Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
· वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य
मंत्रालयाचा नागरिकांना मास्क वापरण्याचा तसंच सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला.
· राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या
वक्तव्याचा मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध.
· संसदेचं कामकाज आज सलग दहाव्या दिवशी बाधित.
आणि
· शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल
हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा.
****
देशभरात वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मास्क वापरण्याचा तसंच सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला
दिला आहे. तसंच एच-3एन-2 एन्फ्ल्यूएन्झाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ
खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे. देशात गेल्या २४ तासांत एक हजार
आठशे नवे कोविडग्रस्त आढळले असून, सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजार तीनशे झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल
केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
निषेध केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त
निवेदन जारी करून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तसंच कृतीचा निषेध केला. राहुल गांधींनी
सावरकरांबद्दल केलेलं अपमानास्पद वक्तव्य सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगणं,
हे त्यांना उशीरा सुचलेलं शहाणपण असून ठाकरे गटाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्त जाती निर्मूलन, अंधश्रद्धा
निर्मूलन, मराठी भाषा गौरव, मराठी भाषेच्या शब्दसंपदेत भर घालणं, अशा अनेक क्षेत्रात
मोठं योगदान दिलं. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. या भावनेतूनच
राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले
–
स्वातंत्र्यवीर
सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय. त्याचा खरं म्हणजे निषेध करावा तेवढा
थोडाय. मी त्याचा निषेध, धिक्कार, जाहीर निषेध करतो. संपूर्ण राज्यभर सावकरांच्या बद्दल
एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे
आहे, या समर्पणाच्या निमित्त याठिकाणी राज्यभरामध्ये, जिल्ह्याजिल्ह्यामध्ये, तालुक्यातालुक्यात
विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा सर्व जनता सुरू करणार आहे.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर
पडावं असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपूर
विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेलं अपमानास्पद
वक्तव्य सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सांगणं, ही केवळ वल्गना असल्याची
टीका बावनकुळे यांनी केली.
****
दरम्यान, सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून
स्पष्ट असून या मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत असल्याची
टीका राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत
माध्यमांशी बोलत होते. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
आणि काँग्रेस पक्षाचे विचार वेगळे आहेत. याबाबत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे चर्चा
करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे काँग्रेस नेते
राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना - भाजपच्या खासदारांनी आज संसदेच्या परिसरात आंदोलन
केलं. यावेळी खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, प्रकाश जावडेकर, हेमंत
गोडसे आदीं शिवसेना - भाजपच्या खासदारांनी गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
****
अदानी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आणि केंद्रीय
तपास यंत्रणांचा गैरवापर तसंच राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ
विरोधी पक्षांनी आज संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे, सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे सदस्य या मोर्चात सहभागी झाले.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य
आणि अदानी समुहाच्या मुद्यावरुन आज सलग दहाव्या दिवशी संसदेचं कामकाज बाधित झालं. लोकसभा
तसंच राज्यसभेतही काळे कपडे परिधान करून आलेल्या काँग्रेससह इतर खासदारांनी सदनाच्या
मध्यभागी येत घोषणाबाजी केली, त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज सकाळी सुरू होताच स्थगित
करावं लागलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झालं राज्यसभेनं आज वित्त विधेयक
काही सुधारणांसह लोकसभेकडे परत पाठवलं. तर विनियोग विधेयक तसंच जम्मू काश्मीर विनियोग
विधेयक चर्चेविना संमत केलं. या विधेयकांवर चर्चेसाठी दहा तासांचा वेळ राखीव होता.
मात्र गदारोळामुळे त्यावर चर्चा होऊ न शकल्याबद्दल सभापती जगदीप धनखड यांनी नाराजी
व्यक्त करत, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेत चार वाजता कामकाज सुरू होताच, विरोधकांचा गदारोळ
पुन्हा सुरू झाला. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी गदारोळातच कामकाज सुरू ठेवलं. अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेनं वित्त विधेयकात सुचवलेल्या सुधारणा सदनासमोर ठेवल्या,
सदनानं या सुधारणा मान्य करत, त्या वित्त विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या. त्यानंतर
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
देशात २०१९ ते २०२२ या गेल्या तीन आर्थिक वर्षांत २ लाख १३
हजारांहून अधिक सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या काळात
डेबिट- क्रेडिट कार्ड अदलाबदल ,बनावट कार्ड आणि इंटरनेट बैंकिंग आणि हॅकिंग या माध्यमातून
७३१ कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीचे प्रकार झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.आर्थिक
फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही सुरक्षा निर्देश आणि सूचना दिल्या
असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल
हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या
पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात
देण्यात आलं होतं. त्याची मुदत आज म्हणजेच २७ मार्च रोजी संपणार होती. मात्र त्यापूर्वीच
समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने
समता पार्टीची याचिका फेटाळून लावली. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा
आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून
नवीन नाव आणि चिन्ह दिलं जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या नामांतराच्या
निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. विभागीय आयुक्त
कार्यालयाच्या वतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन आक्षेप अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार
नाही असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात परंडा
तालूक्यात अनाळा इथं रस्त्याचा लोकार्पण सोहळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन
सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इतर जिल्ह्यातील लोकांनी
आपल्या गावाचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं गावाचा विकास करावा असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आज सादर केला. २०२३-२४ वर्षासाठी १७ हजार
६५८ रूपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिधापत्रिकाधारकांना २२ मार्च पासून सुरु झालेले आनंदाचा
शिधा संचाचे वितरण पुढील एक महिनाभर सुरु राहणार असल्याचं, अन्न, नागरी पुरवठा आणि
ग्राहक संरक्षण विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. आनंदाचा शिधा संचात प्रत्येकी
१ किलो रवा, १ किलो हरभराडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर खाद्यतेलाचा समावेश आहे.
****
सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाच्या
कामासाठी उद्या २८ मार्च रोजी पाच तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे
काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.
****
No comments:
Post a Comment