आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
जी-20 च्या पर्यावरण आणि शाश्वत हवामान विषयक कार्यगटाची
दुसरी बैठक आजपासून गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या
बैठकीत जैवविविधता, जमिनीचा ऱ्हास, चक्रीय
अर्थव्यवस्थेत साधनसंपत्तीच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन तसंच बदलत्या हवामानाला
लवचिकतेनं तोंड देण्यास सक्षम नील अर्थव्यवस्थेला चालना अशा मुद्द्यांवर चर्चा होणार
आहे.
***
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रांतून काल एल वी एम- 3 एम 3 उपग्रहासह वेब
इंडिया-2 योजनेच्या ३६ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
या उपग्रहांचं नियंत्रण तिरूवनंतपुरम, लखनऊ आणि बंगळुरू इथल्या
केंद्रांच्या साथीनं अंटार्टिका इथल्या केंद्रावरुन केलं जाणार आहे.
***
राज्यातल्या वनेत्तर क्षेत्रातल्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि
संस्थाना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कारांचं
वितरण काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. या पुरस्कारांमुळे
इतर नागरीकांमध्ये वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि कर्तव्याची
जाण होईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ गावांनी महावितरणची थकीत वीज देयकं भरुन थकबाकीमुक्ती
मिळवली आहे. वीज देयकं वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलात
महावितरणकडून प्रभावी प्रयत्न करण्यात येत असून, वीज ग्राहकांचाही
महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे.
***
नांदेड - अमृतसर - नांदेड या अमृतसर
एक्सप्रेस आणि नांदेड - जम्मू तावी - नांदेड
हमसफर एक्सप्रेसला सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा
देण्यात आला आहे. या दोन्ही गाड्या नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे
जाणाऱ्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयातर्फे
ही माहिती देण्यात आली.
***
पुण्यात सुरू असलेल्या 33 व्या राष्ट्रीय वरिष्ठ
तलवारबाजी स्पर्धेत काल भारताची आघाडीची तलवारबाज सी ए भवानी देवी यांनी महिला सॅबर
वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. तर महिला वैयक्तिक फॉइल प्रकारात
केरळच्या राधिका अवटी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.
//**********//
No comments:
Post a Comment