आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
भारताच्या
G-20 अध्यक्षपदाअंतर्गत, व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक आजपासून
मुंबईत सुरु होत आहे. तीन दिवसांच्या या बैठकीचं औपचारिक उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग
मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्या
होणार आहे. व्यापाराभिमुख आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळी, जागतिक व्यापारात सुक्ष्म,
लघू आणि मध्यम उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि व्यापारासाठी आवश्यक दळणवळण सुविधा निर्माण
करणं, या मुद्द्यांवर भारताकडून या बैठकीत भर दिला जाणार असल्याची माहिती, केंद्रीय
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
****
संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह आज एक दिवसाच्या पुणे भेटीवर येत आहेत. भारत आणि आफ्रिकी देशांच्या लष्कर
प्रमुखांच्या परिषदेला ते उपस्थित राहणार असून, सिम्बायोसिस व्यवस्थापन संस्थेमध्ये
आयोजित जी२० परिषदेच्या फेस्टिवल ऑफ थिंकर्स व्याख्यानमालेमध्ये ते मार्गदर्शन करणार
आहेत.
****
महाराष्ट्र राज्य
कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचं भूमीपूजन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल
पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात झालं. आयटीआय आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणावर
सांगड घालणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये
उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी
महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांबाबत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. य
दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी रिट याचिका न्यायालयानं
काल फेटाळून लावली.
****
पुण्यात सुरू
असलेल्या ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत काल पुरुष फॉइल प्रकारात सर्व्हिसेस
स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड संघाने मणिपूर संघाचा 45-32 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.
एस एस सी बी च्या भूपेन सिंग लिशम याने सुनील कुमार याच्यावर मात करत, वरिष्ठ पुरुष
ईपी प्रकारात सुवर्णपदक मिळवलं.
****
No comments:
Post a Comment