Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: ३०
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
· छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा भागात दोन गटांत तणाव, संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार
· खासदार इम्तियाज जलील यांचं जनतेला शांततेचं आवाहन
· कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, येत्या १० मे रोजी मतदान
· लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल यांना लोकसभा सदस्यत्व
बहाल
· शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा उपक्रम सुरू
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· हिंगोली जिल्ह्यात ३३ लाख रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी २०
जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आणि
· छत्रपती संभाजीनगरमध्ये ८१ कोटी रुपयांचा गुटखा जप्त
****
छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा भागात काल रात्री दोन
गटांत तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या वादावादीत संतप्त
जमावाने पोलिसांची काही वाहनं जाळली, काही ठिकाणी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात
आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसंच हवेत गोळीबार केल्याचं,
पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. त्यानंतर रात्री
उशीरा परिस्थिती नियंत्रणात आली असून, पोलिसांनी किराडपुरा
राम मंदिर, रोशन गेट, बुढी लेन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात
केला आहे. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरीकांना शांततेचं आवाहन केलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करताना
ते म्हणाले,
‘‘मैं सभी लोगों से हाथ जोड़कर विनंती करना चाहूंगा। सभी जाति, धर्म और समाज के
लोगों से ये करना चाहूंगा की आज रामनवमीं का दिन है। और यकीनन इसको मनाना चाहिए। रमजान
है रमजान का महीना भी हम सब साथ में मिलकर मनाएंगे। मुसलमानों से ये अपील करना चाहता
हूँ कि रमजान का महीना है, इबादत का महीना है। हम लोग अच्छे तरीके से मिलकर मनाएं और
मैं पुलिस से यह कहना चाहूंगा की जो भी दोषी हैं उनके साथ सख्ती से निपटा जाए। किसी
भी तरह से हम कोई समझौता नहीं करेंगे, क्योंकि हमारे शहर से बड़ा कोई भी नहीं है। उत्सव
हम सबको साथ में मिलकर बनाना है। त्यौहार हम सबको साथ मिलकर मनाना है लेकिन चंद नौजवानों
की वजह से अगर हमारे शहर, हमारे जिले की हालत खराब होती है तो हम किसी भी तरह से उन्हें
छोड़ेंगे नहीं, उन्हें बख्शेंगे नहीं तो सभी लोग जो है वो बिलकुल बेफिक्र रहिएग।’’
****
संसदेचं कामकाज काल सलग बाराव्या दिवशी विरोधकांच्या
गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच, तालिका अध्यक्ष भर्तृहरी मेहताब
यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यावेळी काळे कपडे घातलेले विरोधी पक्षांचे सदस्य
हौद्यात उतरले आणि रोजच्याप्रमाणे अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय
समितीच्या मागणीसाठी फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी
तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही वारंवार आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ
सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही कामकाज पुकारताच
विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब
केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ कायम राहिल्यानं, सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत
तहकूब झालं.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत येत्या १०
मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव
कुमार यांनी काल दिल्लीत ही माहिती दिली. या निवडणुकीत ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले
वयोवृद्ध मतदार आपल्या घरूनच मतदान करू शकणार आहेत.
दरम्यान, केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात तूर्तास पोटनिवडणूक होणार नसल्याचं,
राजीवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघातून राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द
केल्यानंतर या निकालाविरोधात अपील करण्यासाठी गांधी यांच्याकडे ३० दिवसांचा कालावधी
आहे, तसंच पोटनिवडणुकीची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे सहा महिन्यांचा कालावधी
आहे, याकडेही कुमार यांनी लक्ष वेधलं.
****
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल यांचं लोकसभा सदस्यत्व
बहाल करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. एका हत्येच्या
प्रकरणात न्यायालयानं दहा वर्षांची शिक्षा ठोठावल्यानं लोकसभा सचिवालयानं ११ जानेवारी
रोजी फैझल यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं २५ जानेवारी
रोजी या शिक्षेला स्थगिती दिल्यावर, फैसल यांनी सदस्यत्वासाठी सर्वोच्च न्यायालयात
धाव घेतली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयानं
फैझल यांचं सदस्यत्व बहाल केलं आहे.
****
शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची
जत्रा हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबत राज्याचे
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय
आयुक्तांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यात पथदर्शी
कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची
माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार असून
यात आणखी योजना वाढवण्यात येणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिव
देहावर काल सायंकाळी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांचं
काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. १९७३ पासून राजकारणात सक्रिय असलेले बापट हे १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघातून
सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. २०१९
च्या लोकसभा निवडणुकीत ते पुण्यातून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. बापट यांच्या निधनानं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात, एक नम्र आणि
कष्टाळू नेता म्हणून ते सदैव स्मरणात राहतील असं म्हटलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक लोकप्रिय नेता
आणि अनुभवी संसदपटू गमावला असं त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात राजकारणातलं
सर्व समावेशक नेतृत्व हरपलं, या शब्दात दु:ख व्यक्त केलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांना श्रद्धांजली
अर्पण करताना, जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून
गेल्याचं म्हटलं आहे. सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा
असलेल्या गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं अशा
शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या रोजंदारी दरामध्ये वाढ
करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता रोजगार हमी योजनेवरील अकुशल
मजुरांना प्रतिदिन २५३ रुपयांऐवजी आता २७३ रुपये मजुरी मिळणार आहे. हे दर येत्या एक
एप्रिलपासून लागू होणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत,
कृषी, वन विभाग, लघुपाटबंधारे, जलसंपदा आदी विभागांत कामं केली जातात. या सर्व कामांमध्ये
कुशल म्हणजे यंत्राद्वारे केली जाणारी कामं आणि अकुशल म्हणजे मजुरांकडून केली जाणारी
कामं यांचं प्रमाण ६०: ४० ठेवणं बंधनकारक आहे.
****
****
युपीआयद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण नि:शुल्क राहणार
असल्याचं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे
यांनी स्पष्ट केलं आहे. युपीआय माध्यमातून पी पी आय म्हणजेच पेमेंट वॉलेटद्वारे केल्या
जाणाऱ्या, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर एक पूर्णांक एक टक्का
शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र युपीआयद्वारे होणारे ९९ पूर्णांक नऊ दशांश टक्के व्यवहार
हे बँक खात्यातून होत असल्याची माहिती, एन पी सी आय नं दिली आहे. या व्यवहारातून मोबाइल
किंवा अॅप हॅक होण्याचीही शक्यता नसल्याचं आसबे यांनी सांगितलं.
****
राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीनं सर्व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, आजपासून मिशन थायरॉईड हे अभियान सुरु करण्यात
येणार आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
समीर जोशी यांनी ही माहिती दिली. दर गुरुवारी हे अभियान राबवलं जाणार असून, थॉयराईड
रोगासंदर्भात जनजागृती करणं आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी
विविध सोयी उपलब्ध करुन देणं, हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात ३३ लाख रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी काल
२० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात स्वस्त
धान्य दुकानदारांना, धान्य वाटप करतांना अतिरिक्त धान्याचे वाटप झाल्याचं समोर आल्यानं,
पुरवठा विभागानं नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सूचना
संबंधितांना दिल्या होत्या. मात्र अद्याप काही जणांनी रक्कम भरणा न केल्यानं तत्कालीन
तहसीलदारासह २० जणांविरुद्द ही कारवाई करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावगी इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ संचलित मॉडेल महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं, काल कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रात सात मॉडेल कॉलेजेस असून, या सर्वांचं
नेतृत्व घनसावंगीचं मॉडेल कॉलेज करेल, असा विश्वास कुलगुरुंनी व्यक्त केला. ग्रामीण
भागातल्या विद्यार्थ्यांना आणखी पायाभूत, तांत्रिक सोयी-सुविधा आगामी काळात देऊ असंही
ते म्हणाले. माजी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. मॉडेल कॉलेजसाठी मंजूर आठ कोटी रुपये निधीपैकी, उर्वरित चार कोटी रुपये
निधी केंद्राकडून आणण्याचा प्रयत्न करु, असं टोपे यावेळी म्हणाले. महाविद्यालयाचा गेल्या
१२ वर्षांचा प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. या महाविद्यालयात सध्या अप्लाईड आणि
स्किल बेस्ड अभ्यासक्रमात ८९० विद्यार्थी शिकत आहेत.
****
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याचं धोरण राज्य शासनानं आखलं आहे. यासाठी राबवण्यात
येत असलेल्या योजनांमधून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत लातूर जिल्ह्यातल्या दोन हजार
१७५ शेतकऱ्यांना विविध अवजारे तसंच यंत्रांसाठी १० कोटी एक लाख १९ हजार ८८२ रुपये अनुदान
वितरीत करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात दोन ते पाच एप्रिल दरम्यान स्वातंत्र्यवीर
सावरकर गौरव रथ यात्रा काढण्यात येणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती
दिली. सावे आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
नियोजन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यात्रेदरम्यान सावरकरांच्या आठवणी, भाषणं,
लिखाण सर्वसामान्य जनतेला दाखवण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. सावरकरांना
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी भाजप आग्रही असल्याचं बोराळकर यांनी
यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. या महोत्सवात विविध चर्चासत्र
आणि परिसंवादात करवंद लागवड तंत्रज्ञान याबाबत वसमत तालुक्यातल्या लिंगी इथले प्रगतीशील
शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे
डॉ. साईनाथ खरात यांनी सेंद्रीय शेतीबाबतच्या उपाययोजनाविषयी मार्गदर्शन केलं. जालना
इथल्या सिताबाई मोहिते यांनी, बचतगटांनी फळ प्रक्रिया तसंच इतर उद्योगाच्या विक्री
व्यवस्थेच्या नियोजनाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त
घेतलेल्या पाककला स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी
केलेला ज्वारीचा केक, बाजरीचे लाडू, बाजरीचा हलवा आदी पदार्थांना गौरवण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा काल कोविड संदर्भात आढावा
घेण्यात आला. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा
उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत सूचित करण्यात आलं. कोविड, एन्फ्ल्युएन्झा किंवा
स्वाईन फ्ल्यू संदर्भात लक्षणं जाणवल्यास, तत्काळ चाचणी करून घेण्याचं आवाहन नागरिकांना
करण्यात आलं.
****
अण्णासाहेब पाटिल महामंडळाचे अध्यक्ष तथा मराठा महासंघाचे नेते नरेंद्र पाटील यांनी
काल धाराशिव इथं महामंडळाच्या विविध योजना, अडीअडचणी तसंच कर्ज वाटपाचा आढावा घेतला.
काही यशस्वी व्यावसायिकांच्या उद्योगांची त्यांनी माहिती घेतली. पाटील यांनी भाजपच्या
जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शनही केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल सुमारे साडे ८१ कोटी रुपयांचा
गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटख्याची ६७ पोती, एक ट्रक, एक छोटी मालवाहू रिक्षा तसंच
दोन चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या.
****
हजूर साहिब नांदेड - संबलपूर एक्सप्रेसला एक शयनशायिका तसंच
एक तृतीय श्रेणी वातानुकूलीत डबा वाढवण्यात आला आहे. हा निर्णय एका महिन्यासाठी लागू
असेल.
****
धाराशिव इथल्या नगररचना विभागातला रचनाकार मयुरेश केंद्रे याला
दीड लाख रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. तुळजापूर तालुक्यातल्या शिंदफळ शिवारातल्या
शेतजमिनीला अकृषी म्हणून तात्पुरती मंजुरी देण्यासाठी त्यानं पाच लाख रुपये लाच मागितली
होती, त्यातला पहिला हप्ता स्वीकारताना त्याला काल अटक करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment