
खासदार फैजल यांना न्यायालयानं दिलासा देऊनही त्यांना अद्याप पूर्ण खासदारकी बहाल झालेली
नाही. राहुल गांधी यांची परिस्थिती अशीच करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव
ठाकरे आज मालेगावमध्ये सभा घेत आहेत. त्यांना असणाऱ्या लोकांचा पाठींबा यावेळी नक्की
व्यक्त होईल. त्यांच्या सभांना लोक ओढून आणावे लागत नाहीत, ते स्वत :हून येतात हे उद्धव
ठाकरेंच्या सभेचं वैशिष्ट असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी नमुद केलं.
****
महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेतला अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली
कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईत ब्रेबॉर्न मैदानावर संध्याकाळी
साडे सात वाजता हा सामना होईल.
****
No comments:
Post a Comment