Monday, 27 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 27.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्यावरुन आज सलग दहाव्या दिवशी संसदेचं कामकाज बाधित झालं.

लोकसभेत आजचं कामकाज सुरु झाल्यावर अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह इतर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित केलं.

राज्याभेतही हेच चित्र पहायला मिळालं. अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर सत्ताधारी पक्षांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी लाऊन धरली. या गदारोळामुळे सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित आले.

दरम्यान, दोन्ही सभागृहात आज विरोधी पक्षांचे खासदार सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे परिधान करुन आले होते.

***

अदानी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर तसंच राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आज संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते.

***

जी-20 च्या पर्यावरण आणि शाश्वत हवामान विषयक कार्यगटाची दुसरी बैठक आजपासून गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू झाली. ३० हून अधिक देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जैवविविधता, जमिनीचा ऱ्हास, चक्रीय अर्थव्यवस्थेत साधनसंपत्तीच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन तसंच बदलत्या हवामानाला लवचिकतेनं तोंड देण्यास सक्षम नील अर्थव्यवस्थेला चालना अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

***

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना आणि इन्फ्लुएंझा संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सर्व राज्यांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, देशात काल कोविड १९ चे एक हजार ८०५ रुग्ण आढळून आले. काल ३२ रुग्ण बरे झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात सध्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

***

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन आक्षेप अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

***

छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा परिसरात धुळे - सोलापूर महामार्गावर ट्रक आणि रसायन घेवून जाणाऱ्या टँकरचा आज सकाळी अपघात झाला. टॅंकरनं समोरील ट्रकला पाठीमाघून धडक दिली, यात टॅंकर वाहनचालक हा गाडीच्या कॅबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकला होता. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के सुरे यांनी दिली.

***

सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे रुळाच्या कामासाठी उद्या २८ मार्च रोजी पाच तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. उद्या मुंबई - नांदेड तपोवन एक्प्रेस १३५ मिनिटं उशिरा धावणार आहे. नांदेड - पुणे एक्स्प्रेस ५० मिनिटं, काचिगुडा - रोटेगाव एस्प्रेस १९० मिनिटं तर नगरसोल - नरसापूर एक्स्प्रेस ९० मिनिटं उशिरा धावणार आहे. परवा २९ मार्चला धर्माबाद इथून सुटणारी धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद इथून एक तास उशिरा सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

***

नांदेड जिल्ह्यात माहूर इथं येत्या १६ एप्रिलला शिक्षकांचं साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या संमेलानासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

***

अल्बानिया इथं सुरु असलेल्या जागतिक युवा भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या ज्योत्स्ना साबर आणि धनुष लोगानाथन यांनी आपापल्या गटात कांस्य पदक जिंकलं. चौदा वर्षीय ज्योत्स्नानं मुलींच्या ४० किलो वजनी गटात ११५ किलो वजन उचललं, तर सोळा वर्षीय धनुषनं मुलांच्या ४९ किलो वजनी गटात २०० किलो वजन उचललं. स्नॅच प्रकारात त्याने रौप्य पदक देखील पटकावलं.

***

भोपाळ इथं सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सिफ्त कोर सामरा हीनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकूण सात पदकं जिंकून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

//***********//

 

No comments: