Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 31 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक
भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर
राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या
वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या
विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक
अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.
***
२०२३
ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी
व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज
नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून
लागू होणाऱ्या या
नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना
अंमलात येणार आहेत, तसंच
आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं
लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.
***
केंद्रीय
संरक्षण मंत्रालयाने आकाश शस्त्र प्रणाली अंतर्गत शस्त्रास्त्र खरेदीसाठी भारत डायनेमिक्स
लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. सुमारे नऊ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या या
करारान्वये वायूसेनेसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक तसंच अन्य उपकरणं खरेदी
केली जाणार आहेत. उत्तरी सीमेवर तैनात सैन्यदलासाठी ही खरेदी केली जात असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
***
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं भारतीय
शिपयार्ड्ससोबत केलेल्या
कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ११ अत्याधुनिक
समुद्री टेहळणी जहाजं आणि सहा क्षेपणास्त्र वाहक जहाजांसाठी हा
करार करण्यात आला. हे पाऊल आत्मनिर्भरतेला चालना देईल आणि विशेषतः सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मदत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी
ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केला आहे. या करारामुळे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाला गती मिळाली असल्याचं त्यांनी नमूद केलं.
***
देशात
काल तीन हजार नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल १३ हजार ९० रुग्ण बरे
झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. सध्या देशात जवळपास १५ हजार रुग्णांवर
उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७८ शतांश टक्के इतका आहे. देशात
आतापर्यंत २२० कोटी ६५ लाख नागरीकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे.
***
प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या
तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून
वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला
प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी
अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली
आहे. कृषिपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या
नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य
ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या
समितीमार्फत चौकशी करावी अशी
मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
***
छत्रपती
संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचं,
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास
आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष
ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
***
नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या
नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र
यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशानं शासन हा उपक्रम राबवत आहे.
***
सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट
स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. वर्ष २०१८ नंतर प्रथमच ही स्पर्धा घरच्या आणि बाहेरच्या
मैदानांवर होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलामध्ये
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला
सामना होणार आहे.
//************//
No comments:
Post a Comment