Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २८
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
·
देशभरात
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचा, तसंच सामाजिक
अंतर राखण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
·
२०२३-२४
वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मंजूर,
·
काँग्रेस
नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांचा
संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमाना विरोधात
शिवसेना - भाजपच्या खासदारांचं संसद परिसरात आंदोलन
·
राज्यभरात
सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा तर सावरकर मुद्यावरून
महाविकास आघाडीत फूट पाडण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांचा आरोप
·
जी-२०
अंतर्गत, आजपासून मुंबईत व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक
आणि
·
छत्रपती
संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्याच्या नामांतर निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात आक्षेपांचे
लाखो अर्ज प्रशासनाकडे सादर
सविस्तर बातम्या
देशभरात
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना
मास्क वापरण्याचा, तसंच सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. एच-3 एन-2 एन्फ्ल्यूएन्झाच्या
पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं
देखील मंत्रालयानं सांगितलं आहे. देशात गेल्या २४ तासांत एक हजार आठशे नवे कोविडग्रस्त
आढळले असून, सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजार तीनशे झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने
खबरदारीचा इशारा दिला आहे.
दरम्यान,
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल सर्व राज्यांच्या कोविड तयारी संदर्भात
आढावा बैठक घेतली. रुग्णालयांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रील करण्याची, तसंच
आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
आगामी
आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेनं मंजूर केला आहे. त्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल
गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्यावरुन काल सलग दहाव्या
दिवशी संसदेचं कामकाज बाधित झालं. लोकसभा तसंच राज्यसभेतही काळे कपडे परिधान करून आलेल्या
काँग्रेससह इतर खासदारांनी सदनाच्या मध्यभागी येत घोषणाबाजी केली, त्यामुळे दोन्ही
सदनांचं कामकाज सकाळी सुरू होताच स्थगित करावं लागलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन
वाजता पुन्हा गदारोळातच सुरू झालं. राज्यसभेनं वित्त विधेयक काही सुधारणांसह लोकसभेकडे
परत पाठवलं, तर विनियोग विधेयक तसंच जम्मू काश्मीर विनियोग विधेयक चर्चेविना संमत केलं.
लोकसभेत
चार वाजता कामकाज सुरू होताच, विरोधकांचा गदारोळ पुन्हा सुरू झाला. तालिका अध्यक्ष
रमादेवी यांनी गदारोळातच कामकाज सुरू ठेवलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेनं
वित्त विधेयकात सुचवलेल्या सुधारणा सदनासमोर ठेवल्या, सदनानं या सुधारणा मान्य करत,
त्या वित्त विधेयकात समाविष्ट करत कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. त्यामुळे संसदेत
अर्थसंकल्पासंदर्भातली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
****
काँग्रेस
नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी
काल संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,
सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान,
राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान सोडण्याची सूचना लोकसभा सचिवालयानं केली आहे.
त्यांनी आपलं निवासस्थान येत्या २२ एप्रिलपर्यंत सोडावं, असं यासंदर्भातल्या पत्रात
म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर यांचा अवमान करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना - भाजपच्या खासदारांनी
काल संसदेच्या परिसरात आंदोलन केलं. यावेळी खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, पूनम
महाजन, प्रकाश जावडेकर, हेमंत गोडसे आदीं शिवसेना - भाजपच्या खासदारांनी गांधी यांच्या
वक्तव्याचा निषेध केला.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर यांनी स्वातंत्र्य समराव्यतिरिक्त जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी
भाषा गौरव, मराठी भाषेच्या शब्दसंपदेत भर घालणं, अशा अनेक क्षेत्रात मोठं योगदान दिलं.
प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. या भावनेतूनच राज्यभरात सावरकर
गौरव यात्रा काढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काल मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलताना ते म्हणाले,
Byte…
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा
वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय. त्याचा खरं म्हणजे निषेध करावा तेवढा थोडाय.
मी त्याचा निषेध, धिक्कार, जाहीर निषेध करतो. संपूर्ण राज्यभर सावकरांच्या बद्दल एक
त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे,
या समर्पणाच्या निमित्त याठिकाणी राज्यभरामध्ये, जिल्ह्याजिल्ह्यामध्ये, तालुक्यातालुक्यात
विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा सर्व जनता सुरू करणार आहे.
यावेळी
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त निवेदन जारी करून
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
****
दरम्यान,
सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट असून, या मुद्यावरून
महाविकास आघाडीत फूट पाडण्याचं षडयंत्र विरोधक करत असल्याची टीका, राज्य प्रदेश काँग्रेस
समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सावरकरांच्या
मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे विचार वेगळे आहेत.
याबाबत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील, असं पटोले यांनी सांगितलं.
****
देशात
२०१९ ते २०२२ या गेल्या तीन आर्थिक वर्षांत २ लाख १३ हजारांहून अधिक सायबर आर्थिक गुन्ह्यांची
नोंद झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल लोकसभेत एका लेखी
प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या काळात डेबिट- क्रेडिट कार्ड अदलाबदल, बनावट
कार्ड आणि इंटरनेट बॅँकिंग आणि हॅकिंग या माध्यमातून ७३१ कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीचे
प्रकार झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह
बँकेनं काही सुरक्षा निर्देश आणि सूचना केल्या असल्याची माहिती कराड यांनी दिली.
****
देशातले
आयातदार, गिरणी मालक, साठेदार आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या तूर डाळीच्या उपलब्धतेवर
लक्ष ठेवण्यासाठी, केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या समन्वयानं एक समिती स्थापन केली
आहे. बाजारामध्ये पुरेशा प्रमाणात तूरडाळ उपलब्ध करत नसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात डाळींच्या किमतीमध्ये अवास्तव वाढ
झाली, तर आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं, देशांतर्गत बाजारात इतर डाळींच्या
उपलब्धतेवरही सरकार बारकाईनं लक्ष ठेवत असल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक
वितरण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
मशाल
या निवडणूक चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
आहे. त्यामुळे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल हे निवडणूक
चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी
ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं, त्याची मुदत वाढवण्यात
आली आहे.
****
भारताच्या
जी-२० अध्यक्षपदाअंतर्गत, व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक आजपासून
मुंबईत सुरू होत आहे. ३० मार्चपर्यत चालणाऱ्या या बैठकीचं उद्या २९ मार्च रोजी, वाणिज्य
आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या
हस्ते औपचारिक उद्घाटन होईल.
जागतिक
व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित ज्या प्राधान्यक्रमांचा भारत पाठपुरावा करत आहे, त्या
संदर्भातल्या चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये २९ आणि ३० मार्च रोजी चर्चा होईल. या
बैठकीदरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ यांनी
तयार केलेला चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचं वैविध्यपूर्ण प्रदर्शन तसंच भारतीय
वस्त्रांचं प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
****
येत्या
पंधरा दिवसात राज्य शासनाच्या वतीनं वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची
माहिती, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते काल अमरावती
इथं माध्यमांशी बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळावी आणि वाळूचा
होणारा काळाबाजार थांबावा यासाठी सरकार स्वतःच वाळूचा लिलाव करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात
वाळू डेपो मधून प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात म्हणजे अवघ्या सहाशे
रुपये ब्रास दराप्रमाणे वाळू मिळणार आहे, अशी माहिती विखेपाटील यांनी दिली.
****
छत्रपती
संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या नामांतर निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात आक्षेपांचे
लाखो अर्ज प्रशासनाकडे सादर झाले आहेत. या निर्णयावर आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी
काल शेवटचा दिवस होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाजतगाजत घोषणाबाजी करत समर्थनाचे
अर्ज काल विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले. दोन लाखाहून अधिक समर्थनार्थ
सूचना दाखल करण्यात आल्याचं भाजप नेते संजय केनेकर यांनी सांगितलं.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं जिल्ह्याचे पालकमंत्री
डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात परंडा तालुक्यात अनाळा इथं रस्त्याचा
लोकार्पण सोहळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते काल झालं,
त्यावेळी ते बोलत होते. इतर जिल्ह्यातील लोकांनी आपल्या गावाचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं
गावाचा विकास करावा असं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या वालवड इथं जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन
आणि कामाचा शुभारंभ सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला. हे प्रकल्प या वर्षाअखेर
पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केली.
****
मराठा
समाजातल्या तरुणांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने उद्योग उभारणीसाठी बँकानी सकारात्मक
दृष्टीकोन बाळगण्याची गरज, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र
पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते काल नांदेड जिल्हा कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते.
लाभार्थ्यांकडून प्रस्ताव सादर करतांना काही त्रुटी असल्यास बँकांनी त्या त्रुटी दूर
करण्याबाबत मार्गदर्शन करावं असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्वयंरोजगारासाठीची असंख्य प्रकरणं मंजूर
केली आहेत, मात्र बँकेच्या उदासीनतेमुळे अडचणी येत असल्याचं, खासदार प्रतापराव पाटील
चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या युवकांना स्वयंरोजगाराच्या कक्षेत
आणण्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली
सर्व बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावणार असल्याचं चिखलीकर यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्याचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना
यांनी काल सादर केला. २०२३-२४ वर्षासाठी १७ हजार ६५८ शिलकीचा हा अर्थ संकल्प असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात
अंगणवाडीच्या बालकांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांच्या ट्रॅकर ॲप मध्ये नोंदी घेण्यात
हिंगोली जिल्ह्यानं तिसरा क्रमांक मिळवला आहे. हिंगोली जिल्ह्याने ९६ टक्के काम पूर्ण
केलं आहे. ९८ टक्के काम पूर्ण करणारा भंडारा जिल्हा राज्यात प्रथम, तर ९७ टक्के काम
करणारा पालघर जिल्हा दुसर्या स्थानावर आहे.
****
शिधापत्रिकाधारकांना
२२ मार्च पासून सुरु झालेले आनंदाचा शिधा संचाचं वितरण पुढील एक महिनाभर सुरु राहणार
असल्याचं, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे
कळवलं आहे. आनंदाचा शिधा संचात प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो हरभराडाळ, एक किलो साखर
आणि एक लिटर खाद्यतेलाचा समावेश आहे.
****
पहिल्या
लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल महोत्सवाच्या
दुसऱ्या दिवशी गिरकी या मराठी चित्रपटाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. आज या महोत्सवात
आठ चित्रपट दाखवले जाणार असून, आजच या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
ज्येष्ठ
शास्त्रीय गायक दिवंगत पंडित नाथ नेरळकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आज छत्रपती
संभाजीनगर इथं संध्याकाळी सात वाजता तापडिया नाट्यमंदीरात नाथस्वर या कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पंडित आनंद भाटे यांचं गायन, रोहीत मुजुमदार
आणि सागर पटोकार यांचं तबला वादन, तर अभिषेक शिनकर यांचं एकल हार्मोनियम वादन होणार
आहे.
****
बीड इथं गेले
तीन दिवस सुरू असलेल्या नवतेजस्विनी महोत्सवाचा काल समारोप झाला. यावेळी सहभागी स्टॉल
धारक बचतगटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनात, कृषी विभागाच्या
विविध योजनांचे लाभ घेण्याचं आवाहन केलं.
****
लातूर
जिल्ह्यात औसा- निलंगा मार्गावर कारच्या भीषण अपघातात मामासह तीन भाचांचा मृत्यू झाला,
तर चार जण जखमी झाले. हे कुटुंब पुण्याहून लग्न समारंभ आटोपून गावी परतत असताना, काल
सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
****
सेलू-
ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे रुळाच्या कामासाठी आज पाच तासांचा लाईन
ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास १५ मिनिटं,
नांदेड - पुणे एक्सप्रेस ५० मिनिटं, काचिगुडा - रोटेगाव एक्सप्रेस अडीच तास, तर नगरसोल
- नरसापूर एक्सप्रेस दीड तास उशिरा धावणार आहे. उद्या २९ मार्चला धर्माबाद - मनमाड
मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद इथून एक तास उशिरा सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन कृषी अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी ऑपरेटरला २४ हजार रुपये
लाच घेताना अटक करण्यात आली. शेतकर्यांच्या ठिबक सिंचनाच्या ३५ फायलींसाठी प्रत्येकी
७०० रुपयांप्रमाणे साडे २४ हजार रुपये लाच त्यांनी मागितली होती.
****
No comments:
Post a Comment