आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
यंदाच्या २०२३-२४ च्या रब्बी हंगामात देशात ३४१ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी होईल,
असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. कालपर्यंत देशात दहा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त गहू खरेदी करण्यात आला आहे. यंदा ३१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी गहू विकण्यासाठी सरकारकडे
नोंदणी केली आहे.
***
भारताच्या अध्यक्षतेखाली जी - २० अंतर्गत विविध कार्यगटांच्या बैठका देशभरात विविध
ठिकाणी होत आहेत. आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम् इथं जी-२० च्या पायाभूत सुविधा कार्यसमूहाच्या
बैठकीला काल सुरुवात झाली. तर पर्यावरण
आणि हवामान स्थिरता कार्य समूहाची बैठक गुजरातमधे गांधींनगर इथं
होत आहे.
मुंबईत
सुरु असलेल्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचं औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय
उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांच्या हस्ते होणार आहे.
***
भारतीय सायबर गुन्हेविषयक समन्वय केंद्र - आय फोर सीमध्ये
सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणालीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी काल आढावा घेतला. सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी यांच्याशी
सबंधित विविध मुद्द्यांवर सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी गृह मंत्रालय
सर्वसमावेशक आणि सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशातल्या ९९ पूर्णांक ९९ शतांश टक्के पोलिस ठाणी गुन्हे आणि गुन्हेविषयक माग काढण्यासाठीची यंत्रणा
म्हणजे सी सी टी एन एस नं जोडल्याची माहिती शहा यांनी दिली.
***
देशातल्या तेरा राज्यांमध्ये मिळून ५७ सौर पार्क विकसित करण्याचा निर्णय सरकारनं
घेतला असल्याचं, नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी काल
राज्यसभेत सांगितलं. जमिनीच्या उपलब्धतेनुसार या सौर पार्कना मान्यता
देण्यात आली असून, २० मेगावॅट क्षमतेच्या लहान सौर पार्कही
उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
अग्निवीरांची पहिली तुकडी सेवेसाठी सज्ज होत आहे. ओडिशात चिलिका इथं काल झालेल्या
दीक्षांत संचलनात सुमारे दोन हजार सहाशे नव्यानं भरती झालेल्या अग्निवीरांनी भाग घेतला.
या पहिल्या तुकडीत २७३ महिलांचा समावेश आहे.
//***********//
No comments:
Post a Comment