Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
· मराठवाड्यातल्या २०५ अकार्यक्षम ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द.
· राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधात
काँग्रेस पक्षाचं देशभर संकल्प सत्याग्रह आंदोलन.
· मुंबई-पुण्याच्या बाहेरच्या गुणवत्तेचा शोध घेण्याचा आपला प्रयत्न
- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं प्रतिपादन.
आणि
· सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीला स्विस खुल्या बॅटमिंटन
स्पर्धेत सुवर्ण पदक.
****
मराठवाड्यातल्या २०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द करण्यात
आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं राज्यातल्या अकार्यक्षम ग्रंथालयांना
नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र या ग्रंथालयांनी खुलासे सादर न केल्यानं ग्रंथालय
संचालनालयानं ही कारवाई केली आहे. सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी आज छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात या संदर्भातली माहिती दिली.
शासनमान्यता रद्द झालेल्या ग्रंथालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या २०, जालना
२९, नांदेड आणि बीड प्रत्येकी ३८, धाराशीव १९, परभणी १६, लातूर ३० तर हिंगोली जिल्ह्यातल्या
१५ ग्रंथालयांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालयांना ६० टक्के वाढीव अनुदानाची रक्कम येत्या
चार ते पाच दिवसांत मिळणार असल्याचंही सहाय्यक ग्रंथालय संचालक हुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, सहकार्य मिळणं गरजेचं असल्याचं
राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते मुंबईत स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं
शिलाई यंत्र आणि पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्यात आली, त्यावेळी बैस बोलत होते.
नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह ४२ अपंगत्वाचा समावेश करण्यात आला असला तरी दिव्यांग
व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत, असल्याचं ते यावेळी म्हणाले. दिव्यांग
व्यक्तींना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी आणि सुरक्षित वातावरण देणं समाजाचं
कर्तव्य आहे. अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग लोक उत्कृष्ट कार्य करू शकतात असंही
राज्यपाल बैस यांनी सांगितलं.
****
राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधात
आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं देशभर संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेस
पक्षातर्फे संकल्प सत्याग्रह करण्यात आला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब
थोरात, भाई जगताप यात सहभागी झाले. नागपूर इथ ही संविधान चौकात काँग्रेस पक्षातर्फे
आज धरणं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी
केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे उपस्थित
होते. वाशिम इथं आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात
आलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र
विभागातून परिघाबाहेरचे कलावंत घडल्याचे गौरवोद्गार प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे
यांनी काढले आहेत. त्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर इथं विद्यापीठाच्या नाट्यगृहात
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्य महोत्सवाचं उद्घाटन झालं, त्यावेळी मंजुळे बोलत होते.
मुंबई- पुण्याच्या बाहेरच्या गुणवत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो, असं त्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले की –
संधी
मिळाली तर खूप लोकं काहीही करू शकतात, सगळ्यात टॅलेंट आहे. आपल्या सीमा ठरल्या आहेत,
पण त्या परिघाबाहेर पण टॅलेंट असतं. मला नॅशनल अवॉर्ड मिळाले डिरेक्टर म्हणून. असंही
शक्य आहे. तर माझं मत आहे की, पुणे, मुंबई सोडून औरंगाबाद जगाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर
कुठल्याही कोपऱ्यात महाराष्ट्राच्या जगाच्या भारताच्या टॅलेंट भरलेलं आहे. त्यांना
संधी मिळाली पाहिजे, नवीन चेहरे आले पाहिजे.
दाक्षिणात्य रसिकांच्या तुलनेत कलेवरची आपली श्रद्धा कुठेतरी
कमी पडते, याचा विचार मराठी माणसांनी करावा, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावेळी
केलं. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीला अनेक मोठे कलावंत देणाऱ्या नाट्यशास्त्र विभागाचं
हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षात संस्मरणीय कार्यक्रम घेऊन विभागानं राष्ट्रीय
- आंतरराष्ट्रीय स्तरावर कलावंत घडवावेत, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी
व्यक्त केली. 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटातील कलावंत आकाश ठोसर, सायली पाटील, प्रवीण
डाळींबकर, चरण जाधव यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची
जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशानं जिल्हा माहिती कार्यालयानं चित्ररथाची निर्मिती
केली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात
जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज हिरवा
झेंडा दाखवून मोहीमेची सुरुवात केली. या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं
आवाहन भुमरे यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना
कोविड-१९, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन रोग यांसारख्या आजारांच्या नवनव्या कारणांवर बारकाईनं
लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. कोविड-१९ आणि इन्फ्लुएंझा या दोन्ही आजारांमध्ये संसर्गाची
माध्यमं, अधिक लोकसंख्येला संसर्गाची असणारी जोखीम, चिकित्साविषयक लक्षणं याबाबत समानता
आहे. गर्दीची आणि कोंदट ठिकाणं टाळणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं, सार्वजनिक
आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात वारंवार धुणं यांसारख्या साध्या उपायांनीसुद्धा
हे आजार टाळता येऊ शकतात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
शाश्वत विकासाचं लक्ष्य बाळगून प्रयत्न करण्याचा सूर डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पर्यावरणशास्त्र विभागात माजी विद्यार्थ्यांच्या
मेळाव्यामध्ये आज व्यक्त झाला. पर्यावरण क्षेत्रात मोठे अधिकारी, शास्त्रज्ञ आणि उद्योजक
घडवणाऱ्या पर्यावरण शास्त्र विभागाचं हे ३८वं स्थापना वर्ष असून, आगामी काळात विभागानं
राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
नांदेड - अमृतसर - नांदेड या अमृतसर एक्सप्रेस आणि नांदेड -
जम्मू तावी - नांदेड हमसफर एक्सप्रेसला सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर शेगाव रेल्वे
स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही गाड्या नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला
मार्गे जाणाऱ्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयातर्फे आज ही
माहिती देण्यात आली.
****
बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं
स्विस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक पटकवलं आहे. त्यांनी
आज बासेल इथं अंतिम सामन्यात चिनच्या रेंन झियांग यू आणि टॅन क्विंग यांचा २१-१९, २४-२२
असा सरळ गेम्समध्ये सहज पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ गावांनी महावितरणची थकीत वीज
देयकं भरुन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. कन्नड तालुक्यातल्या पिशोर उप विभागातल्या धामणी,
आंबेगाव, शिपघाट, दुधमाळ, मेहुण, सावरगाव, सातकुंड तांडा, चिमणापूर, रेऊळगाव, पळशी
खुर्द, देवपुळ, अमदाबाद, डोंगरगाव, टाकळी, मोहरा आणि मोहाडी ही १६ गावं थकबाकीमुक्त
झाली आहेत. तर पैठण उपविभागात केसापुरी, पैठण खेडा आणि जैदपूर ही ३ गावं थकबाकीमुक्त
झाली आहेत. आज २६ मार्चपर्यंत या १९ गावांनी वीज देयकं भरली आहेत. वीज देयकं वसुलीसाठी
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणकडून प्रभावी प्रयत्न करण्यात येत असून वीज ग्राहकांचाही
महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
नागपूर इथल्या ‘मैत्री’ परिवार आणि गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या
संयुक्त विद्यमानं आज गडचिरोली इथं १२७ आदिवासींच्या सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
यात आठ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा समावेश होता. या सोहळ्याला खासदार अशोक नेते, आमदार
देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल
उपस्थित होते. आदिवासी परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नववधूंना सोन्याचं
मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि सांसारिक साहित्य भेटवस्तू म्हणून देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment